सध्या अनेक भागांत थंडीला थोडी-थोडी सुरूवात होऊ लागली आहे. थंडी आणि स्वेटर वा स्वेटशर्ट हे सामान्य समीकरण असलं, तरी या बाबतीतही फॅशनमध्ये आता वैविध्य आलं आहे. स्वेटर आणि स्वेटशर्ट हा बरोबर वेगळा वागवावा लागतो. ते टाळून थंडी असेल तेव्हा विंटर कुर्ता किंवा विंटर कुर्ती वापरण्यास स्त्रिया आणि मुली पसंती देऊ लागल्या आहेत. त्यामुळेच जवळजवळ प्रत्येक ब्रॅण्डच्या नवीन ‘कलेक्शन’मध्ये सध्या विंटर कुर्ते जोरात आहेत.
आणखी वाचा : बघतोय रिक्षावाला… आरशातून !
काय असतो विंटर कुर्ता?
विंटर कुर्ता हा सर्वसाधारणपणे चक्क ‘वूलन कुर्ता’ असतो. बाजारात तयार मिळणाऱ्या स्वेटर्समध्ये पातळ वूलन स्वेटर्स मिळतात, तेच ‘ॲक्रेलिक’ हे मटेरियल या कुर्त्यांमध्ये वापरलेलं असतं. शिवाय या कुर्त्यांच्या बाह्या पूर्ण लांबीच्या असतात आणि उंचीलाही हे कुर्ते अधिक- म्हणजे पोटरीपर्यंत येणारे असतात. ॲक्रेलिक कापड ‘स्ट्रेचेबल’ असतं, त्यामुळे हे कुर्ते अगदी अंगाबरोबर बसतात. त्यामुळेच यातल्या बहुतेक कुर्त्यांचे गळे अजिबात खोल नसतात, ते आपल्या गळ्यापाशी घट्ट बसणारे असतात. संध्याकाळच्या वेळी एखाद्या खुल्या मैदानात होणाऱ्या कार्यक्रमाला जाताना, रात्रीच्या थंडीत फिरायला जाताना, वातानुकूलित अशा थंड सभागृहांमधल्या कार्यक्रमांसाठी हे कुर्ते वापरणं सोईचं ठरतं. त्यामुळे स्वेटर वा जॅकेट घालणं वाचतं आणि थंडीपासून पुरेसा बचावही होतो.
आणखी वाचा : …त्याचं कारण फक्त ‘बिग बॉस’च!
विंटर कुर्ता घालताना
- विंटर कुर्ता स्ट्रेचेबल असल्यामुळे त्याचं ‘फिटिंग’ आपल्या नेहमीच्या कुडत्यांपेक्षा वेगळं असतं. त्यामुळे खरेदीपूर्वी तो घालून पाहाणं आवश्यक आहे. स्ट्रेचेबल कापड वापरल्यावर काहीसं सैल पडतं, त्यामुळे कुडत्याचं फिटिंग काहीसं बदलू शकतं, ही गोष्ट हे कुर्ते वापरताना लक्षात ठेवायला हवी.
- हे कुर्ते फिटिंगमध्ये बसत असल्यानं, शिवाय त्यांची उंची जास्त असल्यानं त्यावर लेगिंगपेक्षा ट्राऊझर किंवा पलाझो अधिक चांगली दिसते.
- या कुर्त्यांचे रंग हे साधारणपणे वूलन किंवा पातळ स्वेटरच्या कापडातले गडद रंग असतात. उदा. गडद लाल, मरून, मस्टर्ड, टील (मोरपंखी), बॉटल ग्रीन, काळा इत्यादी. कुर्ता प्लेन असेल, तर त्यावर कंटेंपररी ज्वेलरी चांगली दिसते.
- या कुर्त्यांमध्ये कापडावर डिझाईन कमी प्रमाणात आढळतं. परंतु कापडात डिझाईन विणलेलं असलं, तरी ते स्ट्रेचेबल असल्यामुळे घातल्यावर ताणलं जाईल, हे लक्षात घ्यायला हवं. प्लेन ॲक्रेलिक स्ट्रेचेबल कापडावर एम्ब्रॉयडरी केलेले विंटर कुडतेही मिळतात. ते लहान समारंभांसाठी चांगले दिसू शकतील.
- दिवसभर बाहेर फिरण्यासाठी मात्र हे कुर्ते अडचणीचे ठरू शकतात, कारण आपल्याकडे संपूर्ण दिवसभर थंडी नसते. दुपारी बहुतेक भागांत ऊन पडतं, अनेक भागांत उष्ण, दमट हवामान असू शकतं, रस्त्यांवर प्रचंड धूळ असू शकते. अशा वेळी हे कुर्ते त्रासदायक भासू शकतील. शिवाय या कुर्त्यांच्या बाह्या पूर्ण लांबीच्या असल्यामुळेही ते संपूर्ण दिवस घालण्यासाठी कदाचित सुटसुटीत वाटणार नाहीत.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नानंतर वर्षभर मूल होऊ देणं टाळायचं असल्यास काय करावं?
विंटर कुर्त्यांची देखभाल
विंटर कुर्त्याचं कापड सैल न पडण्याच्या दृष्टीनं कुडत्याची देखभाल करणं आवश्यक असतं. उदा. हे कुर्ते साधारणपणे गार पाण्यातच धुवायचे असतात. खूप तीव्र असं डिटर्जंट वापरून चालत नाही. सौम्य डिटर्जंट वापरावं. कुर्ता धुवून झाल्यावर तो हातानं पिळू नये, शक्यतो वॉशिंग मशीनमध्ये ‘स्पिन’ करावा (याला ‘टम्बल ड्राय’ करणं असंही म्हणतात.)
आणखी वाचा : SRGMP L’il Champs: रिक्षा चालकाच्या ‘या’ मुलींनी घातलीय संपूर्ण देशाला भुरळ !
या कुर्त्यांना इस्त्री करण्याचीही खास पद्धत असते. शक्यतो कुर्ते उलटे करून- म्हणजे ‘इनसाईड आऊट’ करून इस्त्रीचं सेटिंग सौम्य ठेवून (वूलन कपड्यांसाठी साधारणपणे हे सेटिंग वापरलं जातं. याला ‘वूल’ किंवा ‘कूल आयर्न’ असंही म्हणतात.) इस्त्री करतात. त्यातूनही कुर्त्याचं कापड खराब होऊ शकेल असं वाटल्यास इस्त्री आणि कुर्त्याच्या मध्ये किंचित दमट असा टॉवेल ठेवून सावधपणे इस्त्री करता येते. त्यातून मोठ्या ब्रँडस् च्या कुडत्यांच्या लेबलवर त्यांची देखभाल कशी करावी ही माहिती तुम्हाला नक्की सापडेल.