यूपीएससी परीक्षेचा प्रवास किती खडतर असतो हे सर्वांनाच माहीत आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, पण त्यातील काहीच विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करतात. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करत असतात. काही उमेदवार असेही आहेत, जे नोकरी करता करता या परीक्षेचा अभ्यास करत असतात. आज आपण अशाच एका महिला आयएएस अधिकारीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयएएस बनण्यासाठी सीएची नोकरीही सोडली.
हेही वाचा- मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…
आयएएस अधिकारी सोनल गोयल यांचा प्रवास यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे. सोनल गोयल यांचा जन्म हरियाणातील पानीपतमध्ये झाला. सोनल यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. वडिलांनी दिलेल्या सल्ल्यावरून सोनल यांनी एलएलबीचीही पदवी मिळवली आहे.
हेही वाचा- परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
पदवी परीक्षेनंतर सोनल एका फर्ममध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. जोडीला त्यांचा सीएचा अभ्यासही सुरू होता. सीए परीक्षेचा अभ्यास करत असताना सोनल यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. साल २००६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली, मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. त्यानंतर त्यांनी अभ्यास करण्याच्या पद्धतीत बदल केला व २००७ मध्ये पुन्हा एकदा यूपीएससीची परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. या परीक्षेत त्यांचा संपूर्ण भारतात १३ वा क्रमांक आला होता. सोनल सध्या त्रिपुरात निवासी आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शेअर केली यूपीएससी परीक्षेची मार्कलिस्ट
यूपीएससी परीक्षेचा आभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना प्रेरणा मिळावी म्हणून सोनल यांनी सोशल मीडियावर त्यांच्या यूपीएससीच्या मुख्य परीक्षेची गुणपत्रिका शेअर केली होती. सोनल यांनी जेव्हा पहिल्यांदा ही परीक्षा दिली होती तेव्हा त्यांना सामन्य ज्ञान विषयात खूप कमी गुण मिळाले होते. त्यामुळे त्यांना मुलाखतीचा फोन आला नाही. पण त्यांनी हार मानली नाही. आपली इच्छाशक्ती व प्रयत्नाच्या जोरावर त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.