डॉ. उल्का नातू गडम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसनांचे वर्णन करताना ‘आसनमिती स्वरूपेसमासन्नता’ असे गोरक्षनाथ आपल्या ‘सिद्धसिद्धांतपद्धती’ या ग्रंथात म्हणतात. आपण आरशात स्वतःला रोजच पाहतो. ते तर आपल्याला खूप आवडते, पण हे पाहताना काळे-गोरे, उंच-बुटके, जाड- बारीक, सुंदर-कुरुप, प्रसन्न-उदास, छान- अस्ताव्यस्त अशी अनेक विशेषणे आपण स्वतःच्या बाबतीत तपासून पाहतो. रोजच्या बाह्य सौंदर्यामध्ये बाधा आलेली दिसली की, आपण अस्वस्थ होतो व लगेच स्वतःला ठीकठाक करण्यासाठी प्रयत्न सुरू करतो.

आसने करण्याचे उद्दिष्ट बाह्यसौंदर्य वाढविणे आहेच. पण त्याच बरोबर शारीरिक स्वास्थ्य घडविणे हेही आहे. पण त्या पलीकडे जाऊन छान शरीरात छान मन राहू शकते हा अर्थ इथे अधिक अभिप्रेत आहे.

आसने म्हणजे ‘स्वतःच्या रूपाच्या’ जवळ गेल्यासारखे आहे. म्हणजे स्वरूपाच्या जवळ जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु याचा अर्थ प्रत्यक्ष पोचलो असे नाही.

स्त्रियांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त विशेष करून ओटीपोटातील अतिरिक्त रक्तसंचय दूर करणारी एक कृती आपण पाहून घेऊ. ती आहे वज्रासनस्थ योगमुद्रा.

नावाप्रमाणे अर्थात प्रथम वज्रासनात स्थिर व्हा. आता दोन्ही हातांच्या मुठी वळून उजवी मूठ उजव्या जांघेजवळ व डावी मूठ डाव्या जांघेजवळ ठेवा. पाठकणा प्रथम जमिनीस काटकोनात राहील. आता कमरेपासून डोक्यापर्यंत शरीर ताठ ठेवून कमरेतून खाली झुकायला सुरुवात करा.

ओटीपोट, छाती, खांदे पुढे आणावे. कपाळ जमिनीवर लावावे. कुठल्याही क्षणी श्वास रोखून धरू नये. नियमित श्वसन चालू ठेवा. अंतिम स्थितीत श्वासावर लक्ष म्हणजेच प्राणधारणा करा. साधारण तीन ते पाच श्वास या स्थितीत थांबून उलट चाल करा.

अधिक थांबता येत नसेल तर अधिक आवर्तने करा. मासिक पाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी, अधिक रक्तस्त्राव यावर ही मुद्रा खूप प्रभावशाली आहे.

ulka.natu@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vajrasana yoga how to do it and what are its benefits nrp
Show comments