– डॉ. अभिजित देशपांडे (निद्राविकारतज्ज्ञ)

गेल्या दोन लेखांत आपण स्वप्नांमध्ये असलेल्या गोष्टी आणि त्यांचे अर्थ यांचा मागोवा घेतला. या लेखात आधुनिक वैद्यकशास्त्रात स्वप्नांबाबत काय घडामोडी झाल्या याचा विचार करू या. स्वप्ने ही झोपेच्या प्रत्येक पायरीत पडतात, पण सगळ्यात जास्त स्वप्ने ही पहाटे, साखरझोपेत अनुभवली जातात. हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. ही साखरझोप म्हणजेच वैद्यकीय परिभाषेतील ‘रेम झोप’(आरईएम).

शरीरक्रिया शास्त्रज्ञ (फिजिऑलॉजिस्ट) नॅथेनीयल क्लीटमॅन शिकागो युनिव्हर्सिटीत संशोधन (१९५० साली) करीत होते. तान्ही मुले दिवसभरात बऱ्याच वेळेला दूध पिण्याकरिता उठतात आणि परत झोपतात. क्लीटमॅनच्या मते ही प्रक्रिया ‘ऑटोमॅटिक’ होते. त्यासाठी झोप जास्त अथवा कमी गाढ होते काय, या प्रश्नाचे उत्तर ते शोधत होते. आपल्या मेंदूमध्ये डोळ्यांच्या हालचालींना आणि बाकी शरीराच्या हालचालींपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे. ही बाब क्लीटमॅनने हेरली. डोळ्यांच्या हालचाली आणि झोपेचा गाढपणा यांचा काय संबंध आहे, हे शोधण्यासाठी त्यांनी ‘असिरेनस्की’ नामक उत्साही शिष्याची निवड केली. असिरेनस्कीच्या बायकोने नुकताच त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. या नवजात अर्भकाची रात्री जागून काळजी घेण्याची जबाबदारी वडिलांवर होती! (की त्याने सोयीस्कर रीतीने पत्करली?)

Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
rahul gandhi statement in america, prime minister narendra modi
राहुल गांधीनी मोदींच्या पावलावर पाऊल टाकलं तर एवढं काय बिघडलं?
What to do when the car is stuck in traffic
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
ngo umed education charitable trust
सर्वकार्येषु सर्वदा : वेशीबाहेरील मुलांची शाळा
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
RSS Mohan Bhagwat, pune,
देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

हेही वाचा – सोन्यापेक्षा घरात गुंतवणूक, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीला महिलांचं प्राधान्य

रात्रभर मुलांच्या डोळ्यांची हालचाल त्याने जाणीवपूर्वक टिपून ठेवली. या तपश्चर्येचे फळ आधुनिक वैद्यकशास्त्राकरिता महत्त्वाचे ठरले. दर तासाने डोळ्यांच्या अतिरिक्त हालचाली दिसत होत्या, पण शरीर पूर्णपणे निपचित होते. मध्येच कधी तरी उचकी देणे अथवा नाडी कमीजास्त होणे असा प्रकार दिसत होता.

ॲसिरेनस्कीचे हे निरीक्षण नुसत्या अर्भकांनाच नव्हे तर तरुण मुलांनादेखील लागू होत होते. झोपलेल्या अवस्थेतून जेव्हा त्यांना उठवले गेले तेव्हा जवळजवळ सगळ्यांनीच ते स्वप्न पाहत होते असे नोंदवले. १९५९ साली क्लीटमॅन आणि डीमेंट या निद्रातज्ज्ञांनी इलेक्ट्रोड्स लावून या झोपेचा अभ्यास केला आणि त्यास रेम – रॅपिड आय मोशन (आर.ई.एम.) असे नाव दिले. ही झोप वैशिष्ट्यपूर्ण अशाकरिता, की या काळात मेंदू जागृत अवस्थेपेक्षा दीडपटीने जास्त कार्यरत असतो! पण संपूर्ण शरीर क्लांत (रिलॅक्स्ड) नसते, तर ते निपचित (पॅरॅलाइन्ड) पडते. निसर्गाची आपल्यावरती ही कृपाच आहे. कारण स्वप्ने पडत असताना ती खरी समजून आपण जोरजोरात हालचाली करायला लागलो तर आपल्यासोबत शेजारी झोपणाऱ्या माणसाची पंचाईत व्हायची. अशा रीतीने दोन प्रकारच्या ‘निद्रा’ असतात. आर.ई.एम. आणि नॉन आर.ई.एम. आणि या दोन्ही रात्रभरात दर दीड तासाने आलटूनपालटून येतात.

