Urmila Nimbalkar Viral Video: मराठी- हिंदी मालिकांमधून घरोघरी पोहोचलेली व त्यानंतर आता यूट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्व आयांचे लक्ष वेधून घेत आहे. “अगं, अगदी १००% पटलंय”, “केवढं खरं सांगितलंय”, “नशीब कोणीतरी हे बोलतंय” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ अनेकांच्या स्टेटसवर, स्टोरीजमध्ये पाहायला मिळतोय. व्हिडिओचा विषय काय तर आई आणि प्राधान्य! उर्मिलाने या व्हिडीओमध्ये एक हसरं बाळ सांभाळणाऱ्या, वाढवणाऱ्या आईची आपबिती सांगितली आहे. अनेकदा आपणही हा अनुभव घेतला असेल, या व्हिडीओचं वास्तव म्हणजे तुम्हाला उर्मिलाचं म्हणणं पटण्यासाठी तुम्ही आई असण्याचीही गरज नाही. याच पार्श्वभूमीवर चार वेगळ्या महिलांचे चार वेगळे अनुभव शेअर करत आहे..
मी आणि तुम्ही सुद्धा..
१) मी काम करते.. माझ्या ऑफिसची वेळ सकाळी ९ ते जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत.. लॉग इनचं टाइम ठरलं असलं तरी एकाला एक जोडून काम वाढतं; मुख्य म्हणजे मला माझं काम आवडतं. अनेकदा याच कामाच्या व्यापात मला घरात काय चालू आहे याचं भान राहत नाही. घर आवरलं जात नाही पण म्हणून मी अस्वच्छ आहे का?
२) माझं वय २७, माझ्या आईने लग्नाचा हट्ट धरलाय. माझा बॉयफ्रेंड आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, माझ्या घरच्यांनाही आमचं नातं मान्य आहे पण मला सध्या काम करायचंय आणि माझी लग्नाची इच्छाच होत नाहीये, पण म्हणजे मला घरच्यांची काळजी नाही का? की माझं त्याच्यावरचं प्रेम कमी आहे का?
३) माझं करिअर चांगलं सुरु आहे, माझी प्रगती होऊ शकते आणि होईलही. पण मला आता लग्न करायचंय. मला एक जोडीदार हवाय. समजून घेणारा, प्रेम करणारा, पण म्हणून मला करिअरची काळजी नाही का?
४) माझं वजन वाढलंय, पण अलीकडेच माझा हात फ्रॅक्चर झाला होता, त्यावेळी सांधे भरून निघण्यासाठी डॉक्टरांनी खूप अंडी, केळी खायला सांगितली होती. आता त्याने माझं वजन अजून वाढतंय मग मी नेमकं काय निवडू?
…विचार केला तर या चारही प्रश्नांमध्ये नेमकं काय निवडावं हे त्या प्रत्येक तरुणीला माहीत आहे. फक्त आपल्या निवडीला कसं प्राधान्य द्यायचं ‘नाही’, याची शिकवण आपल्याला लहानपणापासून दिली जाते. यामुळेच निर्णय घेण्याचा धीर होत नाही.
तुमच्याबरोबरही असं झालंय का? लग्नानंतर सासरची मंडळी, नवरा अगदी तुमची स्वतःची आई सुद्धा तुम्हाला कसं तू घराला प्राधान्य द्यायला हवं, हे सांगत असते दुसरीकडे तुमच्या मैत्रिणी, बॉस व तुमची पदवी तुम्हाला कसं करिअर निवडायचं हे खुणावत असते. अशावेळी एक सामान्य बाई जिथे कमीत कमी माणसं दुखावले जातील हा विचार करून निर्णय घेते पण इथेच आपण चुकतो. निर्णय, निवड हे तुमच्या प्राधान्याने व आवडीने तुम्ही ठरवायला हवं. एखाद्या वेळेस यात तुम्ही काहींची मनं दुखवाल पण जर तुम्ही स्वतः आनंदी राहिला नाहीत तर तुम्ही कोणालाच आनंदी ठेवू शकत नाही. हे ही लक्षात घ्यायला हवं.
सुदैवाने अलीकडे जॉब करणाऱ्या तरुणींची संख्या वाढतेय. पण याचा अर्थ ज्यांना ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं नसेल त्या चुकीच्या आहेत का? अर्थात प्रत्येकीने स्वतंत्रपणे स्वतःचा सांभाळ करता येईल एवढी सोय करणं गरजेचं आहे पण यासाठी मार्ग काय निवडायचा हा तुमचा निर्णय आहे. आणि तो तुम्हीच घ्यायला हवा.
तुम्हाला जर आता या क्षणी वाटत असेल की तुम्ही लग्न करायला हवं, जर तुम्ही स्वतःला सांभाळण्यास सक्षम असाल तर तुमच्या मैत्रिणी काय सांगतायत याचा विचार करण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आता मला काम करायचंय किंवा माझ्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत तर तुम्हाला घरचे काय सांगतायत हे पाहण्याची गरज नाही.
हे ही वाचा<< मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!
तुम्हाला आता या क्षणी सुदृढ राहण्यासाठी थोडं वजन वाढवावं लागलं तरी हरकत नाही. तुम्हाला ब्रेक घ्यावा वाटला तरी हरकत नाही, तुम्हाला सलग काम करावं वाटलं तरी हरकत नाही. सलग काम करताना घर अस्वच्छ राहत असेल तरी हरकत नाही.. मैत्रिणींनो, तुम्हाला जे जे वाटेल ते ते करण्यात हरकत नाहीये, हरकत तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही आनंदी नसाल!