हल्ली वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर रंगीबेरंगी साबणांसारख्या दिसणाऱ्या शॅम्पू बार्सच्या जाहिराती लक्ष वेधून घेऊ लागल्या आहेत. पूर्वी खास केसांना लावण्यासाठीचे काही साबण मिळत असत. शिकेकाई आणि इतर काही घटकांचा त्यात समावेश असे. मात्र हे केसांचे साबण इतर साध्या साबणांसारखेच भरपूर फेस करणारे असत. शिवाय ते केसांना लावल्यावर केस फार कोरडे होतात किंवा एकमेकांना चिकटून बसतात, असा बहुतेकांचा अनुभव असे. मग आताचे हे नवे ‘शॅम्पू बार’ साबणापेक्षा वेगळे आहेत का, ते पाहू या.
शॅम्पू बार हे साबणापेक्षा किंवा साध्या द्रव शॅम्पूपेक्षा वेगळे आहेत, कारण खूपशा साबण आणि शॅम्पूंमध्ये जास्त प्रमाणात डिटर्जंटस् आणि हानीकारक रसायनं असतात, ती शॅम्पू बारमध्ये वापरली जात नाहीत, असा दावा उत्पादक करतात. अर्थात यात सर्वांत महत्त्वाचं आहे ते शॅम्पू बारमधले घटक पदार्थ पाहाणं आणि शॅम्पू बारचा ‘पीएच’ पाहाणं. ‘पीएच’ म्हणजे काय, तर विशिष्ट उत्पादन त्वचा वा केसांवर किती ‘ॲसिडिक’ वा किती ‘अल्कलाइन’ ठरेल, याचा आकडा. यात पीएच- ७ हा ‘न्युट्रल’ समजला जातो. ७ पेक्षा कमी पीएच असेल तर ॲसिडिक आणि ७ पेक्षा अधिक पीएच असेल तर अल्कलाइन असं ढोबळपणे समजलं जातं.
आणखी वाचा : Work Spouse : नातेसंबंध : तुम्ही आहात ऑफिस स्पाउस?
डोक्यावरच्या त्वचेचा- म्हणजे स्काल्पचा पीएच ॲसिडिक समजला जातो- म्हणजे साधारणपणे पीएच ५.५, तर अंगाचे बहुतेक साबण अल्कलाइन- म्हणजे ७ पेक्षा जास्त पीएच असलेले असतात. शॅम्पू बारमध्ये अल्कलाइन पीएच होईल अशी रसायनं नसतात आणि त्याचा पीएच ५ ते ७ च्या दरम्यान ठेवला जातो, असा दावा उत्पादनविक्रेत्या कंपन्या करतात. या पीएचमुळेच शॅम्पू बार साबणापेक्षा वेगळे असतात आणि म्हणूनच शॅम्पू बारच्या वापरानंतर केस अतिकोरडे वा राठ होत नाहीत, असं त्यांचं म्हणणं असतं.
या बाबतीतला आणखी एक दावा म्हणजे शॅम्पू बारमध्ये ‘प्लास्टिक पॉलिमर्स’ (ज्याला ‘मायक्रोप्लास्टिक’ देखील म्हणतात) घटक नसतात, हे घटक अनेक द्रव शॅम्पूमध्ये असतात. या कारणानं हे घटक न वापरलेला शॅम्पू बार पर्यावरणपूरक ठरू शकेल. शिवाय द्रव शॅम्पू बाटलीत भरलेला असतो आणि प्रत्येक वेळी शॅम्पू संपल्यावर प्लास्टिक बाटलीचा कचरा निर्माण होतो, ते शॅम्पू बारच्या बाबतीत होत नाही.
आणखी वाचा : राणी एलिझाबेथच्या पर्समध्ये दडलंय तरी काय?
शॅम्पू बारचं ग्राहकांना आकर्षित करणारं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे आकर्षक रंग आणि त्यांचे फ्लेव्हर्स! टोमॅटो रेड, लव्हेंडर, फिकट निळा अशा सुंदर रंगांबरोबर रंगांचा ओंब्रे इफेक्ट दिलेले शॅम्पू बारसुद्धा मिळतात आणि ते लगेच घ्यावेसे वाटतात.
- तुम्ही शॅम्पू बार वापरणार असाल, तर तो तुमच्या रोजच्या साबणाच्या केसमध्ये ठेवू नका. शॅम्पू बारसाठी वेगळी सोप केस वापरा आणि तो वापरानंतर सारखा ओला होणार नाही अशा ठिकाणी ठेवा.
- प्रवासाला जाताना अनेक जण शॅम्पूची ‘मिनी’ बाटली नेतात. पण अशा बाटल्या बॅगमध्ये फुटल्या, लीक झाल्या तर मोठाच ताप होऊन बसतो. हे टाळायचं असेल तर शॅम्पू बार उपयुक्त ठरू शकेल.
- शॅम्पू की शॅम्पू बार हा वाद न संपणारा आहे. पण आपण प्रत्यक्ष वापरून आपल्याला काय आवडतंय, रुचतंय ते पाहूनच निर्णय घेतलेला बरा!