अर्चना मुळे 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गीता आणि प्रेमा पहिल्यांदाच परदेश दौरा करणार होत्या. एक वेगळा अनुभव घेण्याची त्या उत्सुकतेने वाट पाहात होत्या. त्यांची सगळी तयारी पूर्ण झाली होती. संपूर्ण प्रवास त्या दोघीच करणार होत्या. त्याच आनंदात दोघी कोल्हापूरहून निघाल्या. त्यांचं विमान पहाटे ४.३० वाजता टेक-ऑफ करणार होतं. चेक-इन करुन इतर प्रक्रियेला वेळ लागेल या हेतूनं त्या रात्री १ वाजताच विमानतळावर पोहोचल्या. चेक-इन करताना त्यांना सांगण्यात आलं, की त्यांचं आजचं विमान रद्द झालं आहे. तेव्हा मात्र त्या गोंधळल्या. काय करायचं त्यांना कळेना. त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारायला सुरूवात केली.

“ असं कसं विमान रद्द केलं तुम्ही?”

“ साॅरी मॅडम, खरं तर तुम्हाला विमान रद्द झाल्याचा मेसेज आला असेलच ना. नियमानुसार उड्डाण रद्द झाल्याचा मेसेज २४ तास आधी पाठवला जातो. तुम्ही चेक करा.”

“आम्हाला असा कोणताही मेसेज आला नाही. हा काही बस प्रवास आहे का? एक बस चुकली की दुसऱ्या बसने जाता येईल? किती मानसिक त्रास होतोय तुम्हाला कल्पना नाही आहे.”

“ मॅडम एक विनंती करू का, एकदा मेसेज आलाय का खात्री करता का?”

हेही वाचा… ग्राहकराणी: थ्रीडी चष्मा मोफतच मिळायला हवा…

दोघींनी आपापले मेसेज, वाॅट्सॲप, इ-मेल सगळं चेक केलं. त्यांना मेसेज आला नव्हता. दोघींचं पहिल्याच परदेश दौऱ्यांचं स्वप्न भंग पावलं होतं. प्रेमाला तर रडूच यायला लागलं. गीतानं ताबडतोब तिच्या ट्रॅव्हल एजंटला फोन केला. तेंव्हा त्यांना कळलं, की विमान रद्द झाल्याचा मेसेज विमान कंपनीनं या एजंटला पाठवला होता कारण तोच नंबर त्यांच्याकडे रजिस्टर होता. या एजंटनं तो मेसेज प्रेमाच्या नवऱ्याला पाठवला होता. कारण त्याच्याकडे त्यांचा नंबर होता. पण तिच्या नवऱ्याने कामाच्या गडबडीत अद्याप तो मेसेज बघितलाच नव्हता. इकडे दोघी विमानतळावर कर्मचाऱ्यांशी भांडत होत्या. केवढा मोठा गोंधळ झाला होता.

अखेर पर्याय नाही म्हणून त्या कोल्हापूरच्या प्रवासाला लागल्या. त्यांनी एजंटला सांगून तिकिट रद्द करायला सांगितलं. दोघींना कळून चुकलं होतं, की प्रवासाला जाण्यापूर्वीच सगळ्यांची नीट माहिती घेणं आवश्यक असतं. उत्साहाच्या भरात त्यांनी ना एजंटला फोन केला ना विमान कंपनीची साइट चेक केली होती. त्यामुळे पुढचा गोंधळ झाला.

हेही वाचा… ग्राहकराणी: पासवर्ड लक्षात ठेवताय ना?

त्या घरी परतल्या आणि थेट एजंटचं ऑफिस गाठलं. त्यांच्याकडून विमान प्रवासाबाबतची पुरेशी माहिती घेतली.

१) जेव्हा विमान रद्द होतं तेव्हा चोवीस तास आधी याची कल्पना विमान कंपनीने प्रवाशांना द्यायलाच हवी असते. शिवाय तिकिटाचे संपूर्ण पैसे परत द्यायला हवेत.

२) अशी कल्पना जर दिली गेली नाही आणि कनेक्टिंग विमान पकडता आलं नाही तर प्रवाशांना दुसऱ्या विमान तिकिटाची भरपाई देखील द्यायला हवी किंवा पर्यायी विमान व्यवस्था करावी लागेल.

३) जर विमान सहा तास ते चोवीस तास उशिरा उडणार असेल तर विमान कंपनीने जवळच्या चांगल्या हाॅटेलमधे राहाण्याची आणि जेवणा खाण्याची मोफत सोय करायला हवी.

४) जर विमान मार्ग बदलणार असेल तर प्रवाशांना तशी कल्पना देऊन जवळच्या दुसऱ्या विमानतळापर्यंत पोहोचवण्याची सोय करायला हवी.

५) जर विमान कंपन्या नियमांचं पालन करत नसेल तर प्रवासी विमानतळावर तक्रार स्वीकारण्याची सोय असते तिथे तक्रार करावी लागेल किंवा कंपनीच्या मेलवर तक्रार पाठवावी.

६) तक्रार करूनही समाधान होत नसेल तर एयरसेवा पोर्टल (एपीपी) माध्यम वापरून उड्डाण मंत्रालयात तक्रार नोंदवता येते.

७) समाधानकारक विमानसेवा न मिळाल्यास भारतीय ग्राहक तक्रार निवारण केंद्रातही तक्रार नोंदवता येते.

८) तक्रार कुठेही करायची असली तरी तिकिट, बोर्डिंग पास, विमानतळावरील घटनाक्रम या सगळ्यांची व्यवस्थित नोंद ठेवावी. तक्रारीच्या तीन काॅपीज जवळ ठेवाव्यात.

९) सगळ्यांत महत्वाचं तिकीट बुकिंग करताना जो संपर्क नंबर दिलेला असतो. त्याच नंबरवर विमान कंपनी संदेश पाठवत असते. तेंव्हा बुकिंग केल्यापासून विमान कंपनीकडून येणाऱ्या मेसेजकडे लक्ष देणे आवश्यक असते.

हेही वाचा… ग्राहकराणी: कुरियरने पाठवलेल्या पार्सलमधील वस्तू गायब झाल्या तर….?

गीता आणि प्रेमा मिळालेली माहिती घेऊन बाहेर पडल्या. या प्रवासाचे पैसे दोघींना परत मिळाले होते. आता बरीच माहितीही मिळाली होती. नव्याने प्रवासाची आखणी करायला दोघी तयारच होत्या. परंतु आपल्याच चुकीमुळे नुकताच घेतलेला अनुभव त्या दोघी पचवू शकल्या नव्हत्या. लवकरात लवकर त्या पहिला वहिला परदेश दौरा नक्कीच करतील.

अलिकडे उपलब्ध विमानसेवा आणि सोयी सुविधा यामुळे भारतातून विमानसेवा घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. जेंव्हा अशी सेवा घेतली जाते त्यावेळी सेवांबरोबर असणारे हक्क माहीत करून घेणं प्रत्येक प्रवाशाचीही जबाबदारी असते. याची मात्र त्यांना जाणीव नसते. ग्राहकराणीने अशा सेवांची नीट माहिती घ्यावी एवढीच अपेक्षा जेणेकरून तिच्या प्रवासाचं स्वप्न भंग पावणार नाही.

archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What if the flight is cancelled you should aware for consumer rights asj