ख्रिसमस जवळ आलाय आणि ख्रिसमस पार्टीजचा सीझनही सुरु झाला आहे. हल्ली तर धर्माच्या पलिकडे जाऊन एकत्र येण्यासाठी या ख्रिसमस पार्टीजचं आयोजन केलं जातं. मोठमोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये तर शानदार ख्रिसमस पार्टीज होतातच. पण तुम्ही तुमच्या घरीही मस्त हाऊस ख्रिसमस पार्टीचं आयोजन करु शकता. बाहेर अनेकदा तुम्हाला न आवडणारी गाणी, नावडते खाद्यपदार्थ, भरपूर गर्दी अशा गोष्टींचा अनुभव येतो. याउलट तुम्ही तुमच्या घरी पार्टी आयोजित केलीत तर तुम्हाला हवं ते म्युझिक ऐकू शकता, तुमच्या चॉईसचं पार्टी फूड ठेवू शकता आणि तुम्हाला हव्या त्याच मित्रांना बोलावू शकता. त्यासाठी पार्टीचं नियोजन अगदी परफेक्ट असलं पाहिजे. पण त्यासाठी पार्टी प्लानर्सकडे जायची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही खास टिप्स ज्यामुळे तुम्हीही रॉकिंग हाऊस पार्टीही आयोजित करु शकता
आणखी वाचा : नातेसंबंध: ‘वीकेण्ड कपल’ असंही सहजीवन?
१) लिमिटेड मित्रांनाच बोलवा
तुमचं घर किंवा अंगण किती मोठं आहे ते लक्षात घेऊन ‘गेस्ट लिस्ट’ तयार करा. काहीजणांना पार्टीमध्ये उभं राहायला आवडत नाही. तसंच डान्स करायलाही जागा असेल हे लक्षात घेऊनच पाहुण्यांना बोलवा. काहीवेळेस तुम्ही बोलावलेले पाहुणे त्यांच्यासोबतही काहीजणांना घेऊन येऊ शकतात. त्यामुळे त्यादृष्टीने तयारी करा. महत्त्वाचं म्हणजे पाहुण्यांना अगदी वेळेवर नाही तर वेळेच्या आधी निमंत्रण पाठवा. ते येणार आहेत का, याबद्दल त्यांना कळवायला सांगा म्हणजे तुम्हाला नियोजन करायला सोपं जाईल. पाहुणे येण्याआधी तुम्ही मस्त तयार व्हा आणि त्यांचं स्वागत करा.
२) आधीपासूनच मेन्यू ठरवा
तुम्हालाही पार्टीचा आनंद घ्यायचा आहे, हे लक्षात घेऊन आधीच मेन्यू ठरवा. त्यातल्या बऱ्याच गोष्टी तयार करुन ठेवा किंवा वेळेआधी मागवून ठेवा. येणाऱ्या पाहुण्यांचं डाएट, आवडीनिवडी लक्षात घेऊन शक्यतो मेन्यू ठरवा. कुणाला कशाची अॅलर्जी तर नाही ना, काहीजण ग्लुटेन, मीट किंवा डेअरीचे पदार्थ खात नाहीत, ते विचारून घ्या. म्हणजे पदार्थ वाया जाणार नाहीत आणि तुमचे गेस्टही खूश होतील.
आणखी वाचा : Flashback 2022 : ‘या’ घटना ठरल्या महिलांसाठी लक्षणीय!
३) कॉकटेल/ड्रिंक्सची योग्य निवड
सगळ्यांत जास्त फेवरेट ड्रिंक कोणतं आहे ते लक्षात घेऊन त्याचं नियोजन करा. तुमच्या मुख्य पार्टीबरोबरच कॉकटेल पार्टीसाठीकडेही लक्ष द्या. लहान मुलं असतील किंवा अल्कोहोल न घेणारे असतील तर त्यांच्या आवडीची ड्रिंक्स नक्की ठेवा.
४) घर मस्त सजवा
घराला ख्रिसमस पार्टीचा फील द्या. एखादं ख्रिसमस ट्री नक्की ठेवा. त्यामुळे तुमच्या पार्टीची शोभा आणखीनच वाढेल. हे ख्रिसमस ट्री अगदी कोपऱ्यात ठेवू नका. उलट सगळ्यांना सहज दिसेल अशा जागी ते डेकोरेट करुन ठेवा. येणाऱ्या पाहुण्यांसाठी, मित्रांसाठी छोटे छोटे मेसेज लिहून ते ख्रिसमस ट्री वर लावा. तुमच्या पाहुण्यांना ही आयडिया नक्कीच आवडेल.
