योगासने हा योग साधनेचा अविभाज्य भाग आहे. किंबहुना योगासने म्हणजेच योग, ही कल्पना आपल्या मनात घट्ट रुजलेली आहे. खरे तर शरीर ज्या स्थितीत राहिले असता मन आणि शरीर या दोहोंना सुख वाटेल आणि स्थिरता प्राप्त होईल ते हे आसन होय.
सुरुवातीस आसन साधना करावी, असे चतुरंग योग, अष्टांग योग आणि सप्तांग योग सांगतात. अर्थात षट्कर्म म्हणजेच शुद्धीक्रिया त्याही आधी कराव्या असे घेरंडमुनी सांगतात. पतंजली तर अष्टांग योगातील आसनांचा टप्पा गाठण्यापूर्वी यम-नियमांचे पालन करायला सांगतात. काहीही असो, विविध अवयवांस व्यायाम घडून त्यातील विकृती नाहीशी करणे व अवयव सुदृढ आणि निरोगी राहावेत यांसाठी आसने करणे आवश्यक आहे.
आज आपण वज्रासनाचा सराव करू यात. वज्र म्हणजे लोखंडाप्रमाणे घट्ट/पक्का पाया असलेली बैठक. म्हणूनच या आसनाचे नाव वज्रासन. घोटा आणि गुडघ्याचे सांधे ताठर असतील, तर श्वानासन (दोन्ही हात गुडघ्यांच्या बाजूला टेकवणे) सराव अधिक चांगला.
बैठक स्थिती घ्या. दोन्ही पाय अगदी सरळ ठेवा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. आता उजव्या हाताच्या आधाराने उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजवी टाच उजव्या नितंबाच्या (पार्श्वभागाच्या) खाली ठेवा. त्याचप्रमाणे नंतर शरीराचा भार उजव्या बाजूला तोलत डावी टाच डाव्या पार्श्वभागाच्या खाली आणा. दोन्ही हातांचे तळवे दोन्ही मांड्यांवर ठेवा. पाठकणा समस्थितीत ठेवा. श्वासावर लक्ष द्या. डोळे अलगद मिटून घ्या.
साधारण क्षमतेप्रमाणे १० ते २० श्वास या स्थितीत थांबा. क्षमता कमी असल्यास आवर्तने अधिक करा. सरावाने अधिक करत राहा. सरावाने अधिक काळ या स्थितीत राहणे शक्य होईल. ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारण्यास आणि जननेंद्रियांचे आरोग्य, पचनशक्ती चांगली होण्यास या आसनाचा सराव खूप उपयुक्त आहे.