-डॉ. किशोर अतनूरकर

‘एन्डोमेट्रिओसिस’मुळे स्त्रियांमध्ये इच्छा असूनही व प्रयत्न करूनही मूलबाळ न होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. स्त्रियांच्या प्रजननसंस्थेशी संबंधित असणारा हा आजार अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे, पण जनसामान्यांना फारसा परिचित नाही. एन्डोमेट्रिओसिसला बोली भाषेत ‘पोटात पाळी येणं’ असं म्हणतात.

एन्डोमेट्रिओसिस म्हणजे नेमकं काय? तो का होतो? त्याचा बाळ न होण्याशी नेमका संबंध कसा? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मासिक पाळीची नैसर्गिक प्रक्रिया घडून येत असताना काय होत असतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

दर मासिक पाळीच्या वेळेस रक्तस्रावाबरोबर गर्भाशयाच्या आत असलेलं पेशीरूपी अस्तर बाहेर पडत असतं. दर महिन्यात तात्पुरत्या कालावधीसाठी तयार होणाऱ्या या अस्तराला वैद्यकीय परिभाषेत Endometrium असं म्हणतात. या अस्तराचं तयार होणं आणि साधारणतः महिन्याभराच्या कालावधीनंतर ते मोडून योनिमार्गानं पाळीच्या रूपात बाहेर पडणं, यावर ‘इस्ट्रोजेन’ आणि ‘प्रोजेस्टेरॉन’ या संप्रेरकांचं (हॉर्मोन्सचं) नियंत्रण असतं. ज्या स्त्रियांना एन्डोमेट्रिओसिसची समस्या असते, त्यांच्या प्रजननसंस्थेत काही कारणानं ही नैसर्गिक प्रक्रिया बिघडते. योनीमार्गातून बाहेर पडणारं हे पेशीरुपी अस्तर म्हणजे endometrium बाहेर पडण्याऐवजी, काही प्रमाणात शरीरातच इतर ठिकाणी साचून राहतं. गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या गर्भनलिकांना, स्त्री-बीजांडकोषांवर या पेशी चिकटून रहातात. दर महिन्याला साचून राहिलेल्या या पेशींचं रूपांतर गाठीतदेखील होऊ शकतं. या पेशी योनीमार्गात, योनिद्वारावरदेखील असू शकतात. प्रजननसंस्थेच्या बाहेर मूत्राशय, लहान-मोठं आतडं, क्वचितप्रसंगी फुफ्फुसातदेखील या पेशींचं अस्तिव असू शकतं. आपलं नेहमीचं स्थान सोडून endometrium जेव्हा इतरत्र जातं आणि त्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात, त्याला एन्डोमेट्रिओसिस असं म्हणतात.

हेही वाचा…देहविक्रेय व्यवसायाच्या शिकार महिलेस दंडित करणे कायद्याचा उद्देश नाही…

जेव्हा हे endometrium गर्भाशयाच्या स्नायूमध्ये पसरतं, त्या परिस्थितीला अडिनोमायोसिस (Adenomyosis) असं म्हणतात. बऱ्याचदा अडिनोमायोसिस आणि एन्डोमेट्रिओसिस दोन्ही समस्या एकत्रितपणे एकाच स्त्रीमध्ये असू शकतात. यात मजेची गोष्ट अशी आहे, की या पेशी इतरत्र कुठेही जरी असल्या, तरी त्या कार्यरत असतात आणि त्यांच्या कार्यावर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचं नियंत्रण असतं. एन्डोमेट्रिओसिसमुळे त्या स्त्रीला होणाऱ्या त्रासामागे हे हॉर्मोन्सचं नियंत्रण कारणीभूत असतं. जननक्षम वयात, लग्नापूर्वी, लग्नानंतर, रजोनिवृत्तीच्या आसपासच्या वर्षांतही स्त्रियांना अडिनोमायोसिस किंवा एन्डोमेट्रिओसिसचा त्रास होऊ शकतो.

