प्रिय Vinesh Phogat,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुझं अभिनंदन करण्याकरता पत्र लिहायला सुरुवात केली अन् तेवढ्यातच तुझ्या अपात्रतेची बातमी समोर आली. त्यामुळे लेखणी थांबवावी आणि हळहळ व्यक्त करावी इतकंच हातात उरलं होतं. पण अवघ्या देशाला जिने सतत प्रेरणा दिली आहे, तिला आपणच प्रेरणा द्यावी असं वाटलं त्यामुळे पुन्हा लिहायला सुरुवात केली. तसं पाहिलं तर मला खेळातलं फारसं काही उमगत नाही. पण आपल्या आजूबाजूला काय चाललंय, कोणाविषयी चाललंय याची जाण असते. त्यामुळे तुझं नाव आणि कर्तृत्त्व जाणून होते. पण तुझ्याशी खरी ओळख झाली ती तू पुकारलेल्या आंदोलनामुळे.

आपल्या आजूबाजूला असंख्य मुली रडत-खडत जगत असतात. प्रत्येकीच्या आयुष्यातलं दुःखं वेगळं असतं. अनेक पातळ्यांवर त्यांना लढावं लागतं. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं. पण असं करताना अनेक अडथळे अन् अडचणी वाट्याला येतात. या अडळ्यातही तिला तिचं बाईपण जिवंत ठेवायचं असतं. जिवंत म्हणण्यापेक्षा बाईपण जपायचं असतं. कारण, श्वापदांच्या जगात बाईपण जपणं अवघड झालंय. राजकीय वरदहस्त असलेली आर्थिक, सामाजिक बलवान माणसं आपल्या आजूबाजूला भक्षक म्हणून सतत उभे असतात. यांच्याविरोधात उभं राहणं, आपलं म्हणणं मांडणं, हे म्हणणं मांडत असताना आपल्याच क्षेत्रातील लोकांनी आपल्याला धुडकावणं आणि ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे त्यांनीच आपल्याकडे दुर्लक्ष करणं जिव्हारी लागत असतं.

गेल्या जानेवारी महिन्यात तुझ्या एका वेगळ्या लढ्याला सुरुवात झाली. तुझ्याच संघातील काही अल्पवयीन मुलींवर तत्कालीन कुस्तीपटू महासंघाच्या अध्यक्षाकडून लैंगिक शोषण झालं. त्याविरोधात तुझ्यासह साक्षी मलिक, बजरंग पुनियासारखे खेळाडू रस्त्यावर उतरले. फक्त रस्त्यावरच उतरले नाहीत तर जिकरीचं आंदोलन सुरू केलं. तुमच्या आंदोलनाची दखल अवघ्या देशाला घ्यावी लागली. दिल्लीसह अनेक रस्ते तुमच्या आंदोलनामुळे बंद पडले. या आंदोलनाचे पडसाद जगभर उमटले. तुझ्या आंदोलनाचा विषय वेगळा नव्हताच. थोड्याफार फरकाने हे लैंगिक शोषण प्रत्येक क्षेत्रात होतच असतं. पण आवाज उठवणाऱ्या फार कमी सहकारी लाभतात. फक्त आवाज उठवणंच नाही तर प्रकरण मार्गी लागेपर्यंत चिकटून राहायलाही हिंमत लागते. ज्याप्रमाणे तू मॅटवर तुझी हिंमत दाखवतेस, तशीच हिंमत तू जंतर-मंतरवरही दाखवलीस. तुझ्या मैत्रिणींना न्याय मिळावा म्हणून तुझ्या डोळ्यांत आलेलं पाणी आणि तुझं आंदोलन पाडण्याकरता तुझ्यावर झालेला हल्ला या देशाने पाहिला आहे. ते दोन्ही फोटो क्रीडा क्षेत्रातील इतिहासाच्या पटलावर कायमस्वरुपी राहणार आहेत.

हेही वाचा >> Vinesh Phogat Olympics : विनेश फोगटची संघर्षमय कहाणी; आई ३२ व्या वर्षी विधवा, कर्करोग आणि समाजाशी एकटीने दिला लढा

पण तुझी ही लढाई सोपी नव्हती. तुझ्याविरोधात आणि या आंदोलनाविरोधात अनेकांनी चिखलफेक केली, छी-थू केली. तू केलेले आरोप उलटवून लावण्याकरता तुझ्याचविरोधात विविध आरोप केले गेले. राजकीय हव्यासापोटी तू आंदोलन सुरू केल्याचा आरोपही तुझ्यावर करण्यात आला. पण तरीही तू तुझ्या जागेवरून हलली नाहीस. तटस्थ उभी राहिलीस आणि लढत राहिलीस. या प्रकरणी अद्यापही न्याय मिळालेला नाही. पण तुझ्या उग्र झालेल्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली. त्याचा परिणाम म्हणून संबंधिताला त्याच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. त्याला निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवण्यात आलं. भलेही त्याच्या जागी त्याचा मुलगा उभा राहिला. परंतु, तो स्वतः निवडणुकीसाठी अपात्र ठरला, हे तुझ्या आंदोलनाचं खरं मोठं यश!

ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये गेलेली तू पहिली भारतीय महिला ठरलीस. पण हा आनंदही फार काळ टिकला नाही. वजनाचं गणित न जमल्याने अगदी २४ तासांतच ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यातून तुला अपात्र ठरवण्यात आलं. या अपात्रतेची बातमी ज्याप्रमाणे तुझ्या जिव्हारी लागली असेल, त्यापेक्षा कितीतरी आपल्या देशातील जनतेच्या जिव्हारी लागली आहे. ज्या मुलीने आपल्या सहकारी मैत्रीणीला न्याय मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची पदकं रस्त्यावर ठेवली, ज्या मुलीने आपल्या देशातील मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता आपला खेळ सुरू ठेवला त्या मुलीच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून जाताना पाहणं आमच्यासाठीही कठीणच आहे. पण याही परिस्थितीतून तू सावरशील आणि पुन्हा एकदा देशातील प्रत्येक तरुणीला प्रेरणा देशील. तुझ्यातील ही लढाऊ आणि खेळाडू वृत्ती आम्हा प्रत्येकीसाठी प्रेरणादायीच राहील. त्यामुळे तू ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरली असलीस तरीही आमच्या मनातून, समस्त होतकरू क्रीडापटूंच्या मनातून कधी अपात्र ठरणार नाहीस, याची खात्री आहे. कारण तुझा लढा नेहमीच आम्हाला प्रेरणा देणारा ठरणार आहे.

-तुझीच चाहती

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat is not disqualified in the eyes of indian girl open letter to her chdc sgk