१) चिंच आणि आमसूल टिकवणं –
चिंच पूर्वीच्या काळी वर्षाची घेऊन ठेवत. तिला पाण्याचा हात लावून मीठ लावून चिंचेचे गोळे करत आणि ते वाळवून ठेवत. आता एवढं करणं धावपळीच्या जीवनात शक्य होणार नाही. यात चिंचेचे गोळे नीट वाळणं फार महत्त्वाचं असतं. शिवाय गरजेच्या, घाईच्या वेळी चिंचेचा गोळा सोडवून घेताना गडबड होते, त्यातली उरलेली चिंच पुन्हा साठवावी लागते. त्यामुळे ही प्रक्रिया आता शहरी जीवनात मागे पडते आहे. तरीही आजही चिंच खरेदी करताना किमान काही महिने पुरेल एवढी तरी घेतली जातेच. ती टिकवायला त्यातल्या त्यात सोपी प्रक्रिया अशी- की चिंच सुटी करून स्वच्छ कापडावर वा प्लास्टिकच्या कागदावर उन्हात खडखडीत वाळवावी. एक काचेच्या कोरड्या बरणीत खाली थोडं मीठ घालावं, त्यावर थोडी चिंच घालावी. चिंचेच्या थरावर आणखी थोडंसं मीठ, मग पुन्हा चिंच, असे थर द्यावेत. अशा प्रकारे चिंच उत्तम टिकते.
आमसूल खरेदी करतेवेळीच थोडं ओलसर असतं. ते बाहेर टिकवायचं असेल, तर तेही उन्हात वाळवून मग काचेच्या कोरड्या डब्यात घालून ठेवावं. आमसुलला आधीच मीठ लावलेलं असतं, त्यामुळे पुन्हा मीठ घालावं लागत नाही. आमसूल थोडंच असेल, तर ओलसर आमसूल चांगल्या प्लास्टिकच्या डब्यात भरून फ्रीजमध्येही (फ्रिजरमध्ये नव्हे.) चांगलं टिकतं.
२) तांदुळाला मुंग्या लागू नयेत म्हणून –
अनेकदा तांदुळाला कीडा- मुंगी लागते आणि तांदूळ भुगा भुगा होऊन खराब होऊ लागतो. अशा वेळी तांदळाच्या डब्यात थोड्या लवंगा घालून ठेवाव्यात म्हणजे तांदळाला मुंग्या लागणार नाहीत. अर्थातच भट करायच्या वेळी तांदूळ धुण्यापूर्वी लवंगा काढून ठेवाव्यात. आणि राहिलीच एखादी लवंग भातात, तरी भाताला चांगलाच वास लागेल.
३) कोथिंबीर, पालेभाज्या, कढीपत्ता फ्रीजमध्येही खराब होणे –
कोथिंबीर, पालेभाज्या आणि कढीपत्ता आपण आठवड्याचा आणतो आणि कित्येकदा आणला तसाच पिशव्यांमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देतो. पण २-३ दिवसांमध्येच कोथिंबीर अनेकदा पूर्ण वाळलेली किंवा ओली असेल तर कुजून काळी पडलेली दिसते. यात खूपशी कोथिंबीर वायाच जाते, त्यातली जी त्यातल्या त्यात चांगली दिसते ती वापरली, तरी तिची चव पदार्थात चांगली लागत नाही. पालेभाज्यांची मलूल पडतात, लगेच कुजलेल्या किंवा शिळ्या दिसतात. कढीपत्ता तर फ्रीजमध्ये प्लास्टिक पिशवीत ठेवला तर वाळूनच जातो. त्याचीही चव बदलते.
यावर एक छोटीशी टिप आहे. कोथिंबीर आणल्या आणल्या त्याची जुडी सोडून कोथिंबीर धुवून घ्यावी. त्याची मुळं कापून कोथिंबीर निवडून घ्यावी. कापडावर ती पसरून त्यातला पाण्याचा अंश वाळू द्यावा. व्यवस्थित वाळलेली कोथिंबीर प्लास्टिकच्या डब्यात ठेवावी. कोथिंबिरीच्या खाली आणि वर टिश्यू पेपर ठेवावा, म्हणजे फ्रीजमध्ये थंडपणामुळे डब्याच्या आत पाण्याचे थेंब तयार झाले तरी ते टिपले जातील. प्रत्येक वेळी कोथिंबीर वापरायला काढली, की ती कोरडी राहिली आहे ना, ते तपासावं. आठवड्याच्या म्हणून आणलेल्या सर्व पालेभाज्या या प्रकारे चांगल्या राहतात. कढीपत्तासुद्धा अशा प्रकारे चांगला राहतो. अर्थात कोथिंबीर नाजूक असते. ती खूप जास्त दिवस जशीच्या तशी टिकू शकत नाहीच. त्यामुळे शक्यतो थोडी थोडीच कोथिंबीर आणलेली बरी!
४) रवा, मैदा, शेंगदाणे खराब होणे –
रवा, मैदा आणि शेंगदाणे फार दिवस टिकत नाहीत, याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. त्यात तुम्ही राहता त्या भागात पुष्कळदा दमट वातावरण असेल, तर विचारायलाच नको! अशा वेळी खूपदा असा अनुभव येतो, की रवा, मैदा, शेंगदाणे वापरायला काढले, की त्यात जाळी झालेली असते. काही वेळा अळ्या आणि पोरकिडेसुद्धा होतात. हे टाळण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे रवा आणि शेंगदाणे भाजून नॉर्मल तापमानाला आल्यावर डब्यात भरून ठेवणं. हे काम मायक्रोवेव्हमध्येसुद्धा सोप्या पद्धतीने करता येतं आणि त्यात एकदा वेळेचा अंदाज आल्यावर सारखं लक्ष द्यावं लागतं नसल्यामुळे वेळ वाचतो.
मैदा मात्र भाजून ठेवता येत नाही, पण तो फ्रीजमध्ये उत्तम टिकतो. फक्त वापरण्यापूर्वी थोडा वेळ तो बाहेर काढून ठेवावा. मैद्याच्या बाबतीत आणखी एक काळजी घ्यायला हवी. मैदा फ्रिजमधून काढल्यावर काही वेळा तो ठेवलेल्या पिशवीच्या आत पाण्याचे बारीक बारीक थेंब दिसतात. असं झालं, तर मैदा वापरानंतर नवीन, कोरड्या पिशवीत काढून मग पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा, म्हणजे तो ओलसर होणार नाही आणि चांगला टिकेल.
५) सुकं खोबरं टिकवण्यासाठी –
अनेकदा गोटा खोबऱ्याला जाळी लागून ते खराब होतं, काळं पडतं, त्याची चवही खवट व कडवट होते. सुक्या खोबऱ्याच्या वाट्या अधिक टिकवण्यासाठी त्या तुरडाळीच्या डब्यात डाळीत पूर्णपणे झाकलं जाईल अशा प्रकारे ठेवावं, म्हणजे त्याला जाळी लागत नाही.
lokwomen.online@gmail.com