हे विचित्र शीर्षक वाचून तुम्ही विचारात पडला असाल, तर आम्ही आधीच सांगतो, की ‘पॉ-पुरी’ हा शब्द आम्ही काढलेला नाही! या शब्दाचं स्पेलिंग आहे Potpourri. या फ्रेंच लोकांचं काम असंच बुवा! एका शब्दाचं स्पेलिंग आणि उच्चार मॅच होईल तर शपथ! तर ही ‘पॉ-पुरी’ (तोंडाचा चंबू करून म्हणून बघा. जमेल.) असते काय आणि त्याचा तुम्हा-आम्हा ‘चतुरां’शी काय संबंध?… या चक्क वाळलेल्या फुलांच्या पाकळ्या असतात. म्हणजे फुलांच्या पाकळ्या, काही सुगंधी अर्क, स्वयंपाकात वापरतात त्यातले काही खडे मसाले अशा सुगंधी घटकांचं हे मिश्रण. अगदी आपण चिवड्यात कसं पोहे, दाणे, मिरच्या, कढीपत्ता आणि मसाल्याचं मिश्रण करतो ना, तसा पॉ-पुरी हा फुलांचा चिवडा आहे असंसुद्धा म्हणता येईल! फक्त तो खायचा नसतो, तर हुंगायचा असतो!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॉ-पुरी हा प्रकार पाश्चात्य देशांमध्ये शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे. काही दुवे तर असे मिळतात, की परफ्यूम व अत्तरांचा बाजार विकसित होण्यापूर्वीपासून पॉ-पुरीची चलती होती. मोठमोठ्या राजेशाही किल्ल्यांच्या खोल्यांमध्ये पॉ-पुरी घालून ठेवलेली सुशोभित भांडी आजूबाजूच्या वैभवाची शोभा आणखी वाढवायची. आज केवळ पाश्चात्य देशांतच नाही, तर आपल्याकडेही कित्येक स्टार हॉटेल्समध्ये, मोठया मंडळींच्या घरांमध्येही डायनिंग टेबल/ कॉफी टेबलवर/ हॉलमध्ये किंवा अगदी वॉर्डरोबच्या आरशाजवळसुद्धा असे पॉ-पुरी पॉटस् दिसतात. रंगीबेरंगी पॉ-पुरी दिसते तर छानच, पण त्या बाउलच्या जवळ जाऊन खोलवर वास घेतला, की मस्त, रिफ्रेशड् वाटतं! फक्त एकमेकांना ‘कॉम्प्लिमेंट’ करणाऱ्या वासांची फुलं, अत्तरं आणि मसाले वापरणं गरजेचं. शिवाय वातावरण दमट असेल तर पॉ-पुरी सडून जाऊन खराब होऊ नये, याकडे लक्ष पुरवावं लागतं.

पॉ-पुरीमध्ये भडक लाल, राणीकलर किंवा धमक पिवळे गुलाब खूपच लोकप्रिय आहेत. आणि त्याबरोबर गडद-फिक्याचा परिणाम साधायला थोडे फिक्या रंगाचे गुलाबही वापरले जातात. गुलाब लोकप्रिय का, तर टपोऱ्या गुलाबांच्या पाकळ्या सुशोभित दिसतात म्हणून. मात्र तुम्ही कोणत्याही रंगांची आणि कोणतीही फुलं वापरू शकता. ही फुलं आपल्याला वाळवावी लागतात हे लक्षात घ्या. नुसती ताजी फुलं वापरली, तर ती छान दिसतील, पण पॉ-पुरी एका दिवसापेक्षा अधिक काळ टिकणार नाही. म्हणून फुलांचा हा चिवडा त्यातला पाण्याचा अंश काढून टाकायला ओव्हन किंवा डीहायड्रेटर मध्ये वाळवला जातो. खरंतर फुलं ओव्हन वा डीहायड्रेटर न वापरताही नुसत्या खुल्या हवेत छानपैकी वाळवता येतात. फक्त हवा कोरडी हवी, दमटपणा आणि धूळ नको. फुलं अशी वाळवायची असतील, घराच्या आत एक आठवड्यात वाळतात. फक्त रोज त्यावर लक्ष ठेवायचं आणि हातानं पाकळ्या थोड्या वर-खाली करायच्या.

