अलाहाबाद न्यायालयाने ‘फ्री रिलेशनशिप’मुळे तरुणाई मानसिक तणावात आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच आजची तरुणाई पाश्चिमात्य गोष्टींचे अंधानुकरण करत आहे, असेही मत त्यांनी मांडले आहे. यासंदर्भात मुंबईत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तीन जोड्यांना(कपल्स) यासंदर्भात त्यांचे मत विचारले. त्यांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याबाबत त्यांनी पूर्ण विचार केला आहे आणि ते का राहतात हेही सांगितले. अलाहाबाद न्यायालयाच्या या निरीक्षणाबाबत आजची तरुणाई काय म्हणते हे बघणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलाहाबाद न्यायालयाचे निरीक्षण काय आहे ?

”मुक्त संबंधांच्या लालसेतून अनेक तरुण-तरुणी त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत,” अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी अलाहाबाद कोर्टने केली आहे. “पाश्चिमात्य संस्कृतीचं हे अनुकरण असून, यामुळे आयुष्यभराचा जीवनसाथी मिळत नाही”, याबाबतही न्यायालायने चिंता व्यक्त केली आहे. एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणी सुनावणी करताना न्यायायलायने ही टिप्पणी केली आहे.“पाश्चिमात्य संस्कृतीचे आंधळेपणे अनुकरण करणारे देशातील तरुण मुक्त संबंध ठेवण्यास प्राधान्य देतात. या लालसेपोटी तरुणाई आपले आयुष्य वाया घालवत आहे. यामुळे त्यांना योग्य जीवनसाथी मिळत नाही. सोशल मीडिया, चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून असे नातेसंबंध दाखवले जातात. त्याचा प्रभाव तरुणांवर पडतो. यामुळे तरुणांना त्यांच्या जीवनाचा योग्य मार्ग ठरवता येत नाही”, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा : सीमा, अंजू… अशी कोणती परिस्थिती परदेशातील प्रियकराकडे नेते ? काय असू शकतात कारणे…

विवाहसंस्थेवर आमचा विश्वास नाही…

अनिकेत चौगुले आणि चित्रा नाईक हे दोघे घरच्यांना सांगून कल्याण येथे ‘लिव्ह इन’मध्ये ६ वर्षे राहत आहेत. त्यांना विचारले असता ते म्हणाले, ”आम्ही एकमेकांना महाविद्यालयात असल्यापासून ओळखतो. आमचे प्रेमही आहे. परंतु, आमचा विवाहसंस्थेवर विश्वास नाही. लग्न झाल्यावर संसार सुरू होतो. मग, ‘पार्टनर’ न राहता ‘नवरा-बायको’ असे काही संकुचित नाते तयार होते. लग्न, नाही जमलं तर घटस्फोट त्यातून कौटुंबिक, सामाजिक ताण अधिक येतो. जबाबदाऱ्या, एकमेकांना गृहीत धरणे, या गोष्टी आम्हाला नको होत्या. आम्ही दोघं चांगले मित्र (फ्रेंड्स) आहोत आणि मुख्य म्हणजे आम्ही ‘लिव्ह इन’मध्ये खुश आहोत.

लग्न म्हणजे तरी काय ?

मयूर श्रोत्री आणि सायली चंदनानी हे साडेतीन वर्षे सांताक्रूझ येथे ‘लिव्ह इन’मध्ये राहत आहेत. ‘लिव्ह इन’मध्ये राहण्यासंदर्भात त्यांनी काही मते स्पष्टपणे मांडली आहेत. ते म्हणतात,”लग्न म्हणजे नक्की काय असतं ? समाजाच्या संमतीने आणि कुटुंबाच्या संमतीने एकत्र राहणे आणि त्याला सामाजिक-कायदेशीर चौकट, मर्यादा असतात. तथाकथित नीतिनियमाने राहणे. मग, या चौकटी वर्ष-दोन वर्षात का तुटतात ? तेही हा घोरतो, ही आळशी आहे, अशा कारणांनी? आम्ही लग्न करू असं नाही. एकमेकांना समजून-जाणून घेण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. पण, आम्हाला चौकट नकोय. भविष्य आपण कोणीच सांगू शकत नाही. ३६ गुण जुळणारी लग्न ३६ महिन्यांत संपतात. आमचं एकत्र राहणं समाजाच्या चौकटीत बसत नसेल, पण आम्ही खूप आनंदात आहोत. एकमेकांना वेळ देतो तसेच स्वतःची स्पेस जपतो. कारण, लिव्ह इनमध्ये एकमेकांवर आम्ही बंधन घालत नाही. कदाचित आम्ही वेगळेसुद्धा होऊ. माहीत नाही. परंतु, वेगळे होतानाही आम्ही चांगले मित्र नक्कीच असू.

