देश साक्षर होणे हे आपल्यापैकी प्रत्येक सुजाण नागरीकाचे स्वप्न असेल. देशाचा साक्षरता दर वाढावा यासाठी सरकार दरवर्षी नवनवीन योजना राबवत असतात. सारक्षतेसह लोकसंख्या सुद्धा खूप मोठी समस्या देशात सध्या भेडसावत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे संसाधने आणि सेवांवर दबाव वाढत आहे, ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, गरिबी आणि बेरोजगारीसारख्या समस्या समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकार लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मंगळवारी विधानसभेत वाढत्या प्रजनन दरावर बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मुली साक्षर असतील तर प्रजनन दर घसरतो, असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली. शेवटी त्यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी माफी मागितली.
नितीश कुमार म्हणाले होते की लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज आहे. मग प्रश्न हा पडतो की मुलांच्या शिक्षणाची गरज नाही का? प्रजनन दर कमी करण्यासाठी फक्त मुलींनीच शिकणे अपेक्षित आहे का? फक्त मुलींना असे टार्गेट का केलं जातं?
मूल जन्माला घालण्याचा किंवा न घालण्याचा निर्णय नवरा बायको या दोघांचाही असतो, त्यासाठी फक्त मुलींनाच जबाबदार धरणे चुकीचे आहे. ज्याप्रमाणे प्रजनन दर कमी करण्यासाठी मुलींचे साक्षर असणे अपेक्षित आहे. तसंच पुरुषांचे सुद्धा समान पातळीवर साक्षर असणे गरजेचे आहे. मूल जन्माला घालण्यासाठी फक्त मुलीला जबाबदार समजणे खूप चुकीचे आहे.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांना एका मोठ्या पदावर असताना असे वादग्रस्त वक्तव्य करणे अजिबातच शोभत नाही किंवा कोणत्याही स्त्रिला हे ऐकून वाईट वाटेल. नितीश कुमार यांचे विचार खरंच आजच्या सुशिक्षित वातावरणाला धरुन नाही.
हेही वाचा : Poonam Gupta : १ लाखात उभारली ८०० कोटींची कंपनी, वाचा महिला उद्योजिकेची प्रेरणादायी कहाणी
मुलींनी साक्षर व्हावं. एवढंच काय तर लैंगिक शिक्षणाची तिला पुरेपुर जाण असावी पण मुली साक्षर झाल्या तर प्रजनन दर घसरेल असे म्हणणे मात्र खूप चुकीचे आहे. ज्याचा थेट अर्थ असा होतो, “मुली निरक्षर असतील तर प्रजनन दर वाढतो म्हणजे प्रजनन दर वाढण्यामागे पुरुषांची कोणतीही भूमिका नसते फक्त आणि फक्त महिलाच जबाबदार असतात.”
कुटुंब नियोजन हे नवरा बायको या दोघांच्या सहमतीने केले जाते आणि या संदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा दोघांना समान अधिकार असतो. दोघांच्या सहमतीने कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला जातो. खरं तर हे दुर्दैव्य आहे की अनेक ठिकाणी कुटुंब नियोजनाविषयी बोलले जात नाही पण त्याचे खापर फक्त स्त्रियांच्या निरक्षरतेवर फोडणे, हे चुकीचे आहे.
आजची स्त्री सुशिक्षित आहे. तिला प्रत्येक गोष्टीची जाण आहे. कुटुंब नियोजन कसे करायचे , हे तिला कळतं. एवढंच काय तर पुरुषांच्या बरोबरीने ती निर्णय घेण्यास सक्षम आहे. पण वाढत्या लोकसंख्येसाठी तिला सरसकट जबाबदार धरणे, हे चुकीचे आहे.
खरं तर आपण कोणत्या मानसिकतेत जगतो, याचा विचार करणे गरजेचे आहे. स्त्रिला सुरुवातीला शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना शिक्षण घेता यावे म्हणून वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे आता स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. अशात लोकसंख्येचा मुद्दा समोर आणून प्रजनन दर वाढवण्यास स्त्रियांची निरक्षरता कारणीभूत आहे, असे वक्तव्य करणे, ही स्त्रियांविषयी अपमानाची भाषा असून यामुळे युगानुयुगे स्त्रियांच्या वाटेला येणारा संघर्ष प्रखरपणे दिसून येतो.