तन्मयी बेहेरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विटरच्या स्पेसेस या प्लॅटफॉर्मवर ‘जागतिक पातळीवर महिलांची स्थिती’ या विषयावर चर्चा सुरु होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या लेखिका, उद्योजिका, विचारवंत, स्त्रीवादी कार्यकर्त्या, स्त्री शास्त्रज्ञ आपले विचार मांडत होत्या.

या ट्विटर स्पेसमध्ये ब्राझिलच्या राष्ट्रपतींच्या स्त्रियांबद्दलच्या एका वक्तव्याचा उल्लेख झाला आणि त्याबाबत बरीच चर्चा झाली. स्त्रियांबाबत मोठ्या पदावरचे पुरुष जेव्हा बेजबाबदारपणे बोलतात तेव्हा त्याचा मुलांवर होणारा विपरीत परिणाम आणि मुलींवर होणारा निराशाजनक परीणाम यावर जगभरातल्या स्त्रिया मनापासून बोलत होत्या. सर्व ‘बिग ब्रेन’ महिलांनी एकमुखानं अशी मानसिकता असणाऱ्या प्रस्थापित पुरुषांचा धिक्कार केला.

हेही वाचा- पुरुषांना मोकळ्या विचारांची मैत्रीण चालते, पण मग बायको का नाही?

ब्राझीलचे पूर्व राष्ट्रपती जझीर बोल्सनारो यांचं हे विधान होतं, “मला पाच मुलगे आहेत सहावी मुलगी झाली, कारण तेव्हा मी अशक्त होतो.” लॅटिन-अमेरिकेतील सर्वात मोठ्या देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलेल्या व्यक्तीनं हे विधान कसं काय केलं असेल? स्त्री आणि पुरुष बीजाचा संयोग होऊन मुलगा किंवा मुलगी होणं हे कोणाच्याच हातात नाही असं विज्ञान सांगत असताना बोल्सनारो यांच्या विचारांच्या बैठकीला रूढी परंपरेतून आलेल्या गैरसमजांचंच अधिष्ठान आहे हेच समोर येतं.

इजिप्तमधील प्रख्यात वकील नबीह अल वाहश टेलिव्हिजन शोमध्ये एकदा म्हणाले होते, “फाटकी जीन्स घातलेल्या मुलीवर बलात्कार करणं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे.” काय ही मानसिकता! ते एवढ्यावर थांबले नाहीत, ”कमी कपडे परिधान केलेल्या स्त्रियाच पुरुषांना अत्याचार करायला आमंत्रण देतात.” हेदेखील त्यांनी पुढे जोडलं.

हेही वाचा- तो’ Metrosexual आहे म्हणजे… अशी मुलं ज्यांना स्त्रियांचे…

सावित्रीबाई, जोतिबांच्या, आंबेडकरांच्या भारत देशातही काही नेते जेव्हा स्त्रियांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करतात तेव्हा समाज अंधाऱ्या काळात जातोय की काय अशी भीती वाटायला लागते. मुलायमसिंग यादव एका सार्वजनिक सभेमध्ये म्हणाले होते, “मुलीच मुलांशी मैत्री करायला जातात आणि मग नाही पटलं की त्याच्यावर बलात्काराचे आरोप करतात.” ते पुढे असंही म्हणाले, “लडकोंसे हो जाती हैं गलती!” बलात्कार हा किती संवेदनशील विषय आहे हे पुरुषांना समजलेच नाही आहे! वास्तविक राजकीय नेत्यांनी, प्रतिष्ठित व्यक्तीनीं अर्थातच बलात्कारीत मुलीच्या बाजूनं उभे राहिलं पाहिजे आणि बलात्कार करणाऱ्या पुरुषाला क्रूर शिक्षा मिळाली पाहिजे, जेणेकरून दुसरा कोणताही पुरुष असं कृत्य करायला धजावलाच नाही पाहिजे. हे नक्कीच सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे कारण ते कायदे सुधारू शकतात.

वयस्कर नेते शरद यादव राजस्थानच्या पूर्व मुख्यमंत्री वसुंधरा राजेंविषयी म्हणतात, “वसुंधरा राजेंनी आता विश्रांती घ्यायला हवी, त्यांचं वजन खूप वाढलेलं आहे.” असं बॉडी शेमिंग करून शरद यादवांनी राजकारणात काय मिळवलं?

