सुचित्रा प्रभुणे
वायनाडमध्ये सध्या चर्चेत असलेले ‘स्तनपान’ कोणतीही सामाजिक मोहीम नसून, वायनाड मदतकेंद्रात स्तनपान करून तेथील अनेक तान्हुल्या बाळांची भूक शमविणाऱ्या भावनाची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच झालेल्या वायनाड भूस्खलन घटनेने देशाला फार हादरवून टाकले आहे. आजची रात्र ही काळरात्र ठरणार आहे याची पुसटशी कल्पनाही तेथील गावकऱ्यांना नव्हती. सारे गावकरी गाढ झोपेत असतानाच रात्री होत्याचे नव्हते झाले. भूस्खलन झाले नि कित्येक माणसे त्यात गाडली गेली. मरण पावली. या घटनेची वार्ता समजताच तातडीने शोध कार्यास सुरुवात झाली. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन सरकार बरोबर अनेकांनी या मदतकार्यास आर्थिक व भौतिक पातळीवर मदत केली असेल. पण जी तान्हुली बाळे आहेत त्यांचे काय? त्यांना कोण खाऊ-पिऊ घालणार? महत्त्वाचे म्हणजे मातेचे दूध पुरविणार तरी कसे? तेलंगणा राज्यातील इडूकी जवळील उपुथारा येथे राहणाऱ्या भावना यांच्या मनात हा विचार आला आणि तिची घालमेल वाढू लागली. तिला स्वत:ला चार महिन्याचे बाळ असून चार वर्षांची मुलगीदेखील आहे. त्यामुळे आपण तिथे जाऊन तेथील आई हरविलेल्या बाळांसाठी स्तनपान दिले तर त्या बाळांना खूप फायदा होईल असा विचार या तरुण माऊलीच्या मनात आला.

हेही वाचा : Paris Olympics 2024: बाईपण भारी देवा! कुणी गरोदर, तर कुणाचं तान्हं बाळ; ऑलिम्पिकमध्ये ‘या’ महिलांच्या कामगिरीमागचा संघर्ष एकदा वाचाच…

आई हरविलेल्या बाळांच्या काळजीने भावनाची झालेली अवस्था पाहून तिच्या नवऱ्याने- साजिनने वायनाड मदत केंद्रात संपर्क साधला आणि आपण कोणत्या प्रकारची मदत करण्यास उत्सुक आहोत हे सांगितले. त्यांचे ते काम ऐकून त्यांना ताबडतोब तिथे येण्यास सांगितले. आपल्या गावापासून ते वायनाड पर्यंतचा ४०० किमी.चा टप्पा स्वत:च्याच जीपने पार करून भावना व साजिन आपल्या मुलांसह मेपेडी येथे पोहचले. तिथे गेल्यावर त्यांनी तेथील कॅम्प आणि वस्तीगृहांना भेट दिली आणि सहा महिन्यांपेक्षा लहान असलेल्या बाळांना तिने स्तनपान दिले. काही बाळांच्या माता जखमी अवस्थेत होत्या. जो पर्यंत या माता बऱ्या होऊन येत नाहीत, तोपर्यंत तिने त्या बाळांना आपले स्तनपान देत होती. इतकेच नाही तर ज्या ज्या बाळांना देखभालीची गरज होती, त्यांची देखभालदेखील हे दाम्पत्य अत्यंत आपुलकीने करीत होते.

भावना सध्या जरी गृहिणी म्हणून कार्यरत असली तरी लग्नाच्या आगोदर ती एका नर्सरीमध्ये कार्यरत होती आणि त्यानंतर तिने काही काळ पब्लिक स्कूलमध्ये काम केले होते. शिवाय पदरी दोन लहान मुले असल्यामुळे मुलांची मानसिकता काय असते याची तिला जाणीव होती. वायनाड दुर्घटनेचे वर्तमानपत्रातून फोटो पाहिल्यानंतर, त्यातही लहान बाळांचे फोटो पाहिल्यानंतर अचानक तिला जाणविले की, इतरांना अन्न-पाणी मिळू शकते, पण या बाळांचे काय? या बाळांसाठी काहीतरी करण्याची तिची इच्छा होती. आपण यांना स्तनपान देऊ शकतो, हा विचार तिच्या मनात आला आणि तसा तो तिने नवऱ्याला बोलून दाखविला. त्यालादेखील तिचा विचार पटला आणि ताबडतोब त्यांनी वायनाड मदतकेंद्राला संपर्क साधून आपण कोणत्या प्रकारची मदत करण्यास उत्सुक आहोत हे सांगितले. त्यांची ही आगळी-वेगळी, पण खरोखरीच उपयुक्त असलेली मदत लक्षात घेऊन त्यांना ताबडतोब तिथे येण्यास सांगितले. साजिन हे स्वत: पिक-अप चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ते स्वत:ची जीप घेऊनच वायनाड येथे पोहचले.

हेही वाचा : अचूक लक्ष्यवेध साधणाऱ्या ‘त्या तिघीं’च्या संघर्षाची कहाणी

भावना आणि साजिन या तेलगु दाम्पत्यांची ही मदत निश्चितच दखल घेण्याजोगी आहे. कारण फक्त पैसे देऊनच मदत करता येते, हा भ्रम या निमित्ताने दूर झाला. तसे पहिले तर हे दाम्पत्य सर्व सामान्य कुटुंबासारखेच आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती ओढविते, तेव्हा बऱ्याच संवेदनशील माणसांच्या मनात तेथील मदतकार्यात सहभागी होण्याची इच्छा असते. पण बऱ्याचदा आपल्याकडे तितका पैसा नाही म्हणून किंवा आपण काय करू शकतो असा विचार करतच मदत करण्याचा विचार बारगळतो. पण भावना आणि साजिनने मात्र इच्छा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो, याचे उदाहरण आपल्या अनोख्या कृतीतून समजासमोर ठेवले आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आणि तितकेच प्रेरणादायी आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wayanad landslides breastfeeding to babies who lost their mother inspiration in wayanad relief efforts css