डॉ. अभिजित देशपांडे (निद्राविकारतज्ज्ञ)
शहरामध्ये असलेल्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना रात्री पुरेशी झोप घेता येत नाही. कमी झोपेचे दुष्परिणाम नुसते मनावरच नाही तर शरीरावरदेखील होतात. वेळेअभावी रात्रीची झोप आकुंचित झालेल्या लोकांकरिता बहुभाजित झोप हा उत्तम उपाय ठरू शकतो, कसा ते वाचा या ‘हुकमी झोपे’च्या दुसऱ्या भागात.
जगातील अनेक थोर व्यक्ती हुकमी झोपेचा वापर करीत, असं इतिहास सांगतो. यामध्ये नेपोलियन, विन्स्टन चर्चिल, थॉमस एडिसन, निकोला टेसला, लिओनार्डो द विंची, बकमिनिस्टर फुलर यांचा समावेश आहे. बकमिनिस्टर फुलर ही व्यक्ती अमेरिकेमध्ये स्थापत्य शास्त्राकरिता अतिशय प्रसिद्ध होती. या माणसाने स्वत:च्या झोपेवरती नानाविध प्रयोग केले. पॉलिफेजिक (बहुभाजित) झोपेची स्वत:ची अशी पद्धती शोधून काढली. दोन वर्षे सतत दर चार तासांनी पाऊण तास झोप म्हणजेच दिवसभरामध्ये जेमतेम साडेचार तास झोप घेऊनही आपली कार्यक्षमता अधिक वाढली असा त्यांचा दावा होता. शेवटी त्यांच्याबरोबर काम करणारे सहकारी वैतागल्यामुळे ही दिनचर्या त्यांना सोडावी लागली.
अनेक जणांचा असा गैरसमज असतो की झोप ही निष्क्रिय अवस्था आहे. झोपेमध्ये मेंदू फक्त विश्रांती घेत असतो. शास्त्रीयदृष्ट्या असे आढळून आले आहे की, झोपेमध्ये मेंदूचे काम चालू असतेच, किंबहुना झोपेच्या एका विशिष्ट पातळीमध्ये (आर. ई. एम. झोप) मेंदू जागेपणापेक्षा दीडपटीने जास्त कार्यरत असतो! झोपेमध्ये मेंदू आधी घडलेल्या घटनांचे विवेचन करीत असतो. स्मरणशक्ती दृढ होण्याकरिता याचा उपयोग होतो. किंबहुना याच क्षमतेमुळे कित्येक बौद्धिक प्रश्नांचे उत्तर झोपेमध्ये सापडते. केक्युले या शास्त्रज्ञाला सुचलेली बेन्झिन रिंगची मांडणी अथवा मेंडलिफ या शास्त्रज्ञाला आढळलेले एलेमेन्ट्री टेबलची संकल्पना असे अनेक शोध झोपेतच लागल्याचे प्रसिद्ध आहे.
शहरामध्ये असलेल्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना रात्री पुरेशी झोप घेता येत नाही. कमी झोपेचे दुष्परिणाम नुसते मनावरच नाही तर शरीरावरदेखील होतात. पुढच्या काही लेखांमध्ये याचा ऊहापोह होईलच. वेळेअभावी रात्रीची झोप आकुंचित झालेल्या लोकांकरिता बहुभाजित झोप हा उत्तम उपाय ठरू शकतो.
मागच्या लेखामध्ये एन. आर. ई. एन. निद्रेबद्दल उल्लेख आला आहे. पॉलिफेजिक झोपेमध्ये पहिल्या दोन पायऱ्या म्हणजे स्टेज- १ आणि स्टेज-२ कमी होतात. पर्यायाने झोपेची पूर्तता कमी वेळात होते.
आमच्या एका डॉक्टर मैत्रिणीचे उदाहरण देतो. ती कोलकत्त्यामध्ये आय. सी. यू. स्पेशालिस्ट आहे. तिची दिनचर्या पुढीलप्रमाणे – सकाळी ८ वाजता घरून निघणे. आय. सी. यू.ची ड्य़ुटी सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत असते. घरी यायला संध्याकाळच्या ट्रॅफिकमुळे एक ते दीड तास लागतो. घरी येऊन फ्रेश झाल्यावर, थोडा वेळ मुलीबरोबर तिचा अभ्यास घेण्यात जातो, तिचे पती हृदय विकारतज्ज्ञ असल्याने घरी यायला दहा ते साडेदहा वाजतात आणि त्यानंतर त्या सगळ्यांचे जेवण होते! हे सर्व आटोपल्यावर रात्री थोडा वेळ गप्पा, टी.व्ही. असा श्रमपरिहार होऊन झोपायला एक वाजतोच. सकाळी मात्र सहा वाजता उठून मुलीचा डबा करून द्यावा लागतो, म्हणजे रात्रीची झोप फक्त ५ तास होते. तिला रात्री झोपावयास जास्त वेळ हवा असेल तर रात्री लवकर जेवून झोपी जाणे अथवा मुलीचा डबा करण्याची जबाबदारी कुटुंबातील इतर व्यक्तीवर सोपवणे हे दोन पर्याय तिच्यासमोर होते.