हेही वाचा : नक्षत्रांची वाहने सांगतात पावसाचा अंदाज ? नक्षत्राचे वाहन म्हणजे काय ? पावसालाही टोपणनावे असतात का ?

आम्हाला चौकट नकोय…

सुरज देशपांडे आणि कृतिका पानवलकर ११ वर्षे दादर येथे ‘लिव्ह इन’मध्ये राहत आहेत. त्यांनी याविषयी घरच्यांना कल्पना दिली आहे. ते म्हणतात,”आम्ही आमच्या मर्जीने राहतो. आम्ही शाळेपासून एकमेकांना ओळखतो. प्रेम किंवा आकर्षण आम्हाला एकमेकांविषयी आहे. आम्ही एकमेकांचे ‘पार्टनर’ आहोत. आयुष्यात जोडीदार हवा असतो आणि त्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही. एकच एक व्यक्ती कधीही परिपूर्ण भेटू शकत नाही. तुम्हाला स्वातंत्र्य असले पाहिजे. कदाचित आम्ही उद्या एकमेकांना वैतागू आणि कदाचित वेगळे होऊ. लग्नामध्ये घटस्फोट असतो. घटस्फोटामध्ये सामाजिक-कौटुंबिक हाल होतात. तथाकथित नातेवाईक मग ‘घटस्फोटित’ टॅग लावतात. त्यामुळे आम्हाला आतातरी केवळ एकत्र राहावंसं वाटतंय. पुढचं माहीत नाही. पण, आम्ही आनंदात आहोत.

एकंदरीत या तीन मतांचा विचार करता, सध्या वाढणारा घटस्फोटाचा दर, अशाश्वत भविष्यकाळ, स्वातंत्र्य या गोष्टी केंद्रस्थानी आहे. केवळ पाश्चात्य एकत्र राहतात म्हणून ही तरुणाई लिव्ह इनमध्ये राहते, असे नाही. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा परिणाम आहे. लग्न हे बंधन असा समज असल्यामुळे त्यांना ‘स्पेस’ मिळणार नाही, असे वाटते. ते भावनिकदृष्ट्या अटॅच आहेत, तेवढेच नकार पचवायला ते तयार आहेत. भावनिक गुंतागुंत करून न घेता ‘लिव्ह इन’ संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.
आज तरुणाई ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे ‘तू मेरा बॉयफ्रेंड तू मेरी गर्लफ्रेंड’ यांना समजतात. ही केवळ रिलेशनशिप आहे. या नात्यात कधीकधी प्रेमाच्या आणाभाका असतात. लग्नाची स्वप्न असतात. प्रेम आहे की आकर्षण हेच ‘क्लिअर’ नसते. शारीरिक आकर्षणाला प्रेम समजले जाते. त्यानंतर दुरावा निर्माण झाल्यावर ‘मैं जान दूंगा/दूंगी’ असे संवाद होतात. मग अत्याचार, मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. ‘लिव्ह इन’मध्ये राहणारी तरुणाई ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ‘मॅच्युअर’ असणे आवश्यक आहे. ‘लिव्ह इन’च्या मर्यादाही माहीत असणे आवश्यक आहे. केवळ फर्स्ट साईट लव्हचे पर्यवसान ‘लिव्ह इन’मध्ये होईल, असे नाही. जे अंधानुकरण करतात, त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सर्वाचा सारासार विचार करणे, महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We live in a live in relationship because what are the views of youth vvk
Show comments