काही नवीन व काही जुन्या अशा परंपरागत औषधी, आहाराचे प्रकार, आहाराचे नियोजन, प्रत्येक येणाऱ्या बदलत्या ऋतूनुसार पाळावयाची दिनचर्या, बाहेर फिरताना घ्यावयाची काळजी तसंच अनेक परंपरागत चालू असणाऱ्या आहारविहाराच्या चालीरीती आणि त्यांच्या पाठीमागील वैज्ञानिक अशी शास्त्रोक्त माहिती यांचा आढावा आपण या सदरातून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हे तर सर्व आम्हाला माहिती आहेच की, आणि प्रत्येक ठिकाणी आजकाल आयुर्वेदाबद्दल आम्हाला हेच ऐकायला वाचायला मिळत आहे की, मग तुम्ही असे वेगळे सदर सुरू करण्याचे काय प्रयोजन? आणि त्यातून काय साध्य होणार? व आम्हालाही काय नवी माहिती कळणार?
तर उत्तर अगदी सोपं आहे… तुम्हाला ही सर्व माहिती आता एकाच ठिकाणी शास्त्र व परंपरा यांना धरून आधुनिक विज्ञानाच्या निकषात तपासून जे योग्य आहे ते करायला सांगणारी व जे अयोग्य आहे त्याचा विचार करायला लावणारी अशी मिळणार आहे. आता हेच पाहा ना… सध्या पाणी कसे प्यावे? उभ्याने प्यावे की बसून? भांड्याला तोंड लावून प्यावे की भांडे लांब धरून वरून प्यावे? मध गरम करावा की नाही? गरम पाणी आणि मध प्यायल्याने वजन खरेच कमी होते का? त्यात लिंबू पिळायचे की नुसतेच गरम पाणी आणि मध घ्यायचे? नुकत्याच जन्मलेल्या बाळाला मध द्यावा की नाही? लहान मुलांनी कोणती फळे खावीत? कोणती फळे खाऊ नयेत? कधी खावीत? कारले, दूधी भोपळा यांचा रस प्यावा का? आणि तो किती आणि कसा प्यावा? तरुण असताना चेहऱ्यावर ज्या येतात त्या तरुण्यापीटिका मग तारुण्य जाऊ लागलं तरी त्या का जात नाहीत? आजकाल सर्वच वयोगटात केस गळणे, केस पिकणे या तक्रारी का वाढल्या आहेत? त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात? मासिक पाळीचे आजार का वाढले आहेत? वजन का कमी होत नाही? आणि उतार वय सुरू झालं की नेमकं पोट का साफ होत नाही? ‘पिकू’सारखे चित्रपट जर फक्त एवढा एकच विषय घेऊन येत असतील तर ही समस्यासुद्धा किती मोठी आहे याचा विचार करावा लागतोच.
हेही वाचा… मातापित्यांची मालमत्ता हवी, पण त्यांची जबाबदारी नको?… वृद्ध आई-वडिलांनी हे वाचायलाच हवं!
त्यासाठीच हे सदर जिथे तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन होईल. तेही एकाच ठिकाणी आधुनिक शास्त्रोक्त व आयुर्वेदिक परंपरागत मतसुद्धा माहिती होईल. मसाल्याच्या डब्यातील आयुर्वेदही समजेल, घरगुती उपचार तसेच आज्जीबाईचा आधुनिक बटवासुद्धा कळेल. तेव्हा आरोग्यासाठी शुभेच्छा!
harishpatankar@yahoo.co.in