Manipur Violence : १५ ऑगस्ट, २०२३ रोजी भारत देश आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. सुजलाम-सुफलाम राष्ट्र, समृद्ध परंपरा आणि संस्कृती असणारे राष्ट्र, ऐतिहासिक वर्षांनी समृद्ध असे राष्ट्र अशी भारताची ओळख आहे. परंतु, सध्या समाजात घडणाऱ्या विकृत घटना बघताना भारताची ही ओळख कागदोपत्री तर राहणार नाही ना, अशी शंका निर्माण होते. एका बाजूला ऐतिहासिक अशा ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे नेतृत्व एका भारतीय महिलेने केले, तर त्याच भारताच्या एका भागातील महिलांची नग्न करून धिंड काढली जात आहे, त्यांचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहेत आणि तरीही पुराव्यांच्या अभावी किंवा अन्य काही करणानिमित्त गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. समाजात काही घडले तरीही पहिली शिक्षा महिलांनाच का ? भारताच्या फाळणीपूर्व काळापासूनची ही वस्तुस्थिती भारत स्वतंत्र होऊन ७६ वर्षे होतील, तरीही बदलेली नाही, असे का ? ही विकृत मानसिकता कुठून येते ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला अत्याचारांची अशीही कथा

भारताला नक्कीच एक समृद्ध परंपरा आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. परंतु, महिला अत्याचार भारताच्या फाळणीपूर्व काळातही झाले. भारताच्या स्वातंत्रलढ्यामध्येही झाले. दोन समाजांमधील वाद असतील, सामाजिक दंगली असतील तेव्हा त्या समाजातील महिलांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. लहान मुली, स्त्रिया यांना बंदिवान करून त्यांच्यावर विकृतरित्या अत्याचार करण्यात आले. महिलांची विक्री करण्यात येऊ लागली. त्यांचे दर ठरवण्यात आले. भारताची फाळणी झाल्यावरही सामाजिक तेढ निर्माण होऊन विशिष्ट समाजातील महिलांना लक्ष्य करण्यात येऊ लागले. पुरुषसत्ताक किंवा पुरुषी वर्चस्व यामुळे स्त्रीला दुय्यम स्थान मिळू लागले. याचे पडसाद केवळ वृत्तवाहिन्यांवर किंवा समाजमाध्यमांवर समजणाऱ्या घटनांपुरते मर्यादित नाही, तर घरगुती हिंसा (डोमेस्टिक व्हॉयलेन्स) हाही त्यातलाच प्रकार आहे. महिलेकडून मिळालेला नकार, प्रेमभंग, महिलेने मांडलेले तिचे मत पचनी न पडल्यामुळे तिच्यावर शारीरिक-मानसिक अत्याचार करणे, तिच्या देहाची विटंबना करणे, तिचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे करणे हे तिचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेण्यासारखे आहे.

हेही वाचा : विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ?

ही विकृती येते कुठून ?

मुळात स्त्रीकडे उपभोगाची वस्तू पाहण्याची मानसिकता दिसते. यामध्ये पुरुषांच्या मनात असणारी श्रेष्ठत्वाची भावना, सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक वातावरण कारणीभूत ठरत असते. स्त्रीकडून मिळालेला नकार आणि त्यामुळे निर्माण झालेली सूडाची भावना विकृत मानसिकतेसाठी कारण ठरते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी वाटेल त्या पातळीवर जाण्याची तयारी पुरुषांमध्ये निर्माण झालेली दिसते. त्यासाठी ते तुरुंगातही जाण्यास तयार असतात.
मुळात जन्मजात कोणीही गुन्हेगार नसतो. समाज त्या व्यक्तीला घडवत असतो. कुटुंबाकडूनही होणारे संस्कार महत्त्वाचे ठरत असतात. समाज माध्यमे किंवा अन्य इंटरनेटवरील संकेतस्थळांमुळे विकृतीला पोषक असा मजकूर मिळतो. ‘आपण एक गुन्हा केला तर काय झालं’ ही मानसिकता यामुळे निर्माण होते. गुन्ह्याशी संबंधित पर्याय, अंमलबजावणी, पळवाटा हे समाजमाध्यमांवर उपलब्ध असते. त्याचाच आधार घेत विकृतीकडे पुरुष झुकतात. एकप्रकारे कारण दृक-श्राव्य माध्यमे, समाजमाध्यमे आहेत. व्यक्ती एखादी घटना या माध्यमांवर बघते. पुरावे नष्ट करण्याचा मार्ग म्हणून खून हा पर्याय त्यांना दिसतो. यातून गुन्ह्यांची निर्मिती होते.

