-डॉ. स्मिता प्रकाश जोशी
“थँक्यू डिअर, आज तू आहेस म्हणून माझ्या आयुष्यात सर्व काही आहे. आता जगण्यातही अर्थ नाही असं वाटलं होतं, पण तू मला धीर दिलास… हे आयुष्य खूप चांगलं आहे आणि जगण्याचा आनंद घ्यायचा हे तू मला शिकवलंस. तू मला भेटला नसतास तर… हा विचारही मी करू शकत नाही. वन्स अगेन, थँक यू! रविवारी नक्की भेटू आणि फोनवर बोलत राहूच… बाय… गुड नाईट!”
रेवाचं संभाषण कावेरीच्या कानावर पडलं होतं, म्हणून तिनं विचारलं, “रेवा, कोण गं? मिलिंद होता का?”
“दीदी, त्याचं नाव काढू नकोस माझ्यासमोर!”
“अगं, मागच्या वेळेस मी माहेरी आले होते, तेव्हा तुझा खास मित्र, ‘मैत्रीच्याही पलीकडचा’ अशी त्याची ओळख तू करून दिली होतीस तू! ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुढचा विचार करणार आहात असंही सांगितलं होतंस. मग असं अचानक काय झालं? आणि हा ‘डिअर’ कोण होता?”
“अगं हा रोहन होता.”
“रेवा, तुझं नक्की काय चाललंय? मिलिंद आणि तुझ्या रिलेशनशिपचं काय? आणि मध्येच हा रोहन कुठून आला?”
“दिदी, रोहन माझा रीबाऊंड आहे!”
“हे काय नवीनच?”
आणखी वाचा-…तर तिसर्या बाळंतपणाकरता गर्भधारणा रजा मिळू शकते
“दिदी, मिलिंदबरोबर माझा ‘ब्रेक-अप’ झाला हे मी तुला सांगितलं नव्हतं. तेव्हा तू जिजूंबरोबर दुबईला होतीस, सो मी तुला डिस्टर्ब केलं नाही. पण मिलिंदनी मला चीट केलंय. ‘व्हॅलेंटाईन डे’ला तो माझ्याबरोबर आला नाही, मला कोणतंही गिफ्टसुद्धा दिलं नाही. मी रागावले तेव्हा माझी समजूत न काढता त्यानं माझ्याशी बोलणंच बंद केलं. माझे फोन नंबर ब्लॉक केले.
मला याचा खूप त्रास झाला. मी त्याला भेटले आणि खूप बोलले. ‘मी तुझ्या हातचं बाहुलं होणार नाही आणि तुझ्या मर्जीनुसार वागणार नाही,’ असं म्हणाला तो मला आणि निघून गेला… तूच सांग, असं कुणी वागत का आपल्या गर्लफ्रेंडबरोबर? मी खूप हर्ट झाले. आत्महत्येचे विचार मनात येत होते… आणि तेव्हाचं मला रोहन भेटला. रोहननं खूप आधार दिला. त्याचंही कविताबरोबर नुकतचं ब्रेकअप झालंय. मग आम्ही दोघांनी ब्रेक-अप सेलिब्रेट केलं. दोघांनी आपला पास्ट विसरायचा आणि नव्यानं आयुष्य सुरू करायचं ठरवलं. आता आम्ही रीबाऊंड रिलेशनशिपमध्ये आहोत!”
“रेवा, काय हे? काय म्हणावं तुम्हा मुलांना? काय गरज होती लगेच दुसरा बॉयफ्रेंड शोधण्याची? कुणाचा तरी खांदा हवाच असतो का तुम्हाला? थोडंसुद्धा सहन करण्याची ताकद नाही?”
“दिदी, आपण चाललेल्या मार्गात काही अडथळे आले तर आपण मार्ग बदलतोच ना? एक प्लॅन सक्सेस झाला नाही, तर दुसरा प्लॅन तयार करतो. मग आपण एखाद्यावर प्रेम करत असताना त्यानं त्या नात्याला किंमत दिली नाही, तर सतत त्या ब्रेकअपच्या दुःखात राहून नैराश्यात जाण्यापेक्षा कोणीतरी रीबाऊंड मिळाला तर चांगलचं असतं. आयुष्याकडे नव्यानं बघण्याचा दृष्टिकोन तो देतो. रोहन माझ्या भावना समजून घेतो, त्याच्या सहवासात मला आनंद मिळतो.”
आणखी वाचा-तुम्हीही कुजबुजता? पण गॉसिप करण्याचे हे फायदे तुम्हाला माहितेयत का? तज्ज्ञ म्हणतात…
“अगं, हेच सगळं तू मिलिंदच्या बाबतीतही म्हटली होतीस. त्याच्या सहवासात तुला छान वाटतं, तो तुझ्यासाठी ‘परफेक्ट’ आहे वगैरे. आता काही दिवसांनी रोहनही असाच वागला, तर तू पुन्हा दुसरा रीबाऊंड शोधणार का? आणि खरंच हे तुला चांगलं वाटतंय की मिलिंदवर सूड उगवण्यासाठी तू हे करते आहेस? रेवा, अगं नाती टिकवायची असतील तर ‘सगळं माझ्याच मनासारखं व्हावं,’ हा हट्ट सोडावा लागतो. नात्याला ब्रेकचीही गरज असते. या ब्रेकमध्ये आपण कुठं चुकलो, कुठं कमी पडलो, याचं आत्मपरीक्षण करायचं असतं.
सावरायला, शांत व्हायला वेळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो. असे रीबाऊंड शोधत राहिलीस तर भरकटत राहशील. नात्याकडून तुला नक्की काय हवंय तेच तुला कळणार नाही. खरंच मिलिंदनं तुझी फसवणूक केलीय की तुला केवळ तसं वाटतंय?… तुझ्या मताप्रमाणे तो वागला नाही म्हणून तुला वाईट वाटतंय का? तुमच्या नात्यात दुरावा का निर्माण झाला? याची खरी कारणं शोधून काढ. दुसऱ्या नात्यात अडकण्याची लगेच घाई करू नकोस.”
कावेरीचं बोलणं ऐकून रेवा विचारमग्न झाली. आपण रोहनशी नातं वाढवणार की नाही, हे काही तिनं लगेच कावेरीला सांगितलं नाही. पण आपल्याशी मिलिंद वाईट वागला म्हणजे नक्की काय वागला, आपल्याला नक्की काय हवंय, याची उत्तरं शोधायला तरी तिची सुरूवात नक्कीच झाली.
lokwomen.online@gmail.com