तुम्ही ‘को-ऑर्ड सेट’ हे नाव ऐकलं आहे का? जर तुम्हाला स्त्रियांच्या ‘फॅशन’च्या बाबतीत ‘अपडेटेड’ राहायचं असेल, तर ‘को-ऑर्डस्’ ही आजची ‘इन थिंग’ आहे हे लक्षात घ्या. हे नाव जरा विचित्र वाटतं, पण कपड्यांची ही फॅशन मात्र क्लिष्ट नव्हे, अगदी सुटसुटीत आहे! ही फॅशन अजून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसू लागलेली नाही, हे खरं आहे, पण ‘ग्लिम्प्स’ या ‘डेटा ॲनालायझर’ संकेतस्थळानं नुकतीच एक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे, त्यातल्या दाव्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूणात इंटरनेटवर ‘को-ऑर्ड सेट’ या फॅशनबद्दल वापरकर्त्यांकडून होणारं सर्चिंग ९७ टक्के इतकं वाढलं आहे. ‘ग्लिम्प्स’च्याच माहितीनुसार याविषयीच्या सर्चमध्ये इन्स्टाग्रामवर अधिक चर्चा होते. हा प्रकार काय आहे हे लोक उत्सुकतेनं पाहात आहेत, खरेदीही करू लागले आहेत. परदेशात वापरली जाणारी ही फॅशन भारतातल्याही बहुतेक सर्व आघाडीच्या ब्रॅण्ड्सनी आपलीशी केली आहे. त्यामुळे खास भारतीय फॅशनला शोभतील असे ‘को-ऑर्डस्’ आता शॉपिंग ॲप्सवर मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत.
आणखी वाचा : सतत सॉफ्ट पॉर्न पाहणाऱ्यांच्या दृष्टीने बलात्कार साधा गुन्हा?
‘को-ऑर्डस्’ असतात काय?
‘को-ऑर्ड सेट’ म्हणजे एकाच रंगाच्या किंवा एकाच डिझाईनच्या कापडातून शिवलेला टॉप आणि बॉटम (पँट) यांची जोडी. म्हणजे ‘मॅचिंग’ वगैरे शोधायचा त्रास नाही. परदेशी पद्धतीच्या ‘को-ऑर्ड सेट’मध्ये टॉप हा साधारणत: क्रॉप टॉप असतो, तर पँट ही ‘हाय वेस्टेड’ असते. पण असा काहीही नियम नाही. ‘को-ऑर्ड सेट’मध्ये फॅशनचं खूप वैविध्य पाहायला मिळतं. ट्राऊझर-टॉप, शॉर्टस् आणि टॉप, फ्लेअर्ड किंवा ए-लाईन स्कर्ट आणि क्रॉप टॉप किंवा साधा टॉप, पलाझो आणि कुर्ती वा कुर्ता, शरारा आणि कुर्ती, पलाझो आणि कफ्तान अशा विविध जोड्यांमध्ये ‘को-ऑर्डस्’ मिळू लागले आहेत. नियम एकच, की टॉप आणि बॉटम एकाच कापडातून शिवलेले असतात किंवा निदान एकाच रंगाच्या वा डिझाईनच्या कापडातून शिवलेले असतात. म्हणजेच एकमेकांशी मिळतेजुळते असतात.
आणखी वाचा : किरण पावसकरांना खुलं पत्र; साहेबांना ‘बायकी धंदे’ करायला सांगाच, कारण…
कॅज्युअल ते फॉर्मल
‘को-ऑर्डस्’ ही अशी एक फॅशन आहे, जी ‘कॅज्युअल वेअर’ आणि ‘फॉर्मल वेअर’ या दोन्ही स्वरूपात चांगली दिसू शकते. कॅज्युअल लूकसाठी क्रॉप टॉप आणि बॉटमसारखे ‘को-ऑर्डस्’ चांगला लूक देतात, तर चांगल्या दर्जाच्या, जाड कॉटनच्या कापडातली ट्राऊझर वा पलाझो आणि बंद गळ्याची वा शर्टस्टाईल कुर्ती या फॅशनमधले ‘को-ऑर्डस्’ ऑफिसला जातानाही उत्तम दिसतात.
एकत्र आणि वेगवेगळेही वापरा!
‘को-ऑर्ड सेट’मध्ये येणारा टॉप आणि बॉटम हे एक सेट म्हणून परिधान करता येतंच, पण यातला टॉप दुसऱ्या कुठल्या पँट, स्कर्ट वा जीन्सवर घालता येतो आणि ‘को-ऑर्ड’मधली बॉटम दुसऱ्या कोणत्याही टॉप वा टी-शर्टबरोबरसुद्धा घालता येते. आहे ना मजा!
आणखी वाचा : गोष्ट फराळाची: सुनेत्रा अजित पवार… चकली… सुप्रिया सुळे अन् ३५ वर्षांनंतरही मिळणारा सासूचा ‘तो’ सल्ला
‘मिक्स अँड मॅच’ची संकल्पना बदलली
काळानुसार कोणत्याही प्रकारचा टॉप आणि बॉटम यातली ‘मिक्स अँड मॅच’ची संकल्पना बदलली आहे. पूर्वी मॅचिंग होण्यासाठी ‘काँट्रास्ट’ रंगसंगती साधण्यावर कपड्यांमध्ये भर दिलेला असायचा. आता तुम्ही जर विविध ब्रॅण्डस् चे कपडे पाहिलेत, तर ही पद्धत बदलल्याचं लक्षात येतं. ‘को-ऑर्ड सेट’ हेही या बदलाचंच एक उदाहरण. एकाच कापडातून शिवलेला टॉप आणि बॉटम ही फॅशन पूर्वी कदाचित ग्राहकांच्या विशेष पसंतीस आली नसती, पण आता ती त्यांना आकर्षून घेतेय असं दिसतंय.