नॉन आर.ई.एम. झोप रात्रीच्या पूर्वार्धात जास्त असते, तर आर.ई.एम. ही झोप उत्तरार्धात असते. किंबहुना पहाटे तीननंतर आर.ई.एम. सर्वाधिक असते. झोपेच्या या दोन्ही अवस्था पतंजलीने २३०० वर्षांपूर्वी नोंदवल्या आहेत. त्यास ‘सुषुप्ती’ आणि ‘स्वप्न’ असे म्हणतात. पेट स्कॅनमध्ये मेंदू जास्त कार्यरत असतो याचा उल्लेख केलेलाच आहे. त्याच वेळेला ब्रह्म मुहूर्त असतो, असे सांगून मेंदूच्या अतिऊर्जित अवस्थेचा फायदा घेण्याचे पतंजली सुचवतो.
प्राण्यांनादेखील स्वप्ने पडतात, याचा उल्लेख मागील लेखात केलेलाच आहे. प्राण्यांच्या मेंदूच्या संरचनेचा अभ्यास केल्यावर ही आर.ई.एम. झोप ‘ब्रेन स्टेम’ या भागातून उगम पावते, असे लक्षात आले. जागृत अवस्था आणि रेम यांमध्ये एक साधर्म्य असे की, दोघांचा ई.ई.जी. (मेंदूतील लहरींचे विद्युत आलेखन) हा सारखाच दिसतो. पण जागेपणी डोपामिन, सेरेटोनिन, नॉरॲड्रनलीन ही न्यूरोट्रान्समीटर्स सर्वाधिक प्रमाणात वापरली जातात. तर रेम झोपेत ही सगळ्यात कमी वापरली जातात. याचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

रेम झोपेमध्ये स्वप्नांचा उगम कसा होतो?

यासाठी मेंदूच्या रचनेचा थोडक्यात परिचय करून घेऊ या. मेंदूचे चार ठळक भाग आहेत.

१. मोठा मेंदू (फोर ब्रेन)

२. लहान मेंदू (सेरेबलम)

३. देठ (ब्रेनस्टेम)

४. मेडुला

मोठ्या मेंदूमध्ये विचार येणे, भावना निर्माण होणे, गोष्टींचे आकलन, स्मरण आदी क्रिया होतात. मोठा मेंदू आणि देठ यांना जोडणारे द्वार म्हणजे ‘थॅलेमस’ हा भाग होय. मेंदूकडे जाणाऱ्या सर्व संवेदना (गंध सोडून) या भागातूनच जातात. झोपेच्या सुरुवातीला हे दार बंद होते, म्हणूनच आपल्याला झोपेत स्पर्श, तापमान इत्यादी संवेदना होत नाहीत. रेम झोपेमध्ये या दारातून काही संवेदना स्वत:हून (स्पॉन्टेनिअस) अथवा शरीरातून प्रवेश मिळवतात. मोठ्या मेंदूचेदेखील भावनांशी संबंधित असलेले हिपोकॅम्पस, ॲमिग्डीला असे भाग आहेत. रेम झोपेत हे भाग उद्दीपित होतात.

