भारतामध्ये UPSC ही नागरी सेवा / स्पर्धा परीक्षांमधील सर्वांत अवघड परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती अंगी असणे महत्त्वाचे असते. बहुतेक जण IAS, IPS, IFS अधिकारी बनण्यासाठी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणानंतर या परीक्षा देतात. त्यातही साधारणपणे दोन ते तीन प्रयत्नांनंतर काही उमेदवारांना अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळते.
IAS हे महत्त्वाचे पद असल्याने, त्या पदाच्या भरतीसाठीदेखील निवडक जागा उपलब्ध असतात. म्हणून अनेकांचा IAS अधिकारी बनण्याकडे अधिक कल असतो. मात्र, काही निवडक उमेदवार असे असतात की, जे UPSC या परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळवूनदेखील IAS अधिकारी होण्याऐवजी भारतीय परराष्ट्र सेवा [IFS] अधिकारी हे पद निवडण्यास अधिक प्राधान्य देतात. अशा निवडक उमेदवारांपैकी एक म्हणजे विदुषी सिंग.
विदुषी सिंगने UPSC CSE २०२२ च्या परीक्षेमध्ये अखिल भारतीय स्तरावर १३ वे स्थान पटकावूनही IFS अधिकारी या पदाची निवड केली. विदुषी सिंग ही मूळची उत्तर प्रदेशातील अयोध्येची असली तरीही तिचा जन्म राजस्थानमधील जोधपूर येथे झाला होता. अत्यंत हुशार अशा या विदुषीने केवळ २१ व्या वर्षीच अतिशय अवघड असलेली UPSC ही स्पर्धा परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे विदुषी कोणत्याही शिकवणी / कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत उत्तीर्ण झाली.
हेही वाचा : घरी आइस्क्रीम बनवून थाटला तब्बल सहा कोटींचा व्यवसाय! कोण आहेत रजनी बेक्टर, पाहा…
विदुषीने स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली?
विदुषीने २०२० साली पदवीपूर्व शिक्षण घेत असतानाच UPSC स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली होती. नंतर २०२१ साली दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठित श्री राम कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रातील BA ऑनर्स ही पदवी प्राप्त केली. यादरम्यान विदुषीने NCERT पुस्तके आणि इतर आवश्यक साहित्य वापरून, स्पर्धा परीक्षेसाठी आपला पाया मजबूत करून घेतला. मात्र, त्यानंतर तिच्या लक्षात आले की, स्पर्धा परीक्षेसाठी तिला खरं तर शिकवणी लावायची किंवा कोचिंगची काहीच आवश्यकता नाहीये. त्यामुळे विदुषीने तो सर्व वेळ जून २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंतच्या विविध सराव परीक्षा सोडविण्यावर केंद्रित केला.
विदुषीने या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती आणि त्याचे फळ तिला परीक्षेच्या निकालातून मिळाले. UPSC CSE २०२२ च्या परीक्षेच्या अंतिम यादीमधून विदुषीला १०३९ गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले. मुलाखतीच्या फेरीमध्ये तिने १८४ गुण कमावले होते. त्यासाठी विदुषीने अर्थशास्त्र हा पर्यायी विषय निवडला होता, अशी माहिती डीएनएच्या एका लेखावरून मिळते.