भक्ती काळे
पिपलांत्री या राजस्थानमधील गावाचा एक छोटा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर पाहिला. त्यात एक मल्याळी डॉक्टर- जी स्वतः गर्भवती आहे बसमध्ये प्रवासात असताना तिला तिच्या दवाखान्यातून फोन येतो. इमर्जन्सी पेशंट असल्याचं ऐकून लेबर रूम तयार करायच्या सूचनादेखील ती देते. धावत पळत जाऊन ती त्या गर्भवती बाईला मोकळं करते आणि केबिनमध्ये जाऊन स्वतः मोकळा श्वास घेणार तेवढ्या बाहेर काही तरी गोंधळ चालू असल्याचा आवाज तिच्या कानी पडतो. ती रस्ता काढत कशीबशी पुढे जाते तर जन्मलेल्या बाळाला एक टिकावधारी माणसाकडे नेलं जात असल्याचं तिला दिसतं. त्या ठिकाणी अनेक स्त्रियासुद्धा उपस्थित असतात. जशी ती व्यक्ती समोर यायला लागते तसे सर्वजण त्याला वाकून नमस्कारसुद्धा करतात. आता व्हिडिओ पुढे पाहावा की नको या संभ्रमात असेपर्यंत समोर दिसतं- त्या मुलीचा पाय अलगद टिकावाला लावला जातो आणि वृक्षारोपणाची तयारी पूर्ण होते.
लेक आणि निसर्ग वाचवण्याचं या गावाचं हे अनोखं मॉडेल या व्हिडिओमुळे माहीत झालं. हे गाव राजसमंद जिल्ह्यात आहे. महाराणा प्रताप यांचा जन्म याच जिल्ह्यात कुंभालगड किल्ल्यात झाला. इतिहासातील हल्दी घाटीची लढाई याच जिल्ह्यातली. संगमरवरासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. गावातसुध्दा संगमरवरी खाणी असल्याने आणि भौगोलिक कारणांमुळे पाण्याची पातळी अगदीच खालावलेली.
आणखी वाचा-निसर्गलिपी : बहराचा उत्सव
२००५ मध्ये श्याम सुंदर पालीवाल सरपंच झाले. तेव्हा यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. औद्योगिकरण आणि नैसर्गिक रचना यांमुळे जवळपास कुठलीही हिरवळ आणि वनसंपदा नसलेला हा भाग. जमिन नापिक आणि गाव ओसाड अशी सगळी परिस्थिती. स्वतःच्या मुलीच्या स्मृतीत पालीवाल यांनी झाड लावलं त्यातून हा वेगळा उपक्रम सुरू झाला.
मुलीचा जन्म फक्त राजस्थानातच नाही तर देशात आणि जगाच्या अनेक कोपऱ्यात आजही एक ओझं मानला जातो. कुठे ओझ्याची छटा गडद तर कुठे फिकट एव्हढाच काय तो फरक ! पिपलांत्रीमध्ये या जन्माला ओझं न मानता आलेल्या लेकीचं स्वागत म्हणून एक झाड लावलं जातं. त्या झाडाची काळजी घेणं संबंधित कुटुंबाला बंधनकारक असतं. राजस्थान बद्दलची पूर्वग्रह दूषित दृष्टी असल्यानं कदाचित व्हिडीओ पाहताना पुढे काय असेल अशी अनामिक भीती दाटून आली होती.
राजस्थानात फिरताना नाकापर्यंत पदर ओढून नवऱ्यामागे फिरणाऱ्या बायका पाहिल्या होत्या, काही सिनेमे आणि वाचलेले काही तपशील या सगळ्याचा तो परिपाक होता. स्वतःला शिक्षित म्हणणारे, मुलगी झालीच तरी चालेल असं वरवर दाखवणारे, मुलासाठी देवाधर्मापासून वेगवेगळे उपाय करणारे, तथाकथित दवाखाने ज्यात जडी बुटीपासून आयुर्वेदाच्या नावाखाली फसवणारे आणि फसवून घेणारे आहेत असं खूप काही पीसीपीएनडीटी ॲक्ट नंतर सुद्धा अगदी खुलेआम नाही, पण चालूच आहे की! प्लॅनड प्रेगनन्सी या गोड नावाखाली आपल्याकडे खूप काही चालू आहे हे भयंकर आणि किळसवाण आहे.
आणखी वाचा- आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
मुलगा नसणाऱ्या बाईला मुलगीच आहे म्हणून वांझ समजणारे, पोरींच्या आई बापाला हिणवणारे, मुलीच असणाऱ्या जोडप्याचं आता काय होईल कसं होईल याची चर्चा करणारे आणि वर स्वतःला सुशिक्षित असल्याचा टॅग लावणारे महाभाग सगळीकडेच आहेत. मुलीला ओझं मानणारा आणि मुलग्याची हाव करणारा समाज हे चित्र रात्रीत बदलणार नाही. बाईपणाची लढाई काल, आज आणि उद्यासुध्दा अवघडच आहे. तरीही आशावादाला जागा आहे. कुठलेही जेंडर बायस नसलेल्या समाजाचं स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी झटनारे पालक हवे आहेत !
२०२१ मध्ये श्याम सुंदर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजून विविध प्रकारच्या योजना गावात राबवून ते गावाला गांधीजींच्या स्वप्नातलं आदर्श गाव बनवत आहेत. आजूबाजूला घडणाऱ्याला दुर्दैवी आणि नकारात्मक घटनांवर पिपलांत्री यांची गोष्ट आशेचा किरण आहे एवढं मात्र नक्की !