शशी थरूर म्हणतात, “निश्चलनीकरण ही किती घोडचूक होती. जगात भारतीय चलनाचा किती दबदबा आहे बघा, आपली ‘चिल्लर’ सुध्दा विश्वसुंदरी बनते.” आपल्याच देशाच्या विश्वसुंदरीला असं अपमानित करणं थरूर यांच्यासारख्या विद्वान नेत्याला शोभतं का?

हेही वाचा- समुपदेशन : का करावं लग्न?

कर्नाटकचे आमदार के. आर. रमेशकुमार यांनीही असंच विधान केलं होतं, “असं म्हणतात, की जेव्हा बलात्कार टाळता येणं शक्य नसतं, तेव्हा फक्त पडून राहा आणि आनंद घ्या.” जबरदस्तीनं, मनाविरुद्ध शारीरिक संबंधाला सामोरं जाणाऱ्याला असला हिडीस सल्ला देण्याची अवदसा कुठून येते?

आपण निवडून दिलेले नेते एवढे भावनाशून्य कसे? एवढं बेजबाबदार विधान लोकांसमोर, प्रसारमाध्यमांसमोर हे करू शकतात याचा अर्थ अशा नेत्यांना कोणाचाच धाक राहिलेला नाही. पुरुषार्थाच्या चुकीच्या कल्पनांमध्ये ते अजूनही रममाण झाले आहेत. आपण चुकलो असं त्यांना जराही वाटत नाही. एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करायच्या तर एकीकडे अशी बेजबाबदार विधानं करायची, हे बघून खरंच मी मुलगी म्हणून विषण्ण होते.

त्यातच कालपरवा संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान वाचण्यात आलं,“आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री हे भारतमातेचं रूप आहे.भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन…” पुण्याच्या एका नामवंत महाविद्यालयात विज्ञान शिकवलेल्या प्राध्यापकानं कुंकवाचा संबंध थेट भारतमातेशी जोडावा? काय लॉजिक? आणि विधवा स्त्रीची एवढी हेटाळणी का? वैधव्य हा काय तिचा ‘चॉईस’ आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कर्तृत्वाला इतिहासाने मुजरा केलाच ना? आजच्या काळातही पेप्सिकोच्या संचालिका इंद्रा नुयी, बायोकॉनच्या अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ, यु. एन.मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रुचिरा कंबोज अशा सर्व भारतीय महिलांची कर्तबगारी कुंकवात मोजायची का?”

हेही वाचा- “आम्ही पुरुषांमध्ये बोलत नाही”, हे जेव्हा एक महिलाच दुसरीला सांगते तेव्हा…

आपल्याकडे स्त्रियांची ही परिस्थिती तर मग प्रगत राष्ट्रांत तरी महिलांविषयी आदरानं बोललं जात असेल असा माझा समज होता. पण तेव्हाच अमेरिकन नौसेनिक स्त्री अधिकाऱ्यांचे विवस्त्र फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याचा प्रसंग घडला. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मुलाखतीत ते स्त्रियांकडे कसे आकर्षित होतात याचं रसभरीत वर्णन करून म्हणाले, “जेव्हा तुम्ही लोकप्रिय असता तेव्हा तुम्ही काहीही करू शकता,” जगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अमेरिकेच्या सर्वोच्च पदावरचे नेते जर अशी विधानं करू लागले तर त्यांचे जगाच्या पाठीवरचे करोडो, अब्ज अनुयायी स्त्रियांचा आदर करतील अशी आशा तरी आपण कशी बाळगावी?

ही जगभरातील नेत्यांची वादग्रस्त विधानं ऐकली की वाटतं जग कुठे चाललंय? या जगात स्त्रीला सन्मानाची जागा कोणत्याही देशात नाही? तिच्याबद्दल आदरच नाही तर प्रगतीची समान संधी मिळण्याची स्वप्नं तरी ती कशी बघणार? निवडून दिलेले नेते जर स्त्रीबद्द्ल आक्षेपार्ह विधानं करत असतील तर? तर त्यांना खाली खेचून आपली जागा दाखवून देणं हे प्रत्येक सज्ञान मतदार स्त्रीच्याच हातात आहे. आपला लढा आपणच दिला पाहिजे.

tanmayibehere@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the importance of women according to the opinion of men dpj