यात स्त्रीला प्रामुख्यानं मासिक पाळीच्या वेळेस सहन न होण्याइतपत तीव्र वेदना आणि प्रमाणाबाहेर रक्तस्राव होणं, ही लक्षणं असू शकतात. एन्डोमेट्रिओसिसची समस्या असणाऱ्या स्त्रीला मासिक पाळीच्या वेळेसच्या वेदना एका ठराविक पद्धतीनं होतात. पाळी सुरु होण्याच्या अपेक्षित तारखेच्या काही दिवस अगोदरच दुखायला सुरुवात होते. गर्भाशयाच्या बाहेर एका बंदिस्त गाठीत रक्तस्त्राव झाल्यामुळे वेदना तीव्र असतात. पाळीच्या शेवटी तीव्रता वाढते. नंतर हळूहळू दुखायचं कमी होतं, पण ते पूर्णपणे कमी होत नाही. पुढची पाळी येईपर्यंत थोडं-थोडं दुखतंच राहतं. गर्भाशयाच्या बाहेर जिथे endometrium च्या पेशी आहेत, शरीराच्या त्या भागात दुखत राहणार. बहुतेक वेळेस ओटीपोट आणि कंबर या दोन भागात एन्डोमेट्रिओसिसच्या वेदना जास्त असतात.

हेही वाचा…निसर्गलिपी : रानभाज्या

साधारणतः एक तृतीयांश रुग्णांमध्ये हा आजार असूनदेखील तो सुप्त अवस्थेत असतो. सोनोग्राफी केल्यानंतरच तो लक्षात येतो. रोगनिदानासाठी आजकाल सोनोग्राफीचा वापर भरपूर प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हा आजार बऱ्याच स्त्रियांना असतो असं लक्षात आलं आहे. एन्डोमेट्रिओसिसच्या अचूक निदानासाठी हल्ली MRI ची तपासणीदेखील केली जाते.

लग्नानंतर साधारणतः दोन वर्षांचा कालावधी होऊन गेला, पाळणा लांबवण्याचं कोणतंही साधन वापरलं नाही, तरीही गर्भधारणा राहात नाहीये, अशी समस्या घेऊन स्त्री डॉक्टरकडे गेल्यानंतर विविध तपासण्या केल्या जातात. त्या तपासण्यांत अडिनोमायोसिस किंवा एन्डोमेट्रिओसिस किंवा कधी कधी दोन्ही समस्या कारणीभूत आहेत असं निष्पन्न होतं. गर्भाशयाच्या स्नायूंचं (Myometrium) आणि Endometrium च्या जंक्शनच्या ठिकाणी एक सदोष क्षेत्र तयार होणं, त्या स्नायूंच्या सूक्ष्म हालचालींवर विपरीत परिणाम होणं, गर्भाशयात शुक्राणूंच्या प्रवासात बाधा येणं, गर्भाशयात गर्भ रुजण्यासाठी विपरीत वातावरण तयार होणं, या सर्व कारणांमुळे अडिनोमायोसिस आणि एन्डोमेट्रिओसिस असणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भधारणा राहात नाही. टेस्ट ट्यूब बेबी ‘फेल’ होण्याचंदेखील हे एक कारण असू शकतं.

हेही वाचा…महाराष्ट्रातील दुर्गम भागातून थेट अवकाशाला गवसणी, गडचिरोलीच्या ‘या’ हवाई सुंदरीचा प्रवास वाचा

एवढंच नाही, तर अडिनोमायोसिसचा विपरीत परिणाम अपत्यजन्मावरदेखील होऊ शकतो असं निदर्शनास आलं आहे. पूर्ण ९ महिने होण्यापूर्वीच (premature) प्रसूती होणं, कमी वजनाचं बाळ जन्माला येणं, गर्भधारणा असताना रक्तदाब वाढणं, या समस्यांची शक्यता अडिनोमायोसिसबरोबरच्या गर्भधारणेत असू शकते. या स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपातदेखील होऊ शकतात.

अडिनोमायोसिस आणि एन्डोमेट्रिओसिस एकत्रित असताना वंधत्वावर उपचार करून सकारात्मक परिणाम साधणं, हे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक काम असतं. बऱ्याचदा अशा प्रकरणांत नैसर्गिक गर्भधारणेची वाट न पाहता ‘टेस्ट ट्यूब बेबी’चा पर्याय जास्त योग्य असतो.