“साक्षी मामी, मला दुकानाची नावं आणि फोननंबर देण्यापेक्षा प्लिज तूच माझ्यासोबत ये ना,” सईचा आग्रह चालू होता. शेवटी ती म्हणाली,“हो गं सई, मी नक्की येईन खरेदीला, पाच वाजता ठरलेल्या ठिकाणी पोहोचते.”साक्षीनं फोन ठेवला आणि घड्याळात बघितलं. अरे बापरे, एक वाजला आहे. अजून दोन कामं उरकायची आहेत. काकूला घेऊन डेंटिस्टकडं जायचंय आणि छोट्या नेहाच्या डान्स क्लासमध्ये जाऊन तिला घेऊन यायचं आहे हे सर्व साडेचार पर्यत उरकलं तरच पाच वाजेपर्यंत खरेदीच्या ठिकाणी जाता येईल. अजून स्वतःचं आवरायचं आहे. घरातील काही कामं पूर्ण करायची आहेत. ती क्षणभर थबकलीच. डोक्याला हात लावून ती दोन मिनिटं शांत बसून राहिली… या टेन्शनचं काय करायचं हा प्रश्न तिला पडला.
‘आ बैल मुझे मार’ अशी तिची परिस्थिती झाली होती. तिच्या नणंदेची मुलगी सईचं लग्न ठरलं, तेव्हाच साक्षीने स्वतःच सांगितलं होतं की,“ माझ्या खूप ओळखी आहेत. खरेदीच्या वेळी मी तुला सांगेन. चांगल्या ठिकाणी खरेदी कर.” त्यामुळं आता तूच बरोबर ये म्हणून ती मागे लागली. खरं तर ती किती दिवसांनी एक आठवड्यासाठी माहेरी येऊन राहिली होती. त्यातून वेळ काढून खरेदीसाठी जाणं तिला अजिबात आवडलं नव्हतं, पण नणंदेच्या मुलीला नाही कसं म्हणायचं? म्हणून तिला नकार देता आला नाही.
हेही वाचा >>>तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
माहेरी आल्यावर आईशी छान गप्पा मारत बसायचं, उशीरा उठायचं, टीव्हीवर चांगला पिक्चर बघायचा, आयतं खायचं, भरपूर आराम करायचा, हवं ते सर्व करायचं असं ठरवून ती आली होती, पण ती आल्या आल्याच काकू तिला म्हणाली, “साक्षी, बरं झालं बाई तू आलीस. माझी उद्यापासून ‘रूट कॅनल’ची ट्रिटमेंट चालू आहे, दातांच्या दुखण्याची मला खूप भीती वाटते. तू सोबत असशील तर मला आधार वाटेल. उद्या तू माझ्यासोबत चल.”
काकूलाही साक्षी नाही म्हणू शकली नाही. “साक्षी, तुझ्या हातचे बटाट्याचे पराठे खाऊन खूप दिवस झाले, ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. आज तू तसे पराठे करशील?” वहिनींने अशी गळ घातल्यानंतर साक्षी तिलाही नाही म्हणू शकली नाही. त्यामुळं आयतं खायचं स्वप्न निदान पहिल्या दिवशी तरी तसंच राहून गेलं.
दादाची छोटी नेहा आज डान्स क्लासला जायलाच तयार नव्हती. तेव्हा दादा म्हणाला,“ नेहा बेटा, आत्या आज तुझा डान्स बघायला तुझ्या क्लास मध्ये येईल. मग काय, क्लास संपला की, आमची परीराणी आत्याच्या गाडीवर बसून घरी येईल.” असं म्हटल्यावर नेहा लगेचच क्लासला जायला तयार झाली. दादा तिला म्हणाला,“साक्षी, प्लीज जाशील ना तू?” तिनं मानेनेचं ‘हो’ म्हटलं. ही सगळी कामं पूर्ण करताना तिची चांगलीच दमछाक होणार होती.
हेही वाचा >>>स्त्री आरोग्य – ओटीपोटीदुखीने त्रस्त आहात ?
तिचं काय चाललंय याचं निरीक्षण प्रतिभाताई करीत होत्या. लेक खूप दिवसांनी माहेरी आली आहे, तर तिचं कोडकौतुक करावं. तिच्या आवडीचं काहीतरी करावं, तिच्याशी गुजगोष्टी कराव्यात अशी त्यांचीही इच्छा होती,पण तिच्याच मागे अनेक कामं लागली होती. तिला सासरीही तेच आणि माहेरीही तेच याचंच त्यांना वाईट वाटलं. त्या तिच्याजवळ गेल्या. लहानपणी ती आईला बिलगायची तशीच आजही बिलगली. त्यांनीही तिला जवळ घेऊन मायेनं तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला म्हणाल्या, “अशी कशी गं तू? सगळ्यांना खुष ठेवायला बघतेस आणि स्वतःच्या मनाचा विचारच करत नाहीस. लहानपणापासूनच तू अशीच. तुझ्या हातात बिस्कीटचा पुडा असेल आणि कुणी एखादं बिस्कीट मागितलं तर आख्खा पुडाच त्याला देऊन टाकायचीस. शाळेतही अशीच वागायचीस. कुणाला ‘नाही’ म्हणता येत नाही. याचा तुलाही त्रास व्हायचा. सगळी कामं स्वतःच्याच अंगावर ओढून घेण्याची तुला सवय झाली आहे. ती तू बदलायला हवीस.
तुला माहितीये साक्षी, दर महिन्याला आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये एक नवीन संकल्प करतो. हा नोव्हेंबर महिना चालू आहे. म्हणून आम्ही या वर्षी ‘पटत नसलेल्या गोष्टींना नकार द्यायला शिका’हे ठरवून ‘नो नोव्हेंबर’चा संकल्प सुरू केला आहे. बऱ्याच गोष्टी स्वतःच्या मनाला पटत नसताना, त्या करायच्या नसतानाही दुसऱ्याला वाईट वाटू नये म्हणून आपण करतो. त्याचा स्वतःच्या मनाला त्रास होतो. विनाकारण आपला ताण आपण वाढवतो, म्हणून नाही म्हणायला शिकायला हवं.”
प्रतिभाताई बराच वेळ तिच्याशी बोलत होत्या. आईची ‘नो नोव्हेंबर’ ची कन्सेप्ट तिलाही पटली. स्वतःचा त्रास कमी करण्यासाठी त्याची सुरुवात आजपासूनच करायची, असं तिन ठरवलं आणि निर्धाराने ती जागेवरून उठली.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)