Women’s Sports: सध्या सर्वच क्षेत्रांत महिलांचे सर्वाधिक वर्चस्व पाहायला मिळत आहे. नृत्य असो, गायन असो, क्रीडा असो किंवा अगदी अंतराळापर्यंत जाणे असो अशा विविध क्षेत्रांत महिला आपले, आपल्या देशाचे आणि आपल्या कुटुंबीयांचे नाव अभिमानाने उंचावत आहेत. सध्या पुरुषांइतक्याच महिला खेळाडूदेखील अनेक खेळांमध्ये प्रगतिपथावर आहेत. क्रीडा क्षेत्रात त्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये यशस्वी होऊन, मोठमोठे विक्रम मोडीत काढत आहेत. हळूहळू महिला खेळाडूंचा प्रेक्षकवर्गही वाढत आहे. महिला खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पुरुषांबरोबरीने यश मिळवून समानता मिळविण्यासाठी प्रयत्न करताना पाहिले की, महिला खेळाडूंच्या एकंदर यशस्वी वाटाचालीचा चढता आलेख दिसून येतो. त्या पार्श्वभूमीवर आज आपण महिला आणि त्या खेळत असलेल्या खेळांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.

महिला खेळाडू प्रगतिपथावर

इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये महिला खेळाडूंना पॅरिस २०२४ ऑलिम्पिक खेळांमध्ये पुरुष खेळाडूंइतकीच जागा दिली जाणार आहे. शिवाय आता महिला खेळाडूंचा प्रेक्षकवर्गही वाढत आहे. १० पैकी सात लोक आता महिलांचे खेळ पाहण्यासाठी सहभागी होतात. हल्ली जवळपास ७३ टक्के लोक महिलांचे खेळ आवर्जून पाहतात, तसेच पुरुषांचे खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ८१ टक्के आहे.

खेळामुळे महिलांच्या आत्मविश्वासात वाढ

खेळाडू महिला त्यांच्या करिअरला अधिक महत्त्व देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. इतर महिलांप्रमाणे त्या लवकर लग्न करणे, गर्भधारणा करणे या गोष्टींकडे काही काळ दुर्लक्ष करतात. तसेच खेळामुळे शरीराची हालचाल होते; ज्यामुळे त्यांचे शरीर सुदृढ राहते आणि लवचिकता वाढते. तसेच यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वासाबरोबरच संघटनकौशल्यही वाढते. त्याचा फायदा त्यांच्या दैनंदिन जीवनातही पाहायला मिळतो.

महिलांमध्ये महिला खेळाडूंबद्दलची क्रेझ वाढणे गरजेचे

मागील तीन वर्षांत महिला खेळाडूंचे मीडिया कव्हरेज जवळपास तिप्पट वाढले असले तरी महिलांना अजूनही पुरुष खेळाडूंच्या तुलनेत खूपच कमी कव्हरेज (एकूण क्रीडा कव्हरेजपैकी फक्त १६ टक्के) मिळते. त्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषवर्गामध्ये पुरुष खेळांडूबद्दल अधिक क्रेझ पाहायला मिळते. अशीच क्रेझ महिलांमध्येदेखील महिला खेळाडूंबद्दल वाढायला हवी; जी अनेक मुलींना क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्यास प्रेरित करू शकते.

क्रीडा क्षेत्रात लिंगभेद कायम

सध्या महिला क्रीडा क्षेत्रात अधिक नेतृत्वदर्शक भूमिका घेत आहेत, उत्तम धोरणे चालवत आहेत आणि गुंतवणूकही वाढवत आहेत. यांमुळे महिलांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये विक्रमी उपस्थिती आणि कव्हरेज वाढले आहे. तसेच यामुळे महिला-पुरुष यांच्या पगारातील अंतर कमी करण्यापासून ते हिंसाचार, अत्याचार आदी चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यापर्यंतच्या महिलांच्या अनेक मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. परंतु, या प्रगतीनंतरही अडथळे आणि लिंगभेद कायम आहेत. स्पोर्ट इंटिग्रिटी ग्लोबल अलायन्सच्या २०२३ मधील सर्वेक्षणानुसार, आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांमध्ये केवळ २६.९ टक्के कार्यकारी पदांवर महिला आहेत.

हेही वाचा: सुरक्षा महत्त्वाची! महिलांच्या सुरक्षेसाठी ‘हे’ Apps प्रत्येकीकडे हवेतच

पुरुष आणि महिला खेळाडूंच्या वेतनात असमानता

पुरुष आणि महिला खेळाडूंच्या वेतनातील असमानता हा सापत्नभाव अनेक वर्षांपासून सुरू आहे. स्पोर्टिंग इंटेलिजन्सने २०१७ मध्ये केलेल्या जागतिक क्रीडा वेतन सर्वेक्षणानुसार, अधिक वेतन कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये पुरुषांच्या कमाईच्या तुलनेत सरासरी केवळ एक टक्का महिला कमावतात. फोर्ब्स २०२४ च्या जगातील १०० सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅथलीट्सच्या यादीमध्ये कोणत्याही महिलेला स्थान नाही. तसेच, महिलांच्या खेळातील बक्षिसाची रक्कम पुरुषांच्या तुलनेत खूप कमी असते.