अंकिता तोपाल उत्तरांखडची आहे. उत्तराखंडमधल्या चमोली इथलं डिडोली हे तिचं गाव. छोट्यासा गावातली असली तरी अंकिताच्या यशाने आभाळ व्यापलं आहे. गावातून देवाल विकासखंडमधून तिनं १०वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ऋषीकेशमधून पुढचं शिक्षण घेतलं तर उच्च शिक्षण तिनं डेहराडूनमधून घेतलं आहे. अंकितानं इतिहासामध्ये पोस्टग्रॅज्युएशन केलेलं आहे. दिव्यांग असूनही तिनं तिच्या कमतरतेला कधीच तिच्या स्वप्नांच्या आड येऊ दिलं नाही.
धडधाकट असूनही हाताच्या रेषांवर विसंबून असणारे कितीतरी जण आपल्या आजूबाजूला तुम्हाला दिसत असतील. नशिबाला दोष देऊन रडत बसणारेही काही कमी नाहीत. पण आपल्याकडे जे नाही त्यावर रडत कुढत बसण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानून यशाचं शिखर गाठणारेही काहीजण असतात. अशीच प्रेरणादायी कथा आहे अंकिता तोपाल हिची. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटं असतात. त्या संकटांवर मात करण्यासाठी निर्धार लागतोच. पण अंकिताचा प्रवास पाहिला तर तिच्या दृढ इच्छाशक्तीला आणि कमालीच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो.
जन्मापासून दोन्ही हात नसलेल्या अंकितानं आपल्या जिद्द आणि अविरत मेहनतीच्या जोरावर प्रतिष्ठेची ‘जेआरएफ’ शिष्यवृत्ती मिळवली आहे. फक्त इतकंच नाही. तर NET-JRF मध्ये तिनं देशभरात दुसरं स्थान मिळवलं आहे. हाताला थोडंसं लागलं तरी आपल्याला कळवळायला होतं. आपली कामं थांबतात. पण जन्मापासून दोन्ही हात नसलेल्या अंकितानं तिच्या पायांनाच हात बनवलं आणि जे जे शक्य आहे ते सगळं केलं. पायांच्या सहाय्याने तिनं अक्षरं गिरवली…अभ्यास केला, परीक्षेचे पेपर लिहीले…इतकंच नाही तर जे स्वप्नं तिनं पाहिलं होतं तेही तिनं पायांच्या मदतीनंच पूर्ण केलं. NET चे पेपर्सही तिनं पायानंच लिहिले.
अंकिता उत्तरांखडची आहे. उत्तराखंडमधल्या चमोली इथलं डिडोली हे तिचं गाव. छोट्यासा गावातली असली तरी अंकिताच्या यशाने आभाळ व्यापलं आहे. गावातून देवाल विकासखंडमधून तिनं १०वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ऋषीकेशमधून पुढचं शिक्षण घेतलं तर उच्च शिक्षण तिनं डेहराडूनमधून घेतलं आहे. अंकितानं इतिहासामध्ये पोस्टग्रॅज्युएशन केलेलं आहे. दिव्यांग असूनही तिनं तिच्या कमतरतेला कधीच तिच्या स्वप्नांच्या आड येऊ दिलं नाही. ती NET परीक्षा दोन वेळेस उत्तीर्ण झाली आहे. त्याचबरोबर अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या ज्युनिअर रिसर्च फेलोशिफसाठीही(JRF) ती पात्र ठरली. JRF तर ती उत्तीर्ण झालीच. पण त्याचबरोबर NET परीक्षेत तिला ऑल इंडिया २ रँकही मिळालं.
अंकिताच्या यशात आणि एकूणच तिच्या प्रवासात तिच्या पालकांचा मोठं योगदान आहे. तिचे वडील प्रेमसिंह टिहरी इथल्या आयटीआयमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात. लहानपणापासूनच अंकिता अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिला अभ्यास करायला आवडायचं. हात नाहीत म्हणून ती कधीच रडत बसली नाही. उलट शाळेत पहिल्यापासूनच ती टॉपर होती. तिच्या आईवडिलांनीही आपल्या मुलीला कधीच कमजोर पडू दिलं नाही. ते तिला सतत प्रोत्साहन देत राहिले, तिच्या प्रयत्नांना साथ देत राहिले. त्यामुळेच आपल्यात काही कमतरता आहे असं अंकिताला कधीच वाटलं नाही.
NET आणि JRF साठी तिनं दोन वर्षे जीव तोडून मेहनत केली. अन्य परीक्षांपेक्षा या परीक्षा कठीण समजल्या जातात. बाकी सगळ्या गोष्टींकडे तिनं साफ दुर्लक्ष केलं. तिचं ध्येय स्पष्ट होतं. पायाच्या बोटांनी पेपर लिहिण्याचा तिला सराव होता. पण या परीक्षेसाठी तिनं खास तयारी केली. NET पास झालेले सगळेचजण JRF साठी पात्र ठरत नाहीत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) वतीने JRF परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा वर्षातून जून आणि डिसेंबरमध्ये होते. ही एक पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा पास झाल्यावर उमेदवाराला कोणत्याही सेंट्रल युनिव्हर्सिटी किंवा त्याअंतर्गत येणाऱ्या कोणात्याही शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच्या आवडीच्या विषयावर पीएचडी करण्याची संधी मिळते. संशोधनासाठी भारत सरकारच्या वतीने फंड दिला जातो. JRF मिळाल्याने अंकिता आता तिच्या आवडीच्या विषयावर पीएचडी करू शकणार आहे.
हाताच्या रेषा पाहण्यापेक्षा त्याचा उपयोग करून आपलं नशिब घडवण्यासाठी प्रयत्न करा असं म्हटलं जातं. पण हातच नसलेल्या अंकितानं मात्र पायानं आपलं नशिब घडवलं. अशक्य वाटणारी गोष्ट तिनं दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर करून दाखवली.
“कभी मैं अपनी हाथों की
लकीरों सें नहीं उलझा…
मुझे मालूम हैं,
किस्मत का लिक्खा भी बदलता हैं…”
प्रसिध्द उर्दू शायर बशीर बद्र यांचं हे म्हणणं अंकितानं प्रत्यक्षात खरं करून दाखवलं. तिच्या जिद्दीला सलाम!