संपदा सोवनी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावरच्या ‘इन्फ्लूएन्सर्स’च्या ‘ब्यूटी रिच्युअल्स’मध्ये तुम्ही ‘जेड रोलर’ नामक प्रकार निश्चित कधीतरी पाहिला असेल. चेहऱ्याची निगा राखण्याची प्रक्रिया दाखवताना हे लोक ‘जेड रोलर’ हमखास वापरताना दिसतात. साधारणत: हिरव्या किंवा गुलाबी रंगाच्या जेमस्टोनपासून बनवलेला हा छोटा रोलर असतो. चेहऱ्यावर मसाज होण्यासाठी हा रोलर चेहऱ्यावरून विशिष्ट पद्धतीनं सावकाश फिरवतात. त्याच्या वापरानं चेहऱ्यावरचा ‘पफीनेस’ (अर्थात चेहऱ्यावर दैनंदिन ताणतणावामुळे येणारी थोडीशी सूज) कमी होते, असा जोरदार दावा केला जातो. याविषयी ब्यूटी आणि फॅशन क्षेत्रातली मंडळी काय सांगतात, ते पाहू या.

‘जेड रोलिंग’ ही एक चिनी ब्यूटी रिच्युअल आहे आणि तिथे ते पूर्वापार वापरलं जातं. कोरियन ब्यूटी टूल्समध्येही हे रोलर्स सापडतात. ‘जेड’ हा हिरव्या रंगाचा एक मौल्यवान खडा असतो. परंतु ‘क्वार्टझ्’ या गुलाबीरंगी मौल्यवान खड्यापासून बनवलेले रोलर्ससुद्धा बाजारात दिसतात. या उत्पादनाच्या विविध निर्मात्यांच्या दाव्यानुसार जेड रोलर चेहऱ्याच्या त्वचेवरून फिरवला, की त्वचेतलं ‘वॉटर रीटेन्शन’ कमी व्हायला मदत होते. यासाठी ‘लिम्फॅटिक ड्रेनेज’ हा शब्द वापरला जातो. अर्थातच आधी म्हटल्याप्रमाणे त्वचेवरची सूज कमी करण्याचा दावा केलेला असतो. याशिवाय त्वचेतील रक्ताभिसरण चांगलं होतं, त्वचेला घट्टपणा येण्यास आणि पर्यायानं सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, त्वचा आणखी मऊसूत होते, असंही सांगितलं जातं. हे सर्व दावे खरे की खोटे, हा खरा प्रश्न आहे. जेड रोलरप्रमाणेच खड्यांपासून बनलेली आणखी काही ‘स्कल्प्टर टूल्स’, ‘वांड’ (Wand- एक प्रकारचं फेस मसाज टूल), थोडं चपटं असं ‘गे शा’ टूल (हेसुद्धा स्कल्प्टर मसाज टूलच आहे.) अशी विविध साधनं या प्रकारात बाजारात दिसताहेत.

हेही वाचा… ओवाळिते भाऊराया…! महिला प्रवाशांच्या मनातील खदखद मोटरमनला कळेल का?

काही लोक आधी त्वचेवर ‘शीट मास्क’ लावून त्यावरून जेड रोलर फिरवून मसाज करतात.

खरंतर जेड रोलर त्वचेवर फिरवून मसाज केल्यामुळे त्वचेला नेमका काय फायदा होतो, याविषयी वैद्यकीय अभ्यास तूर्त झालेले दिसत नाहीत. पण काही सौंदर्यतज्ञांच्या मते त्वचेवर मसाज केल्यानं त्वचेला फायदा होतो. म्हणजे ‘जेड’ किंवा ‘क्वार्टझ्’ या मौल्यवान खड्याचा रोलरच त्वचेवर फिरवायला हवा असं काही नाहीये. मसाज हातानं केला तरी चालतो. जेड रोलर वापरून मसाज करण्याची तुमची पद्धत जर योग्य असेल, तर त्वचेतल्या स्नायूंवरचा ताण निवळून ते ताजेतवाने होऊ शकतात. त्वचेची नियमित, योग्य मसाज करून काळजी घेतली, तर कालांतरानं त्वचा चांगली तुकतुकीत आणि अधिक तरूण दिसण्यास मदत होऊ शकेल. जेड रोलरमध्ये वापरला जाणारा खडा स्पर्शाला थंड असतो. त्यामुळे त्याच्या सहाय्यानं त्वचेवर मसाज करताना थंड वाटतं आणि बरं वाटतं, एवढं मात्र खरं. काही लोक आणखी थंड वाटावं, यासाठी जेड रोलर आधी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून मग वापरतात. एक आहे, की तुम्हाला जर हे रोलर्स किंवा ‘स्कल्प्टर टूल्स’ वापरायचेच असतील, तर त्यानं मसाज कसा करावा याची योग्य पद्धत या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीकडून समजून घेतलेली बरी. आणखी एक, जेड रोलर तुम्ही वापरत असाल, तर प्रत्येक वेळी वापरानंतर तो स्वच्छ धुवून, कोरडा करून ठेवा.

हेही वाचा… चॉइस तर आपलाच : अधिकारवाणीने बोलण्याचा कॉम्प्लेक्स?

सौंदर्यतज्ञ असंही सांगतात, की नुसता जेड रोलरचा उपाय करून फायदा होत नाही. त्याबरोबर त्वचेची मुळातच चांगली निगा राखावी लागते. त्यासाठी उत्तम दर्जाची ब्यूटी आणि हायजीन उत्पादनं वापरणं, कोणतंही नवं उत्पादन किंवा नवी टेक्निक यांचा स्वत:वर थेट प्रयोग न करता आधी त्याच्या वापराविषयी तज्ञांच्या सल्ल्यानं माहिती घेणं आवश्यक. याबरोबर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचीही चांगली काळजी घेणं गरजेचं आहे. तर तुमची त्वचा चांगलीच दिसेल.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the actual use and benefits of jade roller for facial massage asj
Show comments