उन्हाळा वाढू लागला की सर्वांची थंड सुमधुर दही खाण्याची इच्छा वाढते. परवा असेच एक रुग्ण चिकित्सालयात आल्यानंतर त्यांनी मला पहिलाच प्रश्न केला की, तुम्हा सर्व वैद्य मंडळींचे आणि दह्याचे काय वाकडे आहे? कोणत्याही वैद्याकडे गेले की तो प्रथम दही बंद करायला सांगतो. हवे तर त्याच दह्यापासून बनवलेले ताक चालेल, पण दही नको असे सांगतात. असे का बरे? दही आरोग्याला एवढे वाईट आहे का? मला त्यांच्या प्रश्नाचा अंदाज आला होता. त्यामुळे या विषयाच्या खोलात जाऊन माहिती देणे गरजेचे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर आजकाल सर्वांना कंपनीचे डब्यातील पॅकबंद दहीच मिळते. पूर्वीच्या काळी आजी दही लावायची. छान काळ्या मातीच्या मडक्यात उकळून कोमट झालेल्या दुधात सायंकाळी विरजण घातले व रात्रभर ठेवले की छान दही जमते. दही बनवण्याच्या पद्धती व त्याचा स्वाद यावरून त्याचे पाच प्रकार पडतात. मंद, गोड, आंबट-गोड, आंबट व अत्यंत आंबट असे हे पाच प्रकार. या प्रत्येक प्रकारानुसार, आजारानुसार व ऋतूनुसार दही सेवन केल्यास दह्याचे फार चांगले फायदे मिळतात. मात्र चुकीच्या पद्धतीने दही सेवन केल्यास नको असलेल्या आजारांनाही निमंत्रण मिळते. शरद, ग्रीष्म व वसंत ऋतूमध्ये दही खाणे हितकारक नसते. यामुळे कफ वाढून सर्दी, खोकला मागे लागतो. तसेच रात्रीदेखील दही खाऊ नये. खायचेच असेल तर त्यात तूप, साखर, मुगाची डाळ, मध किंवा आवळा घालून खावे. अदमुरे म्हणजे अर्धवट लागलेल्या दह्याला ‘मंद दही’ असे म्हणतात. याचेही सेवन करू नये. याने त्रिदोष वाढतात, तसेच पोट बिघडून वारंवार शौच व मूत्रप्रवृत्ती होते. आंबट व अत्यंत आंबट दहीसुद्धा सेवन करू नये. यामुळे अनेक पित्ताचे व अपचनाचे विकार मागे लागतात. म्हणजेच फक्त गोड व आंबट-गोड दही आपण खाऊ शकतो. जे दही चांगले लागले आहे, जे मधुर रसदार व थोडे आंबट असते त्याला गोड दही असे म्हणतात.

हेही वाचा… समुपदेशन: नोकरी – संसार मधला बॅलन्स कसा साधाल?

हे दही उत्तम समजले जाते. हे शक्तिवर्धक असून यामुळे पचनशक्तीसुद्धा सुधारते. भूक वाढते. मात्र मधुमेह झालेल्या व्यक्तीने कोणत्याच प्रकारचे दही सेवन करू नये. यामुळे मेद धातू बिघडून वृक्कांवरसुद्धा ताण येतो व आजार अजूनच वाढतो. देशी गाईच्या दुधाचे दही सर्वोत्तम समजले जाते. म्हशीचे जड व रक्तदुष्टी करणारे असते, मात्र उत्तम, स्निग्ध व वीर्यवर्धक असते. तर बकरीच्या दुधाचे दही हे पचायला हलके, त्रिदोषनाशक, भूक वाढविणारे व अशक्तपणा घालविणारे असते. त्याचप्रमाणे दह्यावर येणारी ‘सर’ म्हणजे दह्याची निवळी ही सुस्ती घालविणारी, भूक वाढविणारी, मन प्रसन्न करणारी व तहान भागविणारी असते. यामुळे पोटसुद्धा छान साफ होते.

हेही वाचा… स्त्रियांचे हक्क आणि मानवाधिकारांसाठी लढणारी लढवय्यी!

सर्दी झाली असता दही खाऊ नये, कारण याने कफ वाढून सर्दी अजूनच वाढते. मात्र ताज्या दह्यामध्ये मिरी व गूळ घालून खाल्ल्यास सर्दी बरी होते. येथे दही हे औषधाला योग्य ठिकाणी घेऊन जाण्याचे काम करते. म्हणून सर्दी बरी होते. त्याचप्रमाणे मूतखडा झाल्यास गोखारूचे मूळ गोड दह्यासोबत सात दिवस दिल्यास तो फुटून बारीक होतो अथवा विरघळून जातो. पोटात मुरडा आला असल्यास गोड दह्याबरोबर थोडे शंखजिरे मिसळून द्यावे, याने तात्काळ आराम वाटतो. अशा प्रकारे उत्तम वैद्य हा दह्याचे सर्व गुण जाणत असतो त्यामुळे तो प्रत्येक आजारानुसार दही कधी व कसे खावे ते सांगतो.

हेही वाचा… बहुविकलांगतेवर मात करणारी कृष्णा बंग आता वैद्यकीय शिक्षणात आघाडीवर; माय-लेकीचा प्रेरणादायी प्रवास

वैद्याचे आणि दह्याचे काहीही वाकडे नाही. उलट कित्येक औषधांचे अनुपान म्हणून दही वापरले जाते. त्यामुळे एखाद्या वैद्याने रुग्णास दही खाऊ नये असा सल्ला दिला असेल तर न खाणेच चांगले. पूर्वीच्या काळी आजीबाईच्या बटव्यातसुद्धा दह्याला फार महत्त्व होते व घरी ते कसे खावे, कसे खाऊ नये हे सांगितले जायचे. लहान मुलांना सर्दी, खोकल्याचे आजार होत असल्यास तर बिलकूल दही देऊ नये. लक्षात ठेवा आजार हे काही आकाशातून पडत नाहीत, ते आपल्या आहारातूनच निर्माण होत असतात. त्यामुळे उन्हाळा आला व थंड आहे म्हणून केवळ प्रत्येकानेच दही खाणे योग्य नाही.

harishpatankar@yahoo.co.in

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Types of curd and different ways to have curd to treat illness dvr