Valentine Day फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडू इच्छिणारे असे सगळेचजण या महिन्याची आतुरतेनं वाट पाहात असतात. कारण हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना आहे. १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातो. सोशल मीडियामुळे हल्ली व्हॅलेंटाईन डे ची क्रेझ खूप वाढली आहे. पुरुषांनी सर्वात आधी प्रेम व्यक्त करण्याचा जमाना कधीच गेला. आता तर मुलीही मोकळेपणानं व्यक्त होत आहेत. एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर ते व्यक्त करण्याचा आनंद काही औरच.त्यामुळे आपल्यावरचं प्रेम कुणीतरी व्यक्त करेल याऐवजी आपणच पुढाकार घेऊन त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं तर… असा सकारात्मक विचार अलीकडच्या मुली करतात. तर तुमचा नवरा किंवा जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करण्याची ही अनोखी संधी आठवडाभर आहे. व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला असतो. त्यापूर्वी आठवडाभर हे सेलिब्रेशन सुरु होतं.

चला,तर मग जाणून घेऊया व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणकोणते दिवस असतात ते….

१..रोझ डे- (Rose Day)

व्हॅलेंटाईन सप्ताह अर्थात व्हॅलेेेंटाईन वीकची सुरुवात होते रोझ डे पासून. रोज डे 7 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तुमच्या पार्टनरला मस्तपैकी लाल गुलाबाचं फुल देऊन व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात करु शकता. सकाळी घाईत असताना तुम्हाला जमलं नाही तरी हरकत नाही. तुमचा किंवा तुमची पार्टनर घरी आल्यावर किंवा तुम्ही ऑफिसमधून येताना त्याच्या वा तिच्यासाठी मस्त गुलाबाची फुलं आणा. गुलाबाचं फुलं देणं ही प्रेमाची सुरुवात समजली जाते. ज्यांना प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही, त्यांच्यासाठी तर ही मस्तच संधी आहे. लाल गुलाब प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. तुमचं जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब द्या. न बोलताही तुमच्या भावना त्याच्यापर्यंत नक्की पोहोचतील. कुणाला इंप्रेस करायचं असेल किंवा कुणाला मनापासून थँक्यू म्हणायचं असेल तर गुलाबी म्हणजेच पिंक रोझ दिलं जातं. प्रेमातला गोडवा टिकवण्यासाठी पिंक रोझ बेस्ट आहे. प्रेमात नेहमीच सगळं ‘ऑल इज वेल’ नसतं. भांडणं, वादविवाद, अबोला हे होतंच. ते मिटवण्यासाठी शांततेचं, सलोख्याचं प्रतिक म्हणून व्हाईट अर्थात पांढरं गुलाब दिलं जातं. तुमचा पार्टनर चिडला असेल तर त्याला व्हाईट रोझ द्या आणि तुमचं नातं पुन्हा रिफ्रेश करा. प्रेमाची सुरुवात मैत्रीनं होते. याच मैत्रीची सुरुवात करायची असेल तर पिवळा म्हणजेच यलो गुलाब द्या. लग्न झाल्यावर पती-पत्नी एकमेकांचे आयुष्यभरासाठीचे मित्र होतात. मग तुमच्या नवऱ्याला पिवळा गुलाब द्यायला काय हरकत आहे? किंबहुना तुमच्या नवऱ्याला किंवा जोडीदाराला सगळ्या रंगाच्या गुलाबांचा एक मस्त बुके द्या आणि तुमच्या व्हॅलेंटाईन वीकची जोरदार सुरुवात करा.

२.प्रपोझ डे-(Propose Day)

व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ फेब्रुवारीला प्रपोझ डे साजरा केला जातो.दरवेळेस पुरुषांनीच प्रपोझ केलं पाहिजे असं थोडंच आहे? तुम्हीही पुढाकार घेऊन तुमचं प्रेम व्यक्त करुच शकता. त्यासाठी प्रपोझ डे पेक्षा चांगला दिवस कोणता असेल? लग्न झालं असेल तर तुमच्या पतीला प्रपोझ डे च्या दिवशी मस्त गिफ्ट देऊन पुन्हा जुन्या आठवणी जाग्या करु शकता.

३.चॉकलेट डे (chocolate Day)

व्हॅलेंटाईन डे चा तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे. हा ९ फेब्रुवारीला साजरा केला जातो. चॉकलेट्स हेही प्रेमाचं प्रतिकच मानलं जातं. चॉकलेट्स कुणाला आवडत नाहीत? पार्टनरला त्याच्या आवडत्या फ्लेवरची चॉकलेट्स द्या, मग बघा तो कसा खूश होईल! या चॉकलेट्समुळे तुमच्या प्रेमातला गोडवाही आणखी वाढेल.

४. टेडी डे (Teddy Day)

खरंतर टेडी बिअर्स मुलींना जास्त प्रिय असतात. पण तुम्ही तुमच्या पार्टनरला एखादं क्युटसं टेडी देऊन प्रेम व्यक्त करु शकता. वेगवेगळ्या रंगाच्या टेडीचा अर्थ वेगवेगळा असतो. व्हॅलेंटाईन विकच्या चौथ्या दिवशी म्हणजे १० फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जातो.

५. प्रॉमिस डे (Promise Day)

प्रेमात वचनांचं खूप महत्त्व आहे. प्रेमाबद्दल विश्वास देण्यासाठी, आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन प्रॉमिस डे ला दिलं जातं. ११ फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जातो. चांगल्या-वाईट काळात सोबत राहण्याचं, प्रत्येक संकटाचा सामना एकत्र करण्याचं वचन प्रॉमिस डे च्या निमित्तानं पुन्हा एकदा तुमच्या पार्टनरला द्या.

६. हग डे (Hug Day)

आपल्या प्रेमाच्या माणसाला घट्ट मिठी मारली की सगळं टेन्शन दूर होतं. प्रेम व्यक्त करण्याचे अन्य मार्ग आहेतच, पण हग डे च्या दिवशी सकाळी सकाळी तुमच्या पार्टनरला मस्तपैकी घट्ट मिठी मारा. मग पाहा, तुमचा दिवस कसा आनंदात जाईल ते! काहीही न बोलता तुमच्या मनातलं तुमच्या जोडीदारापर्यंत नक्की पोहोचेल. १२ फेब्रुवारीला हग डे साजरा केला जातो.

७. किस डे (Kiss Day)

१३ फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या दिवशी किस डे साजरा केला जातो. आपल्या जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हजार शब्दांपेक्षाही एक किस जास्त बोलून जातो. तेव्हा या किस डे ला तुमच्या पार्टनरलाही कळू दे तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे…

८. व्हॅलेंटाईन डे (Valentine Day)

व्हॅलेंटाईन डे म्हणजे १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस असतो. कपल्ससाठी हा दिवस अगदी स्पेशल असतो. तुमचं वय कितीही असलं तरी पार्टनरबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची संधी गमावू नका. याचदिवशी तुमच्या पार्टनरला आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीला लग्नासाठी प्रपोझही करु शकता.

आत्ता तर हा प्रेमाचा आठवडा सुरु होतोय, मस्त प्लानिंग करा आणि तुमच्या पार्टनरला सरप्राईज देऊन तुमचं प्रेम व्यक्त करा, प्रेमाचं नातं दृढ करा.

(शब्दांकन : केतकी जोशी )

Story img Loader