भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक असलेली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण (Union Public Service Commission) होणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण, काही मोजकेच लोक ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी पद मिळवू शकतात. पण, आई-वडिलांची साथ आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतीही व्यक्ती ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो, हे आयएएस अधिकारी स्वाती मीना यांनी दाखवून दिले आहे.
अधिकारी स्वाती मीना यांनी ०.२ टक्के उमेदवारांच्या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे त्या त्यांच्या बॅचमधील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहेत. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली आहे. या सर्व प्रवासात त्यांना वडिलांची सर्वात मोलाची साथ लाभली. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काही खास कहाणी असते, त्यामुळे वयाच्या २२ व्या वर्षी UPSC उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झालेल्या स्वाती मीना यांची कहाणी जाणून घेऊ..
आयएएस अधिकारी स्वाती मीना यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात झाले. स्वातीच्या आईची इच्छा होती की, आपल्या मुलीने मोठी झाल्यावर डॉक्टर व्हावे आणि स्वाती यांना त्यावेळी काय करावे समजत नव्हते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वाती म्हणाल्या की, त्यांना डॉक्टर होण्यात कोणतीही अडचण नव्हती. पण, ती आठव्या वर्गात असताना तिच्या आईची चुलत बहीण अधिकारी झाली, तेव्हा स्वातीच्या वडिलांना तिला अधिकारी बनताना पाहून खूप आनंद झाला. वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून स्वातीनेही मोठी झाल्यावर अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. या निर्णयात वडिलांनी त्यांना खूप साथ दिली.
स्वाती मीना यांची आई एक व्यावसायिक महिला आहेत, ज्या पेट्रोल पंप चालवतात तर वडील राजस्थान प्रशासकीय सेवा (RAS) मध्ये अधिकारी आहेत. दरम्यान, स्वाती यांना यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी त्यांचे वडील मदत करायचे. वडिलांनी त्यांना परीक्षेच्या शेवटपर्यंत सतत तयारी करायला लावली होती. मुलाखतीच्या फेरीत ज्या प्रकारे मुलाखत घेतल्या जातात, तशाच स्वातीच्या अनेक मुलाखती त्यांनी घेतल्या, ज्यामुळे स्वाती यांना त्यांच्यात योग्य सुधारणा करण्यास खूप मदत झाली. याचाच परिणाम असा झाला की, २००७ साली झालेल्या UPSC परीक्षेत स्वाती मीना यांनी पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय २६० वा क्रमांक मिळविला आणि त्या आयएएस अधिकारी बनल्या. सध्या त्यांची पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाअंतर्गत असलेल्या पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दबंग अधिकारी म्हणून ओळख
आयएएस अधिकारी स्वाती मीना या निर्भय आणि दबंग अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मध्य प्रदेशातील मंडला येथे पोस्टिंग असताना त्यांनी खाण माफियांवर अतिशय कडक कारवाई केली होती. कलेक्टर म्हणून मंडला येथे पोहोचल्यावर त्यांनी खाण माफियांबद्दल अनेक विभागांच्या तक्रारी ऐकल्या, त्यानंतर त्यांनी माफियांवर कारवाई करून त्यांच्या टोळीचे कंबरडे मोडले. या घटनेनंतर खाण माफियांचे लोक त्यांना घाबरू लागले. याशिवाय स्वाती यांनी अतिशय आव्हानात्मक काम पूर्ण केले होते.