आयएएस, आयपीएस आणि आयएफएस बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना भारतातील सर्वात कठीण मानली जाणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक तास मेहनतीने अभ्यास करावा लागतो. त्यापैकी काही मोजकेच लोक या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत, प्रयत्न आणि सातत्य ठेवल्यास यश मिळतंच हे एका तरुणीने सिद्ध करून दाखवलं आहे.
आपल्या स्वप्नांना जिद्दीची जोड देत तनुश्री इन्कम टॅक्स ऑफिसर आणि सीआरपीएफची नोकरी सोडून आयपीएस अधिकारी झाली. कसा होता तिचा हा प्रवास पाहूयात..
इन्कम टॅक्स ऑफिसर, सीआरपीएफची नोकरी…वाया “आयपीएस”
तनुश्री सुरुवातीला २०१४ मध्ये सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून काम करत होती. या दरम्यान तिने इन्कम टॅक्स ऑफिसरसाठी परीक्षा दिली आणि त्यातही ती यशस्वी झाली. यानंतर ती इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत होती. एवढं असूनही तनुश्रीचं मुख्य ध्येय अजूनही साध्य झालं नव्हतं. तिचं स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हतं, त्यामुळे तिनं यूपीएससीची तयारी सुरू केली. २०१६ मध्ये तिने यूपीएससीची परीक्षा दिली, त्याचा निकाल मे २०१७ मध्ये आला. आणि पहिल्याच परीक्षेत ती पासही झाली. तनुश्रीला आयपीएस कॅडर मिळाले. त्यानंतर ती हैदराबाद येथील पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी गेली. संबंधित वृत्त zeenews संकेतस्थळाने दिले आहे
तनुश्रीचं प्राथमिक शिक्षण बिहारमधील मोतिहारी येथून झाले आहे, मात्र, त्यानंतर तनुश्रीच्या वडिलांची जिथे बदली व्हायची तिथे तिचे पुढचे शिक्षण सुरू राहिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर तनुश्री स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिल्लीला गेली. दिल्लीत कोचिंग व्यतिरिक्त तिने स्वतः प्रचंड मेहनत घेऊन यश खेचून आणलय.
हेही वाचा >> ३ वेळा अपयश! घर, नोकरी सांभाळून अभ्यास; ४२ व्या वर्षी मुलाबरोबर आईसुद्धा पास झाली स्पर्धा परीक्षा
पहिल्याच प्रयत्नात यश, मात्र त्यामागे प्रचंड मेहनत
आपलं स्वप्न पूर्ण करताना काहींना लवकर यश मिळतं तर काहींना आपलं आयुष्य खर्ची करावं लागतं. दरम्यान, तनुश्री पहिल्याच प्रयत्नात आयपीएस झाली असली, तरी त्यामागे तिची प्रचंड मेहनत आणि तारेवरची कसरत होती. तनुश्रीचे २०१५ मध्ये लग्न झालं, त्यानंतर तिच्यावर अभ्यास, नोकरीबरोबरच कुटुंबाचीही जबाबदारी होती. या सगळ्यातून तिने हे यश संपादन केले आहे. दरम्यान, तनुश्री आई-वडिलांकडून मार्गदर्शन मिळाल्याचे सांगते. तनुश्रीचं हे यश पाहून कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी आणि समाधानी असल्याचंही ती सांगते.