–संपदा सोवनी
‘चतुरां’नो, आता प्रवासाचे दिवस सुरू झालेत बरं! पावसाचा परतीचा काळ, सगळीकडे हिरवागार झालेला निसर्ग, काही आठवड्यांत अनेक ठिकाणी थोडी थोडी थंडीची चाहूलसुद्धा लागेल. त्यात सणांचा मौसम असल्यामुळे उत्फुल्ल झालेलं मन… नव्या ठिकाणी प्रवासाला जाण्यासाठी प्लान करायचे हेच ते दिवस. मग तुम्हीही करताय का एखाद्या ‘सोलो ट्रिप’चा प्लान?… मात्र अशा सहलींना जाताना स्त्रियांना एक प्रश्न नेहमी पडलेला असतो, तो म्हणजे प्रवास करताना किंवा मध्ये थांबल्यानंतर किमान स्वच्छता असलेलं स्वच्छतागृह मिळेल का?… आपल्याकडे पुरूषांना अर्थातच ही समस्या भेडसावत नाही. पण मग स्त्रियांनी ही चिंता दूर कशी करावी?… हल्ली स्त्रियांना सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना स्वच्छतेबद्दल अडचणी येऊ नयेत यासाठी वेगवेगळी उत्पादनं बाजारात आहेत. टॉयलेट सीट कव्हर्स सर्वांना माहिती असतात, टॉयलेट सीट सॅनिटाइज करण्यासाठीचे स्प्रेसुद्धा लोकप्रिय आहेत, अगदी स्त्रियांना टॉयलेट सीटवर बसायची वेळ न येता त्यांना पुरूषांप्रमाणे उभं राहून मूत्रविसर्जन करता यावं यासाठीचे जाड पुठ्ठ्यासारख्या कागदाचे कोनसुद्धा काहीजणी वापरतात. या सर्व गोष्टीपेक्षा थोडासा वेगळा प्रकार हल्ली ऑनलाइन शॉपिंग साइटस् वर दिसतो- तो पर्याय म्हणजे ‘डिस्पोझेबल युरिन बॅग्ज’ किंवा ‘डिस्पोझेबल पी पाउच’. याला काहीजण ‘मिनी टॉयलेट’सुद्धा म्हणतात.
निसर्गसहली, ट्रेकिंग, कॅम्पिंग अशा काही सहलींच्या ठिकाणी स्वच्छतागृहं उपलब्ध असतातच असं नाही, शिवाय इतर सहलींमध्ये अनेकदा स्वच्छतागृहं उपलब्ध झाली, तरी अस्वच्छतेमुळे त्यातील टॉयलेटस् वर बसावं अशी अजिबात परिस्थिती नसते. किंवा कित्येकदा न थांबता लांबचा प्रवास करावा लागतो आणि ट्रेन वा बसमध्ये टॉयलेट असेल, तरी ते वापरण्याजोगं नसतं, अशा वेळी या बॅग्ज वापरल्या जातात.
युरिन बॅग्ज या दिसायला साध्या प्लास्टिक बॅग किंवा पेपर बॅगसारख्या दिसतात आणि पर्समध्ये सहज बसतात. यातल्या बहुतेक बॅग्जना वरच्या बाजूस कोनिकल रचना दिलेली असते, जेणे करून स्त्रियांना पुरूषांप्रमाणे मूत्रविसर्जन करण्यासाठी या बॅगचा वापर करता यावा. साधारणपणे युरिन बॅग्जच्या वरच्या आवरणाच्या आत एक कॉटन पॅडसारखा ‘अबसॉर्बंट पॉलिमर मटेरिअल’चा एक पाऊच दिलेला असतो. कल्पना अशी, की दिलेल्या बॅगमध्ये मूत्रविसर्जन केल्यानंतर ते आत ठेवलेल्या पॉलिमर पाऊचच्या संपर्कात येतं आणि जवळपास मिनिटभरातच द्रवाचं जेलमध्ये रुपांतर होतं. मूत्रविसर्जनानंतर ही बॅग सील करायची असते. बॅग सील करायलाही त्यावरच खास प्रकारची सोय केलेली असते- उदा. ‘सेल्फ सीलिंग’ रचना. पूर्ण वापरून झाल्यावर सील केलेली बॅग कचऱ्यात टाकतात. एकदा द्रवाचं जेलमध्ये रुपांतर झाल्यावर त्याची दुर्गंधी येत नाही, असा दावा केला जातो. या बॅग्जमध्ये साधारणत: ६०० ते ७०० मिली द्रवपदार्थाचं जेलमध्ये रुपांतर होऊ शकतं. त्यामुळे ती किमान दोन वेळा किंवा पूर्ण क्षमता भरेपर्यंत वापरता येईल, असं सांगितलं जातं.
शॉपिंग साइटस् वर बघितलं, तर या युरिन बॅग्जच्या रचनेनुसार व दर्जानुसार त्यांच्या किमतीत खूपच फरक दिसतो आणि त्यातल्या त्यात चांगला दर्जाच्या दिसणाऱ्या, कोनिकल रचना असलेल्या युरिन बॅग्ज सध्या खूपच महाग आहेत. कोनिकल रचना नसलेल्या व साध्या पेपर बॅगसारख्या दिसणाऱ्या युरिन बॅग्ज तुलनेनं स्वस्त आहेत, मात्र विशिष्ट कोनिकल रचना नसल्यानं त्यांचा वापर स्त्रियांना अवघड जाऊ शकतो. तरीही अगदीच नाईलाज होऊ शकेल अशी परिस्थिती असता युरिन बॅग्ज वापरून पाहता येतील. या बॅग्ज ‘वॉमिट बॅग्ज’म्हणून- अर्थात प्रवासात गाडी लागल्यावरही वापरता येतात. शिवाय या पिशव्यांचा वापर केवळ स्त्रियाच नाही, तर वृद्ध आणि पुरूषसुद्धा करू शकतात.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ टॉयलेटस् कधी उपलब्ध होतील हे सांगणं कठीण आहे, मात्र अशा प्रकारची उत्पादनं अधिक ‘यूझर फ्रेंडली’, खिशाला परवडतील अशा दरात आणि शक्य झाल्यास पर्यावरणपूरक रूपात उपलब्ध झाली, तर स्त्रियांना ‘आम्ही जायचं कुठे?’ हा नित्याचा पडणारा प्रश्न पडणार नाही.