आपण सहलीनिमित्त बाहेर गेल्यावर हॉटेलमध्ये उतरतो, तेव्हा अनेक हॉटेल्सच्या खोल्यांमध्ये नेहमीच्या गादी, उश्यांच्या बरोबरच एक लांबलचक- अगदी माणसाच्या उंचीची मऊ उशी ठेवलेली असते. ‘त्याचा काय उपयोग?’ असं तुमच्या मनात कधी आलंय का? ती लांब उशी इतर उश्यांचाच भाग आहे आणि फारतर पाठीला आडवं टेकण लावून आरामात बसण्यासाठी बरी पडेल, असं काही वाटलं असेल, तर तो केवळ अर्धाच उपयोग होईल! ती असते ‘बॉडी पिलो’. आणि अशी उशी फक्त गरोदर स्त्रियाच झोपताना वापरतात असंही मुळीच समजायचं कारण नाही. हल्ली ही ‘बॉडी पिलो’ स्त्रियांमध्ये चांगली लोकप्रियता मिळवते आहे. कित्येकजणी घरी ही उशी वापरतात.
‘बॉडी पिलो’ वेगवेगळ्या आकारांत मिळते. साधी सरळ ‘I’ आकारात, ‘C’ आकारात, ‘U’ आकारात किंवा ‘J’ आकारातही मिळते. त्यांची लांबी वेगवेगळी असते आणि उशीच्या आकारानुसार कुशीवर झोपल्यावर शरीराला मिळणारा ‘सपोर्ट’ही वेगळा असतो. तुम्हाला जर जास्त वेळ कुशीवर झोपायची सवय असेल आणि उठल्यानंतर तुम्हाला शरीराच्या कोणत्या भागात वेदना जाणवत असतील, तर त्या भागावर झोपल्यावर शरीराचा अधिक दाब पडला किंवा योग्य प्रकारचा ‘कम्फर्ट’ मिळाला नाही, असा अर्थ होऊ शकतो.
आणखी वाचा : ‘डिझायनर व्हजायना’ म्हणजे काय?
साधारणपणे हे टाळण्यासाठी बॉडी पिलोची योजना असते. या व्यतिरिक्तसुद्धा विक्रेत्या कंपन्यांकडून या उश्या शरीराला कसा ‘सपोर्ट’ देतात याबद्दल विविध दावे केले जातात. परंतु झोपताना किंवा कुशीवर झोपल्यावर आपल्याला ती उशी आराम देते आहे का आणि कोणत्या आकाराची उशी वापरून कम्फर्ट मिळेल, याचं उत्तर व्यक्तीगणिक बदलतं. आरामात आणि ‘रीलॅक्स’ होऊन झोपणं गरजेचं.
पण काही मंडळी- अधिक करून स्त्रिया ‘बॉडी पिलो’चा उपयोग झोपताना ‘हग पिलो’ म्हणूनही करतात. म्हणूनच या उशीला ‘लव्ह पिलो’ असंही म्हटलं जातं. दिवसभर ऑफिसचं ताण देणारं काम केल्यानंतर, परतल्यावर घरातल्या कामांच्या व्यवस्थापनात गुंतून पडल्यानंतर रात्री आरामात झोप मिळावी ही किमान अपेक्षा असते. तेव्हा कुणाच्या तरी उबदार कुशीत झोपण्याची भावना किती छान आहे! अर्थात ते प्रत्यक्षात शक्य असतंच असं नाही. अशा वेळी कुशीत झोपण्याचा कम्फर्ट ही उशी देते. यामागचं कारण अगदीच सरळ आहे.
आणखी वाचा : ती वेडी तर नाही ना?
कुणाला मिठी मारल्यावर व्यक्तीला एक प्रकारची सुरक्षितता जाणवते, आनंद वाटतो आणि शांतदेखील वाटतं. मिठीशी- अर्थात ‘हग’शी जोडलेली ही भावनिक गोष्ट उशीला मिठी मारली तरी बऱ्याच अंशी पुरी होते असं दिसून येतं. खूपशी लहान मुलं एकटी झोपतात तेव्हा टेडीबिअर किंवा दुसऱ्या कुठल्यातरी सॉफ्ट टॉयला कवटाळून झोपण्याचा प्रयत्न करतात, तसंच आहे हे. आता काही लोक असंही म्हणतील, की मग मोठ्या माणसांनीही सॉफ्ट टॉयला कवटाळून झोपावं! पण ते सर्वांना रुचेल असं निश्चतच नाही. मग त्यापेक्षा बॉडी पिलो वापरायला सुटसुटीत आणि त्यात आपण चार जणांपेक्षा काही वेगळं करतोय असंही वाटत नाही!
तेव्हा तुम्ही कुशीवर झोपत असाल, तर या उशा वापरून आराम मिळण्यात काही फरक वाटतो का ते तपासून पाहाता येईल. त्यानुसार आपल्यासाठी कम्फर्टेबल ठरणारी उशी निवडता येईल. आणि तुम्हाला जर फक्त ‘हग’ करून झोपण्यासाठी उशी वापरायची असेल, तर एखाद्या वेळी हॉटेलमध्ये गेल्यानंतर ‘हग पिलो’ वापरून अंदाज घेता येईल. बाकी काही नाही, तरी चांगल्या आरोग्यासाठी आरामदायी झोप महत्त्वाचीच!