रात्रीचे जेवण ही वेळ सबंध कुटुंब एकत्र येण्याची एकमेव संधी होती. त्यामुळे हा पर्याय तिला नकोसा वाटला. एकुलत्या एक मुलीला शाळेमध्ये जाईपर्यंत तरी डबा द्यावा नाहीतर गिल्टी फीलिंग येईल म्हणून हाही पर्याय बाद झाला. तात्पर्य, रात्री झोपेकरिता जेमतेम पाच तासच उपलब्ध होते. परिणामी अनेक मानसिक आणि शारीरिक लक्षणे दिसू लागली होती. बहुभाजित निद्रा पद्धतीचा वापर करून तिने यावर मात केली. आणि आरोग्य सांभाळलं.
पॉलिफेजिक पद्धतीचा उपयोग शारीरिक तसेच मानसिक चुरशींच्या स्पर्धा जिंकण्याकरितादेखील होतो. अटलांटिक महासागर एकट्य़ा माणसाने लहान बोटीने प्रवास करण्याची शर्यत ही १९६० साली सुरू झाली. सर फ्रान्सिस चिचेस्टर या विजेत्याने त्या वेळी ३८ दिवस घेतले. पण १९८८ साली हीच शर्यत दहा दिवसात सर झाली. आजच्या युगामध्ये वेग ही शर्यतीला मर्यादा घालणारी बाब नसून बोट चालवणाऱ्या माणसाची मानसिक आणि शारीरिक क्षमता ही आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विजेता हा ६७ वर्षांचा होता. बहुभाजित झोपेचा वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्यामुळे त्याला ही किमया साधली होती.
हुकमी झोपेवर काम करणाऱ्या संस्था
बहुभाजित (पॉलिफेजिक) झोपेबद्दलचे प्रयोग सर्वप्रथम युरोपमध्ये लिओनार्डो द विंची या प्रसिद्ध विचारवंताने लिहून ठेवले आहेत. १९५३ साली रेम स्लीपचा शोध लागला आणि झोपेवरील संशोधन जोराने सुरू झाले. १९७० नंतर मेंदूचे आलेखन (ई. ई. जी) तसेच दृकश्राव्य माध्यमाचा मेंदूवर होणारा परिणाम (ऑडिओ व्हिजुअलएन्ट्रेनमेंट इ. मध्ये क्रांतिकारी शोध लागले. पाश्चात्त्य देशांमध्ये जवळजवळ २० टक्के कामगार हे रात्रपाळीमध्ये काम करीत होते. अशा कामांमध्ये वेळीच लक्ष दिले नसल्याने झोपेचे अनेक दुष्परिणाम आढळून आले होते. अमेरिकेची अनेक युद्धे (व्हिएतनाम, कोरिया) तसेच अंतराळातील रशियाबरोबर असलेली स्पर्धा अशा नानाविध कारणांमुळे प्रचंड भांडवल झोपेवरील संशोधनाकरिता वापरण्यात आले. काही खालील संस्था यात अग्रगण्य आहेत.
१) नासा- अंतराळवीर जेव्हा स्पेस शटलमध्ये असतात तेव्हा त्यांच्या सर कॅडियन ऱ्हिदममध्ये वेगवेगळे फरक होतात. त्यापासून वाचण्याकरिता ऑडिओ व्हिजुअल एन्ट्रेनमेंट, काही विशिष्ट औषधे, शरीरांतर्गत तापमान बदलणे इ. उपायांवर महत्त्वाचे संशोधन झालेले आहे. कार्लोसस्टॅम्पी या शास्त्रज्ञाने ॲक्टिग्राफी या घड्य़ाळाचा वापर करून अल्ट्राडियन ऱ्हिदमचे मापन केले. याचा उपयोग हुकमी झोप घेण्याकरिता कसा होईल हे दाखवून दिले.
२) यू. एस. आर्मी – झोपेचे प्रमाण कमी झाल्यास, माणसाची अचूकता कमी होते. अजाणतेपणाने होणाऱ्या चुका दोन प्रकारच्या असतात. एकास दुर्लक्ष झाल्यामुळे चूक (एरर ऑफ ओमिशन) आणि दुसरी गैरसमजुतीमुळे केलेली चूक (एरर ऑफ कमिशन) असे म्हणतात. एरर ऑफ कमिशन हा जास्त धोकादायक असतो, कारण चुकीचे बटण दाबणे, अथवा वेगळ्याच व्यक्तीला गोळी मारणे असे प्रकार यात होतात. भोपाळची गॅस दुर्घटना किंवा चेर्नोबिल न्यूक्लिअर रिॲक्टरमधील अपघात हे या एरर ऑफ कमिशनमुळे झालेले आहेत.
यू. एस. आर्मीचे स्पोकॅन, वॉशिंग्टन येथे संशोधन केंद्र आहे. या केंद्रात वेगवेगळ्या औषधांमुळे झोपेवर परिणाम होऊनही अचूकता कायम राहील, असे संशोधन करण्यात आलेले आहेत. मला या सेंटरमधील संशोधकांबरोबर काम करायचा योग आलेला आहे.
३) भारतातही आमची संस्था ‘इन्टरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्लीप सायन्सेस’ ही या क्षेत्रात कार्यरत आहे. मुंबई विद्यापीठातील ‘लाइफ सायन्सेस’ विभागातील पीएच.डी.चे विद्यार्थी या संशोधनांमध्ये सहभागी आहेत.
‘हुकमी झोपे’च्या संदर्भातील तिसऱ्या लेखामध्ये काही शास्त्रीय संकल्पना आणि त्या प्रत्यक्ष आयुष्यात कशा वापरता येतील याची मांडणी केली आहे.
(पुढील सदर पुढील रविवारी)
abhijitd@iiss.asia