इगॅलिटेरियन रिलेशनशिप म्हणजे नात्यातली बरोबरी. जेव्हा नवरा बायको घरातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी समसमान वाटून एकत्रितपणे कामे करतात तेव्हा त्या नात्यात समन्वय साधला जातो.
“अभि, छोटुचा डायपर बदलायला हवा आता आणि त्याची बॉटल स्टीमरमध्ये बॉईल करण्यासाठी ठेव.”
“येस डिअर, तू तुझं काम चालू ठेव. तुझी मिटिंग चालू असताना इकडे लक्ष देऊ नकोस. तुझ्या कामात लक्ष दे. छोटुकडं मी पाहतो.”
सुनंदाताई दोघांचे संवाद ऐकत होत्या. अभिजित आणि केतकी यांना भेटण्यासाठी त्या कोल्हापूरहून मुंबईला आल्या होत्या. केतकीचं ‘वर्क फ्रॉम होम’ चालू होतं त्यामुळे छोटूला सांभाळण्याची जबाबदारी त्यानं घेतली होती. इथं आल्यापासून त्या पहात होत्या. घरातील सर्व कामं अभिजीत करत होता. कामवाली बाई आली नव्हती तेव्हा घरातला केर काढण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सर्व त्यानं केलं शिवाय छोटुचंही सगळं तो बघत होता. हे सर्व बघून त्यांना फारच वाईट वाटत होतं. बायकोनं त्याचा पार घरगडी केला होता, असं त्यांना राहून राहून वाटत होतं. ती म्हणेल ते तो सगळं ऐकत होता. अभिजित एकुलता एक मुलगा असल्यानं त्यांनी त्याला लाडाकोडात वाढवलं होतं. न मागताच सर्व गोष्टी त्याला हातात मिळायच्या. घरातली कपबशीसुद्धा उचलून ठेवण्याची त्याच्यावर कधी वेळ आली नव्हती. आज मात्र तो स्वयंपाक करण्यापासून सर्व कामं शिकला होता. त्याला सर्व हातात देणारी, त्याचं सर्व करणारी, त्याची काळजी घेणारी आणि त्याला सुखात ठेवणारी बायको त्याला मिळावी अशी सुनंदाताईंची अपेक्षा होती परंतु त्यानं लव्ह मॅरेज केलं. केतकीशीच लग्न करण्याचा त्याचा हट्ट होता. त्यामुळं त्या काहीच करू शकल्या नाहीत. लग्नानंतर नोकरीच्या निमित्ताने ते दोघंही मुंबईतच राहिले आणि पहिल्यांदाच सुनंदाताई त्यांच्याकडे खूप दिवस राहण्यासाठी म्हणून मुंबईत आल्या होत्या. त्या अभिजीतला होणाऱ्या त्रासाबाबत विचार करीत असतानाच त्यांची भाची गंधाली तिथं आली , “काय आत्या, कशी वाटते आमची मुंबई?अगं, इथं येऊन आठ दिवस झाले तरी तुला तुझ्या भाचीकडे यावंसं वाटलं नाही?”
हेही वाचा : स्त्री आरोग्य : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कसा टाळाल?
गंधाली बोलत असतानाही सुनंदाताईंचं तिच्याकडं लक्षच नव्हतं, त्या त्यांच्या विचारातच होत्या. गंधालीलाही त्यांची काळजी वाटली आणि त्यांना हलवून तिनं विचारलं, “आत्या,अगं काय झालंय? बरी आहेस ना?”
मग भानावर येऊन त्या बोलू लागल्या, “मी बरी आहे गं, पण मला अभिजीतची काळजी वाटते. आज घरातलं सगळं अगदी मूल संभाळण्यापर्यंत सर्व काही तो करतोय. बायकोच्या धाकात राहतो का गं तो? तू तर मुंबईतच राहतेस, नेहमी यांच्याकडे येत असतेस. माझ्या अभिला घरात त्रास आहे का गं? तू तरी मला सांग.”
त्यांचं सर्व बोलणं गंधालीनं ऐकून घेतलं. त्यांना नक्की काय वाटतंय हे ही तिच्या लक्षात आलं ती म्हणाली, “आत्या, तुला वाटतंय तसं काहीही नाहीये. त्या दोघांनी लग्नाच्या आधीपासूनच कायम ‘इगॅलिटेरियन रिलेशनशिप’ मधे राहण्याचं ठरवलंय आणि ते दोघंही या बाबतीत खुष आहेत. आनंदानं त्यांचा संसार करीत आहेत.”