५) खास वेगळी प्लेलिस्ट तयार करा
पार्टी म्हटलं की म्युझिक आलंच. तुम्ही म्युझिकचं परफेक्ट नियोजन केलंत की पार्टी यशस्वी झालीच म्हणून समजा. त्यामुळे तुमचे जे गेस्ट आहेत त्यांची आवड लक्षात घेऊन गाणी निवडा. अर्थात या प्ले लिस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी असतील याची काळजी. तुमच्याकडे असलेले स्पीकर्स चांगले आहेत ना हे आधी तपासून बघा म्हणजे ऐनवेळेस गोंधळ होणार नाही.
६) फन गेम्स ठेवा
येणाऱ्या पाहुण्यांनी तुमची पार्टी एंजॉय करावी असं वाटत असेल तर काही गेम्स नक्कीच ठेवा. पाहुणे कोणत्या वयाचे आहेत ते लक्षात ठेवून फन गेम्सची निवड करा. त्यासाठी काही प्रॉप्स लागणार असतील तर ते आधीपासूनच तयार करुन ठेवा. या गेम्समध्ये जे जिंकतील त्यांना छोटंसं गिफ्ट नक्की द्या.
आणखी वाचा : वेश्याव्यवसायात ढकललं… समाजानं झिडकारलं… पण आज कर्तृत्व पाहून सन्मानित केलं!
७) एखादी थीम ठेवा
तुम्हाला शक्य असेल तर पार्टीसाठी एखादी थीम ठेवा. तुमच्या घरातलं पार्टीचं ठिकाणही या थीमप्रमाणचे सजवा.
८) जेवणाचं टेबलही सजवा
जेवण ठेवलेलं टेबलही मस्त डेकोरेट करा. ख्रिसमस पार्टी असल्यानं लाल रंगाचा टेबलक्लॉथ, फॅन्सी मेणबत्या नक्की ठेवा. टेबल्सवर प्लेट्स, खाद्यपदार्थ व्यवस्थित मांडून ठेवा. अशा पार्टीजमध्ये बुफे असला तर जास्त मोकळेपणा येतो. जेवणाच्या ठिकाणी पुरेशी मोकळी जागा ठेवा. खाऊन झाल्यावर प्लेट्स टाकण्याची व्यवस्थाही व्यवस्थित करा.
९) मदत स्वीकारा
पार्टीमध्ये सगळं एकट्यानं करण्याच्या भानगडीत पडू नका. कुणी विचारलं तर त्यांना मदत करु द्या. त्यामुळे पाहुण्यांनाही मोकळं वाटेल आणि तुमच्यावरचा भार कमी झाल्यानं तुम्हालाही पार्टी एंजॉय करता येईल.
आणखी वाचा : केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये बदलण्यात आली ‘महिला’ शब्दाची व्याख्या; जाणून घ्या काय आहे नवा अर्थ
१०) रिटर्न गिफ्टस द्या
येणाऱ्या पाहुण्यांना कृतज्ञता आणि तुमची आठवण म्हणून छोटीशी का होईना भेट नक्की द्या. तुमची पार्टी त्यांच्या कायम लक्षात राहील. लहान मुलं असतील तर कुणीतरी सांताक्लॉजच्या वेशात त्यांना त्यांच्या आवडीची गिफ्ट्स द्या. यामुळे मुलं अगदी खूश होतील.
११) बाथरुमकडेही लक्ष द्या
पार्टीसाठी घर सजावट, खाणंपिणं, गिफ्ट्स या नादात तुमची बाथरुमही स्वच्छ करायला विसरु नका. येणाऱ्या पाहुण्यांसाठी नॅपकीन्स, टिश्यू पेपर, हॅण्डवॉश, साबण अशा गोष्टींची व्यवस्थित सोय करा.
या छोट्या छोट्या टीप्स लक्षात ठेवल्यात तर तुमची हाऊस पार्टीही धम्माल होईल.
(शब्दांकन : केतकी जोशी)