वाळल्यावर सर्वच फुलांचा रंग थोडा बदलून फिका होतो हे फुलं निवडताना लक्षात ठेवायला लागतं. फुलं आणि पाकळ्यांबरोबर पुष्कळ लोक संत्री किंवा लिंबाची वाळवलेली सालं किंवा संत्र्याच्या अख्ख्या वाळवलेल्या चकत्या वापरतात. दालचिनी, वेलदोडे, लवंग, स्टार फूल, जायफळ असे खडे मसाले आणि लॅव्हेंडर, रोझ, पेपरमिंट, ऑरेंज असे तुम्ही निवडलेल्या फुलांशी व खड्या मसाल्यांशी मिळतेजुळते सुगंधी अर्क वापरले जातात. वापरलेला सुगंध टिकावा यासाठी काहीतरी ‘फिक्सेटिव्ह’ वापरलं जातं. अनेक लोक याकामी ‘ओरिस रूट पावडर’ हा एक पदार्थ वापरतात आणि इतरही काही पॉ-पुरी फिक्सेटिव्हज् बाजारात मिळतात. पण आपण जे खडे मसाले यात वापरतो त्याचाही तोच परिणाम मिळतो.

आता पॉ-पुरी नेमकी करायची कशी, याची ‘रेसिपी’ काही आम्ही तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही! मुळात त्याची काही एकच ठरलेली पद्धत नाही. कल्पकतेला भरपूर वाव आहे. कलात्मक ‘चतुरा’ एव्हाना इंटरनेटवर ‘डीआयवाय’ व्हिडीओज् पाहायला पोहोचल्याही असतील!

पसरट बाऊलमध्ये ठेवलेली ‘होममेड पॉ-पुरी’ साधारणतः कोरड्या, स्वच्छ वातावरणात अडीच-तीन महिने चांगली टिकू शकते. त्याचा सुगंध कमी झाल्यावर वरून काही थेंब सुगंधी अर्काचे टाकले किंवा फवारले की काम झालं. अगदी तयार पॉ-पुरीसुद्धा हल्ली विकत मिळते. ती खूपच छान दिसते, पण त्याचा वास फारसा टिकत नाही असं पॉ-पुरी वापरणारे सांगतात.
ही फुलं आणि सुगंध आवडणाऱ्या प्रियजनांसाठी अगदी उत्तम भेटवस्तू ठरेल. परदेशात तर अमुक एका विशिष्ट दिवशी- उदाहरणार्थ ‘प्रपोज’ करताना ‘त्यानं’ दिलेला गुलाबांचा बुके किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचं निधन झाल्यावर त्यांच्या स्मरणार्थ जपलेला फुलांचा बुके खूप दिवस टिकवायला त्याचं सुगंधी पॉ-पुरीमध्ये रूपांतर करायचीही पद्धत आहे. शेवटी हौस करावी तेवढी थोडी असते आणि आपण ‘चतुरा’ तर जात्याच हौशी असतो!

सध्या गणपतीच्या दिवसांत आपल्याकडे रोज चिक्कार फुलं आणली जातात. त्यातली सगळीच काही देवासाठी किंवा सजावटीला वापरली जातात असं नाही. कित्येकदा खूप फुलं उरतात. ती फुलं पॉ-पुरी तयार करण्यासाठी निश्चित वापरता येतील. मग करून पाहा तुमच्या आवडत्या वासांची पॉ-पुरी! मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून तुमचं कौतुक निश्चितच होईल याची खात्री आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is potpourri how to use it the right way here a guide for you nrp