“ए बाई, मला समजेल अशा भाषेत बोल.”
“अगं आत्या, लग्न झाल्यानंतर दोघांनीही संसाराची जबाबदारी वाटून घ्यायची. घरातल्या सर्व कामांपासून आर्थिक व्यवहारापर्यंत सर्व जबाबदारी दोघांची समान असेल. असं त्यांनी ठरवलं आहे. ”
“ अगं,पण काही जबाबदाऱ्या पुरुषांनीच पार पाडाव्या लागतात आणि काही बाईनेच करायच्या असतात. सर्व कामात समानता कशी असेल? स्वयंपाक करणं, मुलं सांभाळणं हे बायकांनाच चांगलं जमतं. काही अडचण असेल तर मदत घेणं ठीक आहे, परंतु सगळी जबाबदारी पुरुषावर टाकणं योग्य आहे का?”
हेही वाचा : ‘ग्रे डिव्होर्स’चा विचार करताय?
“आत्या, ही कामं पुरुषांची, ही स्त्रियांची या चौकटी मोडून आता तूही बाहेर पडायला हवं. पूर्वीच्या काळी पुरुषांवर अर्थर्जनाची जबाबदारी होती आणि घरातील मुलाबाळांची सर्व जबाबदारी बायका घेत होत्या, पण आता स्त्रिया शिकल्या आहेत,अर्थर्जनाची जबाबदारीही घेत आहेत, मग पुरुषांनीही घरातील कामाची जबाबदारी वाटून घेतली तर बिघडलं कुठं? संसारातील सर्व जबाबदाऱ्या दोघांनी मिळून पूर्ण कराव्यात. नवरा टीव्हीचा रिमोट घेऊन बसलाय आणि बायको एकटी किचनमध्ये काम करते आहे. रात्री बाळ त्रास देत असेल तरी नवरा मस्त झोपा काढतोय आणि ती एकटी जागते किंवा घरासाठी कर्ज काढलंय तो एकटाच डोक्यावर ओझं घेऊन फेडत बसलाय किंवा बँका, विमा कंपनीचे हप्ते तोच भरतो आहे आणि बायको घरात बसून टीव्हीवरच्या मालिका बघते आहे. हे घराघरातील चित्र बंद व्हायला हवं. अनेक घरात अजूनही बायको करिअर करणारी असली तरी घरातील जबाबदाऱ्या सांभाळून जेवढं जमेल तेवढंच तिनं करावं ही अपेक्षा असते आणि काही घरांमध्ये ती कमावती असली तरी घरातील आर्थिक भार नवऱ्यानंचं उचलायला हव्यात, त्यातच त्याचा पुरुषार्थ आहे अशी तिची अपेक्षा असते परंतु पती पत्नी जेव्हा त्यांच्यातील ‘इगॅलिटेरियन रिलेशनशिप’ मान्य करतील तेव्हा घरातील प्रत्येक जबाबदारी दोघांची असेल, आनंद असेल तरी दोघांचा आणि दुःख असेल,अडचणी असतील तरी दोघांनी मिळूनच मार्ग काढायचा हे ठरवावं लागेल. आत्या तू ही हे समजून घे आणि अभिजीत आणि केतकी मधील इगॅलिटेरियन रिलेशनशिप मान्य कर.”
“हो गं बाई, लहानपणी मी तुला शिकवायचे, आता तू मला शिकव. पण तू सांगितलं ते मला पटलं. माझ्या मुलाला काम करावं लागतं म्हणून मी नाराज झाले, पण सूनबाईही घरातील इतर सर्वच जबाबदारी घेते याचा मी विचारच केला नव्हता. दोघं आनंदात आणि सुखात असावेत एवढीच माझी अपेक्षा आणि ती कोणती रिलेशनशिप? ते सर्व तुझ्या काकांनाही समजून सांग म्हणजे ते मला मदत करतील.”
“हो ग आत्या, मी सांगेन त्यांनाही.”
आत्या भाचीचे संवाद चालू होते. अभिजित ते सर्व ऐकत होता. आईची नाराजी गेलेली पाहून त्यालाही बरं वाटलं.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)