लातूर येथील विधी पळसापुरे या युवतीनं दिल्लीत संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दलचे विचार मांडले होते. तिचं भाषण जवळपास २० लाख लोकांनी पाहिलं आणि राजकीय नेत्यांनी ते समाजमाध्यमांवर ‘शेअर’ करत तिचं कौतुकही केलं होतं. या निमित्तानं प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या विधीला या वर्षीचा ‘राष्ट्रीय युवक पुरस्कार’ जाहीर झाला आणि १२ जानेवारीला नाशिकमध्ये ‘राष्ट्रीय युवक संमेलना’त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीला पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे हा पुरस्कार दिला जातो. डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सवातही क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विधीला गौरवण्यात आलं होतं.
विधीचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांतलं वक्तृत्त्व उत्तम आहे. तिचं वर उल्लेख केलेलं भाषण जरूर ऐकण्यासारखंच. शैक्षणिक गुणवत्तेत ती वरच्या स्थानी असतेच, शिवाय निबंध, वक्तृत्व ,वादविवाद यांसह नृत्य, संगीत आणि लोककला या विषयांचीही तिला आवड आहे. नृत्याचं तिनं शिक्षण घेतलं आहे.
हेही वाचा – पतीच्या पगाराची माहिती मिळण्याचा पत्नीला अधिकार
विधी सांगते, ‘मला राजकीय नेत्यांची आत्मचरित्रं वाचायला आवडतात. ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे महात्मा गांधींनी लिहिलेलं पुस्तक मी वाचलं आणि त्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. स्वामी विवेकानंद हे माझ्यासाठी आदर्श आहेत. त्यांचीही अनेक पुस्तकं मी वाचली. हिंदू तत्त्वज्ञान ते ज्या सोप्या पद्धतीनं सांगतात त्याचं मला आकर्षण आहे. ॲरिस्टॉटल, प्लेटो अशा तत्वज्ञांचंही वाचन करायचा माझा प्रयत्न असतो.’ महात्मा गांधी आणि त्यांची स्वच्छता मोहीम याबद्दल ती भरभरून बोलते. स्वच्छतेचा तो धागा पुढे नेला जातोय असं तिला वाटतं. आंतरराष्ट्रीय संबंधांकडे लक्ष दिलं जात आहे आणि परिणामी देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर वधारते आहे, असंही ती म्हणते.
लातूर शहरात राहणाऱ्या विधीचे वडील प्रशासकीय सेवेत होते. ते आता सेवानिवृत्त झाले आहेत. तर आई गृहिणी आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांत तिचं शालेय शिक्षण झालं. उच्च माध्यमिक, पदवी आणि पदव्युत्तर श्रेणीत शिकत असताना तिनं सुवर्णपदकाच्या संधी पटकावल्या. सूक्ष्मजीवशास्त्रात तिनं पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून संशोधन तिला महत्त्वाचं वाटतं.
हेही वाचा – वडीलांची साथ अन् संकटांवर मात! धावपटू नित्या रामराजचा संघर्षमय प्रवास
‘लहानपणापासून आई-वडिलांनी माझं व्यक्तिमत्व विकसित व्हावं याबद्दल काळजी घेतली आणि वाचन, खेळ, विविध कलागुणांसाठी मला संधी उपलब्ध करून दिल्या. युवक महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजना, यांत मी आवडीनं भाग घेतला,’ असं ती सांगते. शिक्षणापासून वंचित आणि ग्रामीण भागातल्या जवळपास तीन हजार मुलांना ती विनाशुल्क ‘ऑनलाईन’ पद्धतीनं मार्गदर्शन करते. ‘माझा करिअर गाइड’ या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेलं व्यासपीठ असलेल्या संस्थेची तिनं सुरुवात केली आहे. करिअर निवडताना व्यक्तीनं आपल्यातल्या क्षमता, आवडीनिवडी आणि आकांक्षांविषयी जागरूक असायला हवं, सतत नवीन शिकत राहायला हवं, असं ती सांगते.
सामाजिक कार्यात सहभाग नोंदवण्याची आणि राजकीय क्षेत्रातही काम करण्याची इच्छा असणाऱ्या विधीस स्वत:ला सिद्ध करण्याच्या आणखी संधींची प्रतीक्षा व उत्सुकता आहे.
lokwomen.online@gmail.com