‘सेलिब्रिटी’ लोकांचे अंडरआर्म्स कायम अगदी एकही केस नसलेले, क्लीअर आणि गुळगुळीत कसे दिसतात, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल! बहुतांश स्त्रिया अंडरआर्म्ससाठी केवळ वॅक्सिंग किंवा शेव्हिंग करतात. कदाचित तुम्हीही हा अनुभव घेतला असेल, की वॅक्सिंग वा शेव्हिंग केल्यानंतरही अंडरआर्म्स अगदी क्लीअर कधीच दिसत नाहीत. अंडरआर्म्सवर जिथे केस होते तिथे त्या केसांच्या बारीक बारीक खुणा राहिलेल्या असतात, तसंच त्या ठिकाणी काळपटपणा, सुरकुत्या याही नैसर्गिकरित्या असतातच. अंडरआर्म्सवर केस मुळातच कमी यावेत किंवा येऊच नयेत म्हणून अनेक मंडळी विविध कॉस्मेटिक ट्रीटमेंटस् घेतात, शिवाय तिथली त्वचा बाकीच्या त्वचेपेक्षा काळपट दिसू नये म्हणूनही काही ट्रीटमेंटस् असतात. मात्र त्या सर्वांनाच करणं शक्य नसतं आणि रुचणारंही नसू शकतं. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की या सगळ्यावर मेकअपवाल्यांनी एक तात्कालिक उपाय शोधून काढला आहे- तो म्हणजे अंडरआर्म्सवर चक्क ‘कन्सीलर’ लावण्याचा!

अंडरआर्म्सचा मेकअप

फाउंडेशन, कन्सीलर, लूज किंवा ट्रान्सल्युसंट पावडर आणि काँपॅक्ट पावडर ही खरंतर चेहऱ्यासाठीची सौंदर्यप्रसाधनं. पण याच साधनांचा उपयोग अंडरआर्म्ससाठीसुद्धा काही लोक करतात. चेहऱ्याचा मेकअप करताना प्रथम चेहऱ्यावरचे डाग लपवून त्वचेचा ‘टोन’ हा उजळ आणि एकसारखा दिसावा म्हणून फाउंडेशन चेहऱ्यावर सगळीकडे सारखं पसरवून लावतात. त्यावर कन्सीलर लावून मेकअपला आणखी ‘फिनिशिंग’ आणतात आणि शेवटी त्वचेच्या रंगाची वा ट्रान्सल्युसंट पावडर लावून दैनंदिन मेकअप पूर्ण करतात. हीच सगळी क्रिया काही मंडळी अंडरआर्म्सच्या बाबतीतसुद्धा करतात. मात्र यात एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी, की कोणतंही मेकअप प्रॉडक्ट अंडरआर्म्सवर अति प्रमाणात लावून चालणार नाही. त्या जागी घाम येतो हे ध्यानात ठेवायला हवं.

डीओड्रंट आणि कन्सीलर- दोन्हीचं काम करणारी खास सौंदर्यप्रसाधनं

हल्ली ‘डीओड्रंट’ आणि ‘कन्सीलर’ या दोहोंचं काम एकत्र करणारी काही सौंदर्यप्रसाधनं आंतरराष्ट्रीय मेकअप बाजारात दिसू लागली आहेत. लहान ट्यूबसारख्या पॅकेजमध्ये मिळणारं हे ‘डीओड्रंट प्लस कन्सीलर’ अंडरआर्म्सवर लावून अंडरआर्म्ससाठी ठेवलेल्या वेगळ्या ब्रशनं ते तिथे पसरवतात. काही सेकंदांत ते वाळतं आणि सुगंध देण्याबरोबरच अंडरआर्म्सवरचं बारीक बारीक ‘पिगमेंटेशन’ आणि ‘स्ट्रेच मार्क्स’ दिसेनासे करतं. त्याबरोबरच अंडरआर्म्स उजळ दिसतात. ही सौंदर्यप्रसाधनं वेगवेगळ्या त्वचारंगांमध्ये मिळतात आणि ती आपल्या त्वचेच्या रंगाला ‘मॅच’ होणारी अशी निवडून वापरली जातात.

या सगळ्याची गरज आहे का?

मुळीच नाही! ही प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीची आणि तुम्हाला कशा पद्धतीनं राहाणं ‘कंफर्टेबल’ वाटेल याची गोष्ट आहे. उदा. काही लोकांना कोणत्याही प्रकारचा मेकअप- अगदी चेहऱ्यावरही करायला आवडत नाही, नैसर्गिकच दिसायला आवडतं, तसंच. बहुतेक सर्व स्त्रिया आणि मुली स्लीव्हलेस कपडे घालताना अंडरआर्म्स वॅक्स किंवा शेव्ह करतातच. त्यानंतर आणखी काहीही करण्याची खरंतर अजिबात गरज नसते. अंडरआर्म्सवर जे काही पिगमेंटेशन, केसांच्या काळ्या ठिपक्यांसारख्या खुणा आणि स्ट्रेच मार्क्स दिसतात, तो नैसर्गिक दिसण्याचाच भाग आहे. परंतु तुम्हाला जर त्या प्रकारे राहाणं कंफर्टेबल वाटत नसेल आणि अंडरआर्म्स अगदी क्लीअर, गुळगुळीत दिसणंच तुम्हाला अपेक्षित असेल, तर अशा काही शक्कली वापरून पाहण्यास हरकत नसावी! शेवटी मेकअपमध्ये आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही इतक्या नवनवीन पद्धती आणि उत्पादनं येत असतात, त्याचाच हा एक भाग आहे.