प्रिय जिनिलीया,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Ved Marathi Movie: सर्वात आधी वेड चित्रपटात तुझं मराठी ऐकून खूप आनंद झाला. शिवाय बऱ्याच दिवसांनी बॉक्स ऑफिसवर गाजलेला चित्रपट तुम्ही दिलात यासाठीही तुमचं अभिनंदन. तू साकारलेली श्रावणी बघताना मनात काही प्रश्न आले, प्रेक्षक म्हणून नव्हे तर एक मुलगी म्हणून! श्रावणीमध्ये जीव तू ओतलायस त्यामुळे तुलाच ते विचारतेय..

काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या झाली, जीव घेणारा तिचाच बॉयफ्रेंड होता. नाही म्हंटल तरी त्यांनीही कधी ना कधी प्रेमाच्या आणा भाका घेतल्या असतील. पण तरीही त्याच प्रियकराने श्रद्धाचे ३५ तुकडे करून तिचा जीव घेतला. त्यावेळेस समोर आलेल्या अनेक बातम्यांमध्ये हा एक मुद्दा मांडला होता की श्रद्धा लग्नाचा विषय काढायची तेव्हा आफताब चिडचिड करायचा. याच रागातून त्याने तिला जीवे मारल्याच्या सुद्धा चर्चा आहेत. श्रद्धाच्या काही चॅट्समधूनही हे समोर आलं होतं की तिला काही अंशी आफताबची भीती वाटायची, संशय यायचा तरीही फक्त प्रेमापोटी ती राहिली आणि आता प्रेमापोटीच जग सोडून निघूनही गेली. जेव्हा ही घटना चर्चेत आली तेव्हा अनेकांनी महिलांचा संयम, त्याग कसा त्यांच्याच अंगाशी येतो याबाबत पोस्ट केल्या होत्या. हे सगळं प्रकरण ताजं असताना पुन्हा एकदा तू समोरच्याची इच्छा नसताना ‘त्याचे खर्च करणाऱ्या, सोबत राहणाऱ्या, विनाकारण त्यागमूर्ती बनलेल्या’ बाईला ग्लोरिफाय करण्याचा निर्णय का घेतलास? आणि त्याला प्रेम हे नाव देणं तुला पटतंय का?

एक दिवस तुला आवडणारा माणूस जीव देतोय हे पाहून तू तुझ्या घरी जातेस, तुझ्या आई वडिलांकडे लग्न लावून देण्याचा हट्ट करतेस, न ऐकल्यास जीव देण्याची धमकी देतेस, तुझे आई वडील घाबरून तयार होतात. या सगळ्यातून हा चित्रपट पाहायला आलेल्या लहान मुलींवर काय परिणाम होणार, याचा विचार केलायस का तू? असा माणूस, जो तुमच्यावर प्रेम तर सोडाच पण तुमचं अस्तित्व आहे हे ही लक्षात घेत नाही त्याच्यासाठी स्वतःच्या आई वडिलांना वेठीस धरणं, आपल्याला होणारा त्रास त्यांना उघड डोळ्याने बघायला लावणं आणि त्यावर त्यांना तोंडून एक चकार शब्द काढायला न देणं. हे सारं अन्यायकारक नाही वाटत का? स्वतःच्या प्रेमासाठी ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं त्यांना त्रास देणं हे स्वार्थी वाटलं नाही का? मला मान्य आहे की, तुझ्या निर्णयाने त्याचा जीव वाचला पण त्या एका जीवासाठी इतर चार जीवांची तडफड झाली हे दिसलं नाही का तुला?

एका सीनमध्ये रितेश म्हणजेच सत्या असं म्हणतो की काय त्रास आहे तुमच्या मुलीला? मारझोड करतोय का? श्रावणी, अगं किती वर्ष गेली आणि आता कुठे आईवडिलांच्या नजरेत लेकीच्या सुखाची व्याख्या ही सुरक्षेची खात्री यापेक्षा पुढे जाऊन तिला मिळणाऱ्या काळजी- प्रेम इथवर पोहोचली होती. आणि तुम्ही पुन्हा पहिले पाढे पंचावन्न केलेत.

तुमच्या आयुष्यात कुणीतरी तिसऱ्याने येऊन हट्ट करून तुम्हाला दोघांना जवळ आणलं. नवऱ्याच्या जुन्या गर्लफ्रेंडच्या लेकीची काळजी नीट घेतली, तिला माया लावली म्हणून सत्या श्रावणीच्या प्रेमात पडतो हे एवढंच दिसून आलं. म्हणजेच पुन्हा वर्षानुवर्ष बाईचं जे काम म्हणून जगासमोर आलं आहे, बाईने घर नीट सांभाळलं, दारूसाठी नाकर्त्या नवऱ्याला पैसे दिले, त्याचा विनाकारण राग रुसवा सहन केला, आणि तडजोडीतून आलेलं आईपण निभावलं की त्या माणसाला तिची किंमत कळणार. तो तिला जीव लावणार. पूर्ण चित्रपटात ज्या निरपेक्ष प्रेमाची तुम्ही गाणी गायलीत त्याचा एक टक्का तरी सत्याने श्रावणीला स्वीकारण्यामध्ये दिसला का? सत्याने श्रावणीला ‘श्रावणी’ म्हणून नाही तर एक आई- बायको म्हणून स्वीकारलं. तिच्या कामाचा, अस्तित्वाचा, सुंदर चेहऱ्याचा व त्याहून सुंदर मनाचा विचार न करता.

आता सगळ्या चित्रपटात श्रावणी चमकली तो मुद्दा म्हणजे शेवटचं भाषण. मुळात इतकं सगळं घडल्यावर निघून जाण्याचं शहाणपण श्रावणीला येतं. थोडक्यात सांगायचं तर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत होतास हे खरं होतं आणि आता प्रेम करतोस ते खोटं आहे हे श्रावणीला म्हणायचं असतं. मुळातच तो माणूस आपल्याकडे दुर्लक्ष करतोय त्याच्यासाठी सात वर्ष लाचारी पत्करून जगणं हे प्रेम नाही, अगं!

हे ही वाचा<< लोकलमध्ये चढली उर्फी, उर्फ ‘ती’ …याला म्हणतात बोल्ड बाई!

तुला एक सांगू , श्रावणी चुकीची वाटली तरी जवळची वाटते. कारण आजही अनेक मुली नवऱ्याकडून त्या दोन प्रेमाच्या शब्दांची अपेक्षा करत असतात. अशावेळी त्यांना स्वतःचा आनंद स्वतः व्हा! हा संदेश एका २१ व्या शतकात काम करणाऱ्या अभिनेत्रीने द्यायला हवा होता. अशावेळी श्रावणीने सगळ्यांच्या खांद्यावर पुन्हा त्यागाचं ओझं दिलंय. प्रेम माणसाला मान वर करून जगायला शिकवतं. प्रेमात एखाद्याची सावली बनून फिरण्यात गैर काहीच नाही, पण तो माणूस निदान मिणमिणता दिवा तरी असावा, अंधाराकडून सावलीने अपेक्षा करण्याला अर्थ आहे का?

हे ही वाचा<< मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

-वेड पाहिलेली मुलगी

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ved marathi movie open letter to genelia dsouza deshmukh over domestic violence drunken husband wife svs