महिलांना देशाचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळावी, राजकीय क्षेत्रात लैंगिक भेद संपावा आदी उद्दीष्टांसाठी संसदेत महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांत या विधेयकाची अंमलबजावणी केली जाईल. एकीकडे देशातील महिलांना समान हक्क मिळावे म्हणून संसदेतच कायदा केला जात असताना दुसरीकडे संसदेत जाणाऱ्या महिलांचं प्रमाणच घटत जात असल्याचं सिद्ध झालं आहे. १८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून फक्त ३० किंवा ३० पेक्षा जास्त महिला उमेदवार विजयी घोषित झाल्या आहेत. १७ व्या लोकसभा निवडणुकीत हीच संख्या ७८ होती. गेल्या टर्मपेक्षा यंदा कमी महिला खासदार जिंकून आल्या आहेत.
सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि कुमारी सेलजा, भाजपाच्या कंगना रणौत आणि हेमा मालिनी, समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव आणि आरजेडीच्या मीसा भारती या महिला उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, अमेठीच्या विद्यमान खासदार स्मृती इराणी आणि सुलतानपूरच्या खासदार मनेका गांधी यांचा दारुण पराभव झाला. यावेळी एकूण ७९७ महिलांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. ७९७ पैकी फक्त ३० महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा ही संख्या कमी आहे. २०१९ मध्ये ७८ महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या.
२०१९ मध्ये फक्त १४ टक्के महिला खासदार होत्या. तर, यंदाच्या निवडणुकीत केवळ साडेपाच टक्के महिलाच संसदेत निवडून गेल्या आहेत. देशाच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपासून महिला उमेदवारांचा राजकारणात ओघ सुरू आहे. राजकारणात विविध पातळ्यांवर, पदांवर महिलांची संख्या अधिक असली तरीही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. १९५७ साली पार पडलेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ४५ महिला उमेदवार उभ्या राहिल्या होत्या. त्यापैकी २२ उमेदवार जिंकून आल्या होत्या. त्या वेळची सामाजिक परिस्थिती, चालीरीती, रूढी, परंपरा व राजकीय स्थिती ही आताच्या स्थितीपेक्षा खूपच वेगळी होती. परंतु, तरीही आता जिंकून येणाऱ्या महिलांच्या तुलनेत तेव्हा जिंकून आलेल्या महिलांची टक्केवारी सर्वाधिक होती. गेल्या काही वर्षांत जिंकून येणाऱ्या महिला खासदारांची संख्या वाढली असली तरीही एकूण महिला उमेदवारांच्या तुलनेत जिंकणाऱ्या महिला उमेदवारांच्या टक्केवारीचा आलेख सातत्यानं वर-खाली होत असल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्रात स्थिती काय?
२०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून ८ महिला संसदेत गेल्या होत्या. तर, यंदाच्या निवडणुकीत ७ महिला खासदार संसदेत गेल्या आहेत. धुळ्यातून शोभा बच्छाव, जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर, मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि बारामतीमधून सुप्रिया सुळे जिंकून आल्या आहेत. २०१९ साली निवडून आलेल्या हिना गावित, नवनीत राणा, भारती पवार यंदाच्या निवडणुकीत हरल्या. तर, भावना गवळी, पूनम महाजन, प्रीतम मुंडे यांना यंदा उमेदवारीच दिली गेली नव्हती.
आतापर्यंत कोणत्या टर्ममध्ये किती महिला खासदार झाल्या?
निवडणूक साल | महिला उमेदवार | जिंकून आलेली संख्या | टक्केवारी (%) |
१९८४ | १७१ | ४३ | २५ |
१९८९ | १९७ | २९ | १५ |
१९९१ | ३३० | ३८ | १२ |
१९९६ | ५९९ | ४० | ७ |
१९९८ | २४७ | ४३ | १६ |
१९९९ | २८४ | ४९ | १७ |
२००४ | ३५५ | ४५ | १७ |
२००९ | ५५६ | ५९ | ११ |
२०१४ | ६६८ | ६२ | ९ |
२०१९ | ७१५ | ७८ | ११ |
२०२४ | ७९७ | ३० | ३.३ |