हेही वाचा : गटारी अमावस्येला कोकणाने पाहिलेले ‘ते’ २ अपघात; करुण अंताची कहाणी…
मणिपूरमधील घटना असो किंवा प्रादेशिक पातळींवर महिलांना बदनाम करण्यासाठी त्यांचे व्हिडीओ, ध्वनिफिती, छायाचित्रे काढणे असो, यातून स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा समान हक्कच नाकारला जातो. महिलेकडे उपभोग आणि दुर्बल व्यक्ती, असाहाय्य व्यक्ती म्हणून पाहिले जाते. सामाजिक तेढ निर्माण होतात किंवा दोन समाजांमध्ये जेव्हा वादंग होतात, तेव्हा त्यातील महिला हा तुलनेने सहजसोप्पे ‘लक्ष्य’ ठरते. त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांची धिंड काढून बदनामी करणे असे प्रकार केले जातात.
यात अजून एक बाजू दिसते ती म्हणजे समाज यामध्ये बघ्याची भूमिका घेतो. भारताच्या राजधानी दिल्लीमध्ये भर रस्त्यावर एका मुलीला दगडाने ठेचून मारले, तेव्हा समाज बघत राहिला, महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमधील मुलीवर कोयत्याने वार होताना समाज बघत राहिला, महाविद्यालयांच्या बाहेर मुलींकडे लाळघोटेपणाने बघणारे डोळे काही कमी नाहीत. ‘हिरवळ’ हा शब्दप्रयोग तर उघडपणे करण्यात येतो. त्यात मुलीही काही आक्षेप घेत नाहीत. पुण्यात जेव्हा एका मुलीवर कोयत्याने हल्ला झाला तेव्हा लेशपाल जवळगे सारखा तरुण पुढे आला. परंतु, समाजात सगळीकडेच लेशपाल जवळगे नाहीत. स्त्रीचा सन्मान करणारे आणि तिला माणूस म्हणून पाहणारे अल्प आहेत.

स्त्री ही माणूस नाही का ?

समाज हा विविध जातींमध्ये विभागला गेला. त्यानंतर काही समाजसुधारकांनी स्त्री आणि पुरुष याच दोन जाती मानल्या. परंतु, स्त्री आणि पुरुष या दोन भिन्न जाती असल्या तरी ते दोघेही माणूस आहेत. दोघांना संविधानाने समान जगण्याचा, राहण्याचा हक्क दिलेला आहे. पुरुषाला त्याचा व्हिडिओ करून बदनामी केलेली आवडत नाही, सहन होत नाही, तसे मग स्त्रीला ही होणार नाही. स्त्री ही कोणतीही सार्वजनिक मालमत्ता नाही. तिला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. तिला आत्मसन्मान आहे. तिला भावना आहे. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना दिलेले अधिकार तिलासुद्धा आहेत. मग अशा वेळी तिला लक्ष्य करणे, अयोग्यच आणि असमर्थनीय आहे. अब्रूनुकसानी ही त्या महिलेचीही होत असते, पर्यायाने तिच्याशी संबंधित नातेवाईक, कुटुंबीय यांचीही होते.
याबाबत मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर म्हणाल्या की, ”पुरुष-प्रधान संस्कृती जेव्हा विकृतीचे टोक गाठते तेव्हा स्त्रीवर होणारा अन्याय अमानुष होत जातो. लैंगिक अत्याचार करून तिच्या मानवी हक्कांचा आवाज दाबला जात असताना आपला समाज मात्र शांत राहतो. आपण स्रियांना सक्षम तरी कसे करणार? हा सगळा होणारा भीषण छळ स्त्रियांनी मानसिकरित्या दुर्बल राहावे, भीतीत राहावे म्हणूनच केला जातो.”

आज महिलांनी सक्षम आणि साक्षर होण्याची गरज आहे. साक्षरतेचे उपयोजन करणेही तेवढेच आवश्यक आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या मूलभूत गोष्टीच आज समाज विसरला आहे. अशा पार्श्वभूमीवर दुर्बल नव्हे तर सबल, सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two women naked in manipur where does such distortion come from in the society every time women are punished vvk
Show comments