डॉ. अश्विन सावंत
पीसीओडी किंवा पीसीओएस् ही प्रजननक्षम वयात स्त्रियांना, त्यातही तरुण मुलींना होणारी विकृती. मासिक चक्रामध्ये बिघाड करण्यापासून ते मुलींमध्ये पुरुषी शरीराची लक्षणे निर्माण करण्यापर्यंत आणि योग्य उपचार न झाल्यास वंध्यत्वाला कारणीभूत होण्यापर्यंत विविध विकारांना कारण ठरणाऱ्या या विकृतीमागे ’इन्सुलिन प्रतिरोध’ हे मुख्य कारण आहे.
दीर्घकाळ कर्बोदकांचे सेवन, त्यातही साखर व मैदायुक्त पदार्थांचे नित्य सेवन, व्यायामाचा व परिश्रमाचा अभाव, किंबहुना हालचालींचाच अभाव या कारणांमुळे शरीरपेशी रक्तामधील साखर आतमध्ये आणण्यास इन्सुलिनला विरोध करतात व त्यामुळे रक्तामध्ये साखरेचे आणि इन्सुलिनचे सुद्धा प्रमाण वाढत जाते. हा झाला ‘इन्सुलिन प्रतिरोध (इन्सुलिन रेसिस्टन्स)’. इन्सुलिन प्रतिरोध सहजी लक्षात न येणाऱ्या अशा एका गंभीर विकृती- समुच्चयाला जन्म देते, तिला ’मेटाबोलिक सिन्ड्रोम’ म्हणतात.
१९५० च्या आसपास पाश्चात्त्य देशांमध्ये, त्यातही अमेरिकेमध्ये जी सुबत्ता व संपन्नता आली, त्यामुळे तिथल्या समाजामध्ये एक प्रकारची शिथिलता आली. लोक अधिकाधिक आळशी व अक्रियाशील बनत गेले. त्यात रोजची कामे करण्यासाठी विविध यंत्रे उपलब्ध झाली. ज्याला जोड मिळाली ‘रेडी टू इट’ अशा प्रकारच्या विविध खाद्य पदार्थांची. पिझ्झा, बर्गर, सॅण्डविच, नगेट्स, ब्रेकफास्ट सिरियल्स, केक्स, चॉकलेट्स, कॅण्डी, बार,आईस्क्रीम, योगर्ट, कोला-सोडा, वगैरे . बीअर पिणे आणि मद्यपान ही तर नित्याची बाब झाली. या सगळ्याचा शरीरावर विपरित परिणाम तर होणार होताच, तसा तो झाला आणि एक विशिष्ट विकृतींचा समुच्चय समाजात वाढीस लागला, तो म्हणजेच ‘मेटाबोलिक सिन्ड्रोम’. ज्याला मराठीमध्ये ‘चयापचयजन्य विकृती-समुच्चय’ म्हणता येईल.
संशोधकांच्या मते ‘मेटाबोलिक सिन्ड्रोम’ म्हणजे २१व्या शतकामध्ये मानवी समाजाच्या आरोग्याचा नाश करणारा एक टाइमबॉम्ब आहे. टाइमबॉम्ब या अर्थाने की तो कधी फुटेल व सर्वनाश करेल हे सांगता येत नाही ‘मेटाबोलिक सिन्ड्रोम’ ही चयापचयजन्य एक विकृती आहे, जी विशेषतः साखरेच्या विकृत चयापचयामुळे, अर्थात इन्सुलिन प्रतिरोधामुळे व रक्तामध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यामुळे होते. दुर्दैवाने शरीरामध्ये घडत असलेल्या या चयापचयजन्य भयंकर उलथापालथी जोवर प्रत्यक्षात एखादा आजार व्यक्त होत नाही, तोवर समजत नाहीत व त्यामुळे ती व्यक्ती त्यांविषयी अनभिज्ञ राहते. आपले स्वास्थ्य चांगले आहे, या भ्रमात राहते आणि म्हणूनच या विकृतीला टाइमबॉम्ब समजले जाते. ‘मेटाबोलिक सिन्ड्रोम’ हा काही नवीन आजार नाही, तर विविध विकारांचा समुच्चय आहे. ज्यामध्ये स्थूलता, इन्सुलिन प्रतिरोध, रक्तामध्ये इन्सुलिनचे अति प्रमाण, मधुमेह प्रकार२, उच्च रक्तदाब, रक्तामध्ये ट्रायग्लिसराईड्सचे अति प्रमाण, रक्तामध्ये एलडीएल कोलेस्टेरॉलचे अति प्रमाण या विकृती येतात. यामागे अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव व पोटावरची चरबी वाढणे ही मुख्य कारणे आहेत.
