सीमाच्या या शैक्षणिक घौडदौडीचा तिच्या गावातील तिच्या समाजावर एवढा सकारात्मक परिणाम दिसू लागला की तिच्या कुटुंबातील तिचे सर्व बहीणभावंडे तिच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनीदेखील फुटबॉल खेळायला सुरुवात केली, तसेच शिक्षण घेण्याकडे वळू लागले. व सर्वजण आता युवा संस्थेच्या शाळेत शिक्षण घेऊ लागले आहेत. तिच्या या मेहनतीला अखेर यश मिळाले आणि २०१९ मध्ये केनेडी – लुगर युथ एक्स्चेंज अँड स्टडी प्रोग्रामचा एक भाग म्हणून भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी निवड झालेल्या ४० विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. तिने त्या परीक्षेत ‘ए’ ग्रेड मिळवून हावर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला. तेही पूर्ण शिष्यवृत्तीसह.
अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य गोष्टीदेखील शक्य होतात. असेच काहीसे झाले आहे खेडेगावातल्या एका मुलीसोबत. तिचे नाव आहे सीमा कुमारी. तिने स्वत:च्या मेहनतीवर रतन टाटा, आनंद महिंद्रा, राहुल बजाज यांसारख्या उद्याेगपतींनी ज्या हावर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठात ती आता शिक्षण घेत आहे.
सीमा कुमारीचा जन्म झारखंडमधील दुर्गम भागातील दाहू या गावातला. हे गाव तसे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेले तसेच कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत, अशिक्षित आणि जीवनाश्यक सोयीसुविधांपासून वंचित असलेले. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने आणि निरक्षरता त्यामुळे गावात शिक्षणाचे महत्त्व तसे फारसे नाही. सीमाचे वडीलदेखील हे शिक्षित नसल्याने जवळच्याच एका छोट्या कारखान्यात तुटपुंज्या रोजंदारीवर कामाला जात. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले. पण याच गावच्या लेकीने घरी अठराविश्व दारिद्र्य असूनदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख बनवली आहे.
गावात शाळा होती, पण या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यास उपयोगी अशा वस्तू किंवा सुविधा नव्हत्या. जे शिक्षक होते त्यापैकी बहुतेक शिक्षक हे अप्रशिक्षित आणि शाळेत वेळेवर शिकवणीसाठी येणारेच. सीमाचे प्राथमिक शिक्षण याच गावात झाले. पण एक दिवस झारखंडच्या ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘युवा’ या संस्थेने सुरू केलेल्या फुटबॉल संघात सीमाला खेळायची संधी मिळाली आणि सीमाच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आपले विश्व खूप मोठे आहे आणि आपल्याला स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खूप संधी आहेत याची सीमाला जाणीव झाली. पुढे ती फुटबॉलमध्ये पारंगत झाल्यावर इतरांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करू लागली व आपल्या शिक्षणाचा भार तिने स्वत:च उचलला. तिचे हे वागणे पाहून गावातील वडिलधाऱ्यांनी तिचे शिक्षण बंद करून लग्न लावून द्यावे यासाठी घरच्यांच्या मागे तगादा लावला, पण सीमा तिच्या मतावर ठाम राहिली.
कालांतराने २०१५ मध्ये युवा संस्थेला गावातील मुलींबद्दल हेवा वाटू लागला व त्यांच्या उज्ज्वल भविष्याची चुणूक त्या मुलींमध्ये दिसायला लागली. सीमादेखील त्यापैकीच एक होती. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून युवा संस्थेने २०१५ मध्ये गावात एक नवीन शाळा उघडली. तिथे भारतातील व अमेरिकेतील नामांकित शिक्षणसंस्थेतील शिक्षक येऊन शिकवू लागले. विविध शिबिरे होऊ लागली. हळूहळू सीमाला शिक्षणामध्ये रुची वाढू लागली. पुढील शिक्षणासाठी हावर्डमध्ये जाण्यासाठी तिने इंग्रजी भाषा शिकली. हावर्डमध्ये जाण्याच्या आधी तिने मधल्या काळात संस्थेमार्फत येणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय शिक्षणसंस्थांच्या शिबिरांमध्ये भाग घेतला. त्यात सिएटल हायस्कूल, केंब्रिज विद्यापीठ, वॉशिंग्टन विद्यापीठांच्या शिबिरांचा समावेश आहे.
सीमाच्या या शैक्षणिक घौडदौडीचा तिच्या गावातील तिच्या समाजावर एवढा सकारात्मक परिणाम दिसू लागला की तिच्या कुटुंबातील तिचे सर्व बहीणभावंडे तिच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनीदेखील फुटबॉल खेळायला सुरुवात केली, तसेच शिक्षण घेण्याकडे वळू लागले. व सर्वजण आता युवा संस्थेच्या शाळेत शिक्षण घेऊ लागले आहेत. तिच्या या मेहनतीला अखेर यश मिळाले आणि २०१९ मध्ये केनेडी – लुगर युथ एक्स्चेंज अँड स्टडी प्रोग्रामचा एक भाग म्हणून भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी निवड झालेल्या ४० विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. तिने त्या परीक्षेत ‘ए’ ग्रेड मिळवून हावर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला. तेही पूर्ण शिष्यवृत्तीसह.
हावर्डमध्ये प्रवेश मिळाल्यावर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. खासकरून बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रानेदेखील ट्वीट करून सीमाचे अभिनंदन केले. सीमासाठी हे सर्व एक स्वप्नवत होते.
आज सीमा शिकता शिकता गावातील तरुण मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी कार्यशाळा घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करत आहे. तसेच एक खेडेगाव ते हावर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रवास तिचा प्रवास व आलेल्या अनुभवांबद्दल एक पुस्तक लिहित आहे.
भविष्यात सीमाला गावातील तसेच इतर दुर्गम भागातील महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना शिक्षणासाठी जागृत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे तिचे स्वप्न आहे.