किंबहुना भावनांचा निचरा होण्यासाठी डोळ्यांच्या हालचालींचा उपयोग होतो. फार पूर्वी झालेल्या दु:खद, धक्कादायक घटना भावनिक मेंदूमध्ये, विशिष्ट कप्प्यात (एखादा काटा खुपावा तशा) साठलेल्या असतात. अशा रीतीने जवळची घटना दिवसा घडली, की पुढच्या काही रात्रींमध्ये रेम झोप हा काटा काढण्याच्या स्वप्नरुपाने प्रयत्न करते. बऱ्याच वेळेला यात यश येते, पण काही वेळेला स्वप्नातून जाग येते आणि झोप लागत नाही. अशा वेळेला ई.एम.डी.आर. ही डोळ्यांच्या हालचालीचा वापर करण्याची पद्धत उपयोगी पडते. गंमत म्हणजे ही उपचार पद्धती शोधणाऱ्या डॉ. शापीरो यांनी रेम झोपेच्या अभ्यासावरच आपले निष्कर्ष काढले होते. अर्थात स्वप्नांतून जाग येण्याचे कारण केवळ भावनिकच असेल असे नाही. दुसऱ्या एका महत्त्वाच्या कारणाचा उल्लेख करणे त्यासाठी भाग आहे. ‘ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप ॲप्निआ’ ही झोपेमध्येच होणारी व्याधी आहे. यात घोरणे, तोंड उघडे ठेवणे, वारंवार लघवीला उठणे, दिवसा थकवा जाणवणे, सकाळी उठल्यावर घशास कोरड असणे यापैकी काही लक्षणे असतात.

हेही वाचा – चॉइस तर आपलाच : ब्रेकअप.. पुढे काय?

बऱ्याच स्लीप ॲप्नियाच्या रुग्णांना आपण बुडत आहोत किंवा गळा आवळला जात आहे, अशी स्वप्ने पडून घाबरून जाग येते. आपल्या मेंदूमध्ये थॅलेमसच्या शेजारी बेसल गॅग्लीआ नावाचा हा भाग असतो. प्रतीक्षित क्रिया, ऑटोमॅटिक हालचाली यामध्ये हाच भाग काम करतो. रेम झोप या भागास उद्दीपित करते. जागेपणी शिकलेल्या कामाची अशा रीतीने स्वप्नातदेखील उजळणी केली जाते. याच कारणामुळे एखादे काम करायची लकब (स्किल) ही स्वप्नांमध्ये अधिक पक्की होऊ शकते. या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक खेळाडू करतात. किंबहुना ‘ल्युलीड ड्रीमिंग’ म्हणजे स्वप्नांमध्ये जागरूक राहून त्याच गोष्टीची प्रॅक्टिस करणे अशा नवीन प्रकाराचा अभ्यास उदयास आला आहे.

अशा रीतीने मोठ्या मेंदूचे अनेक भाग त्यात दृश्य, श्राव्य आणि स्पर्श अशा संवेदनांचा अर्थ लावला जातो हे भाग स्वप्नांमध्ये कार्यरत झाले तरी मेंदूचा सगळ्यात पुढील भाग ‘प्रीफ्रंटल लोब’ हा मात्र स्वप्नात सुस्त असतो! हा प्रीफंटल लोब म्हणजे मी, माझे असा विचार करणारा भाग आहे. एखाद्या कंपनीमध्ये सीईओ जसा प्रत्यक्ष काम करत नाही तर इतर लोकांकडून कामाचे नियोजन करतो तसाच हा प्रकार!

स्वप्नांमध्ये हा मुख्य नियंत्रक काम करत नसल्याने अनेक प्रसंगांची जुळवणी सुसंगत नसते. दारू प्यायल्यावर काही तासांकरिता रेम झोप येत नाही आणि थोडा असर कमी झाल्यावर दुपटीने परत येते. यामुळे रात्री मद्यपान करून झोपल्यानंतर पहाटे चित्रविचित्र स्वप्ने पडून झोप चाळवली जाते आणि परिणामी सकाळी उठल्यावर हँगओव्हरचे फीलिंग येते.

अजूनपर्यंत निसर्गाने ही रेम वा साखर झोप नेमकी कोणत्या कारणासाठी दिली आहे? याचे संपूर्ण उत्तर मिळालेले नाही. पण ही स्वप्नझोप जर मिळाली नाही किंवा त्यात काही बिघाड झाला तर काय परिणाम होतात, याबद्दल वाचूया पुढच्या लेखात.

(abhijitd@iiss.asia)