प्रत्यक्ष एखादा घातक आजार होण्यापूर्वीच तुम्हाला मेटाबोलिक सिन्ड्रोमचा त्रास आहे वा नाही, हे कसे ओळखता येईल?
मेटाबोलिक सिन्ड्रोमचा धोका वाढण्याची कारणे?
- बैठी-आळशी जीवनशैली
- पोटावर चरबी वाढणे. पुरुषांमध्ये कंबरेचा घेर १०० सेंटीमीटरहून अधिक व स्त्रियांमध्ये ९० सेंटीमीटरहून अधिक.
- प्राकृत रक्तदाबापेक्षा नेहमीच थोडासा वाढलेला राहणारा रक्तदाब (नेहमीच १४०/९० हून अधिक)
- रक्तामध्ये ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण वाढणे (१५० हून अधिक)
- रक्तामध्ये एलडीएल कोलेस्टेरॉलचे अतिप्रमाण (१५० हून अधिक)
- संरक्षक एचडीएल कोलेस्टेरॉलचे कमी प्रमाण (३५ हून कमी)
- रक्तशर्करा असात्म्यता विकृती (ग्लुकोज इन्टॉलरन्स)
- ग्लूकोज टेस्टनंतर २ तासांनी रक्तामध्ये साखरेचे वाढलेले प्रमाण (१४० हून अधिक)
धोका दर्शवणारे इतर मुद्दे - बी.एम.आय. ३० हून अधिक
- मूत्रतपासणीमध्ये प्रथिनांचे (अल्ब्यूमिनचे) वाढलेले प्रमाण
- वय ४० वर्षांहून अधिक
- दक्षिण आशियाई देश (ज्यात भारत), पश्चिम आफ्रिकी देश वा कॅरेबियन बेटांमध्ये जन्म
- मधुमेह – प्रकार २ या रोगाचा कौटुंबिक इतिहास
- उच्च रक्तदाब या रोगाचा कौटुंबिक इतिहास
- हृदय आघाताचा (हार्ट अटॅकचा) कौटुंबिक इतिहास
- त्वचेवर मानेमागे, काखांमध्ये, जांघांमध्ये व स्त्रियांमध्ये स्तनांखाली काळसर-जांभळट रंगाची जाड त्वचा (एकॅन्थोसिस नायग्रिकन्स)
- स्त्रियांमध्ये पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिन्ड्रोम)चा आजार
- गर्भारपणात मधुमेहाचा त्रास
मेटाबोलिक सिन्ड्रोमच्या या टाइमबॉम्बची टिक्टिक् भारतात सुद्धा सुरू झाली… आपण जेव्हा २१व्या शतकावर स्वार होऊन संगणक क्रांतीची आणि मुक्त अर्थव्यवस्थेची फळे चाखू लागलो तेव्हाच. १९९० मध्ये आपली अर्थव्यवस्था मुक्त झाल्यानंतर गेल्या २५-३० वर्षांमध्ये भारतामध्ये व भारतीय समाजामध्ये अगदी वर सांगितल्याप्रमाणेच बदल होत गेले, ज्याच्या परिणामी आज जवळजवळ एक तृतीयांश समाज मेटाबोलिक सिन्ड्रोमने ग्रस्त असावा अशी शंका अभासकांना आहे. याचा अर्थ जवळजवळ प्रत्येक घरात एक व्यक्ती मेटाबोलिक सिन्ड्रोमने ग्रस्त आहे असे समजायचे का? शंका येत असेल तर एकदा वरील कोणते व किती मुद्दे तुमच्या घरातल्या सदस्यांना लागू होतात ते तपासून पाहा. लागू होत नसलेच तर आपल्या कुटुंबाला निरोगी समजा आणि लागू होत असतील तर स्वतःमध्ये आणि कुटुंबामध्ये जाणीवपूर्वक बदल घडवा, अन्यथा हा टाइमबॉम्ब फुटल्यावर काही करता येणार नाही. आता तुमच्या लक्षात आले असेल पीसीओएस् हा आजार मुलींमध्ये इतक्या अधिक प्रमाणात का बळावला आहे ते!
drashwin15@yahoo.com