थंडी हवीहवीशी वाटत असली तरी या ऋतूत त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर हीच थंडी बोचरी ठरू शकते. थंडीत आपल्यापैकी बहुतेकांची त्वचा एरवीपेक्षा कोरडी, रुक्ष आणि निस्तेज होते. त्यात बाहेर जास्त वेळ राहायचं असेल तर त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचा आणखीनच कोरडी होते. त्वचेचा हा कोरडेपणा कमी करण्यासाठी आपण मॉयश्चरायझर लावतो खरं. पण तो तात्पुरता उपाय असतो. कारण थोड्या वेळाने पुन्हा त्वचा कोरडी होतेच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारखं सारखं काही आपण मॉयश्चरायझर लावू शकत नाही. त्यासाठी त्वचेला आतूनच पोषण मिळणं गरजेचं आहे. जर त्वचा आतूनच चांगली असेल तर त्याला फार काही करण्याची गरजही पडत नाही. आणि त्वचा चांगली राहण्यासाठी आपल्याकडे खूप पारंपरिक उपाय आहेत. आपल्या आजी पणजीपासूनचे हे घरगुती उपाय तुमची त्वचा अगदी कडाक्याच्या थंडीतही मस्त ग्लोईंग आणि हेल्दी ठेवतील. साय हे सर्वोत्तम मॉयश्चरायझर आहे. आपल्या सगळ्यांच्या घरात साय अगदी सहज उपलब्ध असते. या सायीचा वापर करुन वेगवेगळे फेस मास्क तयार करु शकतो. ज्यामुळे तुमची स्कीन अगदी चमकदार राहील. या फेसपॅकमुळे तुमची त्वचा नितळ होईल आणि थंडीतही मऊसर राहील.

१) साय आणि बदाम
४ ते ५ बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे भिजवलेले बदाम जरा जाडसर वाटून घ्या. त्यामध्ये साय मिसळून दाट पेस्ट तयार करा. हा मास्क चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटं तसाच ठेवा. त्यानंतर धुऊन टाका. हा मास्क लावल्यानं त्वचा मऊ तर होईलच आणि त्याचबरोबर चमकदारही !

२) साय आणि चंदन –
सायीमध्ये चंदन पावडर, मध आणि गुलाबपाणी घालून दाट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. या पॅकमुळे तुमच्या त्वचेचा रंगही सुधारेल आणि त्वचा हायड्रेटही होईल.

३) साय आणि मुलतानी माती –
साय आणि मुलतानी माती एकत्र करून त्याचा फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहरा आणि मानेवर १० ते १५ मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्यानं चेहरा धुऊन टाका. या पॅकमुळे चेहरा मॉईश्चराईज तर होईलच पण चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होण्यातही मदत होईल.

४) साय आणि बीट-
तुमची त्वचा जर जास्तच निस्तेज आणि रुक्ष झाली असेल तर हा फेसपॅक तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. सायीमध्ये बिटाचा रस मिक्स करुन पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा ग्लोईंग आणि उजळ होते. गालही नॅचरली पिंक होतात. सायीप्रमाणेच मधही चेहऱ्यासाठी उत्तम आहे. यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. तसंच थंडीत मिळणाऱ्या गाजर, बीट, पपई यांचा वापर करुनही तुम्ही तुमच्या स्कीनला मॉईश्चराईज करु शकता.

५) मध आणि गाजर-
थंडीत सगळीकडे मस्त गुलाबी गाजरं अगदी सहज उपलब्ध असतात. ही गाजरं खाण्यासाठी तर चांगली आहेतच पण त्वचेसाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्हाला जर तुमची त्वचा पिंक आणि ग्लोईंग अशी हवी असेल तर त्यासाठी गाजर अगदी उपयोगी आहे. गाजर किसून घ्या आणि तो कीस घट्ट पिळून त्याचा रस काढून ग्या. त्यात अर्धा चमचा मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर चेहरा गार पाण्यानं धुऊन टाका. तुमच्या त्वचेचा कोरडेपणा आणि निस्तेजपणा निघून जाईल.

६) कच्चं दूध आणि बीट-
तुमची त्वचा जर खूप तेलकट असेल तर चेहऱ्यावर सायीऐवजी कच्चं म्हणजे नीरसं दूध लावा. बीटाच्या रसात कच्चं दूध घालून ते चेहऱ्यावर लावा. या पॅकमुळे चेहऱ्यावरच्या एक्नेची समस्या कमी होते आणि स्कीनवर ग्लो येतो.

७) पपई आणि ॲलोव्हेरा जेल
त्वचेसाठी ॲलोव्हेरा म्हणजे कोरफड सगळ्या ऋतुंमध्ये अगदी बेस्ट आहे. थंडीमुळे तुमची त्वचा जर अगदी निस्तेज झाली असेल तर पपई कुस्करुन त्यात ॲलोव्हेरा जेल मिक्स करा. हा पॅक लावल्यानं त्वचेचा पोत उजळतो.

तुम्हाला चेहऱ्यावरची डेड स्कीन काढायची असेल आणि त्वचा अगदी स्वच्छ करायची असेल तर डाळीच्या पिठासारखा दुसरा उपाय नाही. आपल्याकडे चेहऱ्यासाठी वर्षानुवर्षे डाळीचं पीठ वापरलं जातं. डाळीच्या पिठात दही आणि किंचित मध मिक्स करून पॅक तयार करा. तुम्हाला हवं असेल तर यात चिमूटभर हळद किंवा चंदन पावडरही घालू शकता.

हा पॅक चेहरा आणि मानेवर अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुऊन टाका. यामुळे त्वचेचा रंग उजळतो, त्वचा मॉयश्चराईज आणि मऊ होते. हे मास्क तुमच्या चेहऱ्याला सूट होत आहेत ना हे मात्र आधी तपासून बघा. जर तुमची त्वचेसाठी ब्युटी ट्रीटमेंट करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच हे फेसपॅक वापरा.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use this homemade face pack is used if the skin is dry in winter tmb 01