“याला माझ्यासाठी दहा रुपये सुद्धा खर्च करायची इच्छा नसते ताई, चिंगूस.”
इशितानं तावातावानं नीरजच्या बहिणीपाशी तक्रार मांडली. “काहीही काय? गेल्याच महिन्यात तीन हजार रुपयांची साडी घेतली. एवढी लाखाभराची ई-बाइक घेतली, किती वेळा चालवली विचार? ती दहा रुपयांचं बोलतेय म्हणून सांगतोय, नाहीतर असले हिशेब मला आवडत नाहीत.” नीरज भडकून म्हणाला.
“ताई, मला गाडी चालवायची भीती वाटते, तरी याची घ्यायची घाई. म्हणजे मला कुठे सोडायला -आणायला नको. साडीची हौस तर याचीच. मला कुठे साड्या नेसायच्यात.”
“ते असू दे, दहा रुपयांचं काय म्हणालीस?” ताईनं मुद्दयावर आणलं.
“मगाशी मोगऱ्याचा गजरा घे म्हटलं तर हा मख्ख. स्वत:च्या मनात असेल तेव्हा गाडी घेईल, पण मी काही मागितलं की दुर्लक्ष…”
आणखी वाचा : आहारवेद : पीसीओडीवर जालीम उपाय- जांभूळ
“त्याआधी आम्ही तासभर भांडत होतो, ते कोण सांगणार? गजऱ्याचा मूडच नव्हता, वर चिंगूस म्हणाली, डोकंच सटकलं, गाडीवरून उतरवूनच टाकावंसं वाटलेलं…”
भांडणाची ‘स्टोरी’ ताईला हळूहळू समजली. आजचा दिवसच हुकलेला. गेले कित्येक रविवार इशिताला ‘दोघांनी पहाटे सिंहगडाला जायचं’ होतं, आज मुहूर्त लागला तरी आठ वाजलेच. खाली नीरजचे गप्पिष्ट मित्र भेटले. तोपर्यंत नाश्त्याची वेळ झाली तर रेस्टॉरंटमध्ये गर्दी. एकदाचे रस्त्याला लागले, तर डोणजपासून वाहनांच्या रांगा. वैतागून परत फिरावं लागल्यावर मात्र इशिता सुरू झाली.
“तुझ्याकडे सगळ्या जगासाठी वेळ असतो. फक्त माझी इच्छा तू सिरीअसली घेत नाहीस… आळशी, झोपाळू. हावरटासारखं मागवलंस त्यामुळे आणखी उशीर.” यावर नीरज चिडला.
“तुझ्या इच्छेकडे मी दुर्लक्ष करतो, मग तू तरी कुठे काय करतेस? साधा शिरा केला नाहीस कधी.”
“मी कुठे काय करते? रोजचा स्वयंपाक, घरातली सगळी कामं जादूने होतात. आईंना तर त्यांच्या ‘लाडावलेल्या बाळाची’ केवढी मदत होते, नाही का?” इशिता उपहासली.
आणखी वाचा : आहारवेद : शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी फणस
दोघं भांड भांड भांडले. साचलेलं एकदाचं ओकून टाकल्यावर इशिता स्वभावाप्रमाणे लगेच शांत झाली. गजरेवाला दिसल्यावर लाडात आली. पण नीरजचं सटकलेलंच होतं.
“खरंच तू कधीच त्याच्यासाठी शिरा केला नाहीस?” ताईनं नवलानं विचारलं. इशिता अवघडून लाजली.
“एकदाच केलेला, पण त्याला आवडलाच नाही. आईंसारखं भरपूर तूप, साखर घालवतच नाही माझ्याच्याने आणि आपल्याकडे याच्यासाठी, कधी पाहुण्यांसाठी आई बहुधा शिराच करतात. म्हणून मी शिरा टाळते, तर म्हणे मी काहीच करत नाही.”
“अरे लहान मुलांनो, तुम्हाला दोघांना एकमेकांकडून लाड करून हवेत, पण ते मिळेनात, तर तुम्ही एकमेकांना टोचत, भांडत मागताय, कळतंय का?” ताई हसत म्हणाली.
“म्हणजे?”
“इशिताला म्हणायचंय, ‘आज तरी माझ्या हौसेसाठी म्हणून लवकर उठून सिंहगडावर चल. इतके दिवस इतर गोष्टींना प्रायॉरिटी दिलीय, आजचाही सिंहगड हुकला, निदान गजरा तरी लाडानं घेऊन दे ना.’
“हो ना ताई.”
“तू इशिताला गाडी घेऊन दिलीस नीरज, पण गाडी, साडी घेऊन देणं हे ‘तुझ्या’ लाड करण्याच्या यादीतलं झालं, तिच्या नाही. तिच्या रोमान्सच्या यादीत पहाटेचा सिंहगड, गजरा आहे. हे तुला समजतही नाही, त्यामुळे इशिता दुखावली, भडकली आणि दहा रुपयांचं बोलली. मग तुला तुझ्या यादीतला ‘बायकोच्या हातचा शिरा’ आठवला. तू तिला ‘काही’ करत नाहीस म्हणून टोचलंस, त्यावर ‘लाडावलेलं बाळ’ म्हणून तिनं परतफेड केली. ही मारामारी संपायची कुठे?”
आणखी वाचा : आहारवेद : पोषक गुणधर्मांचा पडवळ
“तेच तर कळत नाही ताई.”
“मग तूतू-मैमै चा खेळ थांबवायला हवा ना? ‘मला काय हवंय? हे नीट सांगायला, एकमेकांच्या इच्छांना स्पेस देणंही शिकायला हवं ना?”
“स्पेस?”
“म्हणजे इशिता, तुझं डाएटिंग योग्य असलं तरी भरपूर तूप, साखरेचा, ‘प्रेमाचा’ शिरा नीरजसाठी ‘कधीतरी’ करायला काय हरकत आहे? तसंच, तिच्या रोमॅंटिक यादीतल्या सिंहगडासाठी एखाद्या रविवारी ‘आपण होऊन’ लवकर उठायला काय हरकत आहे नीरज? लाड मनापासून करायला हवेत की नाही?”
“हो. नाईलाजानं केल्यासारखं वाटलं की चिडचिड होते. मग केलेल्या इतर गोष्टी आठवतच नाहीत.”
“तर मुद्दा असा, अमुक करत नाही म्हणून एकमेकांशी भांडत राहायचं की, एकमेकांच्या प्रेमाच्या यादीतल्या एखाद्या गोष्टीसाठी आपला कम्फर्ट झोन कधीकधी सोडायचा हा चॉइस आपलाच असतो.” ताई हसत म्हणाली.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com