Violence Against Women In UK : जगभरात महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढत असताना युनायडेट किंग्डमचा भाग असलेल्या इंग्लड आणि वेल्समध्येही महिला अत्याचारांची संख्या वाढत जातेय. महिला अत्याचाराची प्रकरणं इतकी वाढली आहेत की इथं मुलींवरील हिंसाचार ही राष्ट्रीय आणीबाणी असल्याचं येथील सुरक्षा यंत्रणांना वाटू लागलं आहे. कारण महिला अत्याचारासंदर्भात दिवसाला तीन गुन्ह्यांची नोंद केली जात आहे. यासंदर्भात मंगळवारी इंग्लमधील पोलिसांनी एक अहवालच प्रकाशित केला आहे. या प्रकाशित अहवालात प्रत्येक १२ महिलेमागे एकजण दरवर्षी बळी ठरत असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे पीडित महिलांची संख्या अधिक असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. एकूण या देशातील महिला सुरक्षा धोक्यात आली आहे. एनटीडीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“महिला आणि मुलींवरील हिंसाचार ही राष्ट्रीय आणीबाणी आहे”, असे वरिष्ठ पोलीस प्रमुख मॅगी ब्लिथ यांनी अहवालासोबत दिलेल्या टिप्पण्यांमध्ये म्हटले आहे. २०२२-२३ मध्ये पोलिसांकडून महिला आणि मुलींवरील १० लाखांहून अधिक हिंसक गुन्ह्यांची नोंद झाल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. तर एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत प्रत्येक पाचवा गुन्हा महिला अत्याचारसंदर्भात होता, असंही या महिला सुरक्षा संदर्भातील अभ्यासात नोंदवलं आहे.
प्रत्येक २० पैकी एकाकडून महिला अत्याचार
२०१८-२०१९ आणि गेल्या वर्षी महिला आणि मुलींवरील हिंसाचारात ३७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. तर, घरगुती अत्याचार सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंड आणि वेल्समधील २० पैकी एक प्रौढ किंवा २.३ लाख लोकांकडून महिला अत्याचार किंवा तत्सम गुन्हे केले जातात, असंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. “हे अंदाज आहेत कारण आम्हाला माहित आहे की बरेच गुन्हे नोंदवलेही जात नाहीत”, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
बाल लैंगिक शोषणाच्या तक्रारीत ४३५ टक्क्यांनी वाढ
पोलीस म्हणाले की, दोन देशांमध्ये महिलांवरील हिंसाचार महामारी पातळीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे याप्रकरणात न्याय व्यवस्थेत सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी पोलिसांनी केली आहे. २०१३ ते २०२२ दरम्यान बाल लैंगिक अत्याचार आणि शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये ४३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २० हजार प्रकरणांवरून थेट १ लाख ७ हजारांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आला आहे.
सार्वजनिक सुरक्षेसाठी राष्ट्रीय धोका
गुन्हेगारांमध्ये तरुणांचा सर्वाधिक समावेश असून सरासरी वय १५ वर्षे आहे, असंही अहवालात म्हटलं आहे. अहवालात असे म्हटले आहे की ऑनलाइन-संबंधित गुन्ह्यांपैकी ८५ टक्के छळासंदर्भात आहे. ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये महिला आणि मुलींवरील हिंसाचार सार्वजनिक सुरक्षेसाठी राष्ट्रीय धोका असल्याचे घोषित केले होते.
अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
गेल्या वर्षभरात ४ हजार ५०० हून अधिक नवीन अधिकाऱ्यांना बलात्कार आणि गंभीर लैंगिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. या अहवालात डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ मध्ये प्रौढ बलात्काराच्या आरोपांमध्ये ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.