मागच्या काही वर्षांत स्त्रीवादाची तत्वे, व्याख्या, संकल्पना यात झपाट्याने बदल झाले. स्त्रीवाद अर्थात फेमिनिझमचा अर्थ कालपरत्वे बदलत गेला. प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी फेमिनिझला फालतू म्हणण्यापर्यंत फेमिनिझमचं स्टेटस खालावत गेलं. महिलांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी सुरू झालेली चळवळ आज महिलांनाच फालतू वाटण्याइतपत का खालावली हा प्रश्न पडतो. स्त्रीवादी असणं म्हणजे काय? त्याचा उगम कसा झाला? फेमिनिझमची मुळे कुठे रोवली गेली या सर्वांचा अभ्यास करणे गरजेचं आहे. त्यानंतरच, फेमिनिजमच्या बदलत्या व्याख्येवर भाष्य करणे उचित राहिल.
स्त्रीवाद हा शब्द महिलांना समान हक्क आणि कायदेशीर संरक्षण प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने राजकीय, सांस्कृतिक किंवा आर्थिक चळवळीचे वर्णन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. १९७० च्या दशकापर्यंत “स्त्रीवाद” आणि “स्त्रीवादी” या शब्दांचा सहज वापर होत नव्हता, परंतु सार्वजनिक व्यवहारात ही संकल्पना फार पूर्वीपासून अस्तित्वात होती. Coe.int या युरोपिअन संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ही संज्ञा पहिल्यांदा १४९५ साली वापरात आली. इटालियन लेखिका क्रिस्टीन डी पिझान यांनी १४९५ च्या सुरुवातीस समाजातील स्त्रियांच्या परिस्थितीबाबत एक पुस्तक प्रकाशित केले होते. ज्या काळात महिला लिहू, वाचू शकत नव्हत्या, त्या काळात क्रिस्टीन डी पिझान यांनी स्त्रीयांची व्यथा मांडणारं पुस्तक लिहिलं. तसंच, स्त्रिया माणसंच आहेत असं त्यांनी या पुस्तकातून ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतरच्या काळात विविध देशात विविध चळवळी झाल्या. हेनरिक कॉर्नेलियस अग्रिप्पा आणि मोडेस्टा डी पोझो डी फोर्झी यांनी १६ व्या शतकात महिला चळवळींविषयी काम केले. तर, मेरी ले जर्स डी गौरने, अॅन ब्रॅडस्ट्रीट आणि फ्रँकोइस पॉलेन डे ला बॅरे यांनी १७ व्या शतकात आपल्या लेखणीतून स्त्रीवादी भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा >> मिलेनिअल्स पिढीतही महिलांची घुसमट! नात्यात सहचार्य कधी येणार?
स्त्रीवादाचा उगम झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत स्त्रीवादाच्या तीन लाटा येऊन गेल्या. अमेरिकेतील या स्त्रीवादी लाटांचा अभ्यास आपण भारतीय पद्धतीने करू शकतो. पहिली लाट २० व्या शतकाच्या सुरुवातीला आली होती. त्यानंतर, १९६० ते १९७० दरम्यान स्त्रीवादाची दुसरी लाट होती. तर, तिसरी लाट १९९० पासून आजपर्यंत विस्तारलेली आहे. स्त्रीवादी चळवळींनी केवळ पारंपरिक, रुढीवादी संकल्पनांना छेद दिला नाही तर, पाश्चात्य समाजातील संस्कृतीपासून कायद्यापर्यंतच्या क्षेत्रांमध्ये दृष्टीकोन बदलले आहेत. स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी महिलांच्या कायदेशीर हक्कांसाठी मोहीम चालवली आहे. महिलांचा स्वायत्त अधिकार, गर्भपाताचा अधिकार, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ आणि बलात्कारापासून महिला आणि मुलींचे संरक्षण, मातृत्व रजा आणि समान वेतनासह कामाच्या ठिकाणचे अधिकार, महिलांवरील लिंग-विशिष्ट भेदभावाच्या इतर प्रकारांविरुद्ध स्त्रीवादी चळवळी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
स्त्रीवादाची पहिली लाट
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पाश्चात्य देशात स्त्रीवादाची पहिली लाट पसरली. स्त्री पुरुष समानता, मालमत्ता अधिकार, विवाह याबाबत महिला चळवळींना वेग आला. याच काळात भारतातही महिला हक्कांसाठी मोठी चळवळ उभी राहत होती. १८४८ साली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली. त्यांच्या या क्रांतीकारी विचारांमुळे पुढे दूरगामी बदल झाले. सावित्री बाई फुलेंना भारतातील पहिल्या महिला स्त्रीवादी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सावित्रीबाई फुलेंनंतर अनेक स्त्रीवादी महिला नेत्यांनी पुढाकार घेत भारतात महिला चळवळी सक्रिय केल्या. यामध्ये अनेक पुरुष स्त्रीवाद्यांचाही समावेश होता. दरम्यान, युनायटेड स्टेट्सच्या राज्यघटनेत एकोणिसाव्या घटनादुरुस्तीने (१९१९) सर्व राज्यांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देऊन अमेरिकन फर्स्ट-वेव्ह फेमिनिझमचा अंत झाला असे मानले जाते. परंतु, भारतात स्त्रीवादाची पहिली लाट दुसऱ्या महायुद्धापर्यंत सुरूच होती.
स्त्रीवादाची दुसरी लाट
परंपरा, रुढींविरोधात पहिल्या लाटेत लढल्यानंतर स्त्रीवादाच्या दुसऱ्या लाटेत समाजातील असमानता, सांस्कृतिक असमानता याविरोधात लढण्यावर लक्षकेंद्रीत करण्यात आली. सेकंड-वेव्ह फेमिनिझम म्हणजे १९६० च्या सुरुवातीच्या काळात आणि १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत अनेक महिला चळवळी झाल्या. भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा हा काळ. या काळात महिलांना सामाजिक, कायदेशीर हक्कासाठी लढावं लागलं. रुढी परंपरांचा पगडा झुगारून अनेक महिलांनी पुढाकार घेतला. याच काळात अनेक राजकीय बदल झाले. राजकीय उलथापालथ होऊन याच काळात देशाला पहिल्या महिला पंतप्रधानही लाभल्या. इंदिरा गांधींसारखं महिला नेतृत्त्व देशाच्या सर्वोच्च पदावर बसल्याने महिलांच्या हक्क आणि अधिकारांविषयी वेगाने चर्चा होऊ लागल्या.
हेही वाचा >> स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांनीही गरोदर राहायला हवं का? नीना गुप्ता यांचं वक्तव्य का ठरतंय चर्चेचा विषय
स्त्रीवादाची तिसरी लाट
१९९० मध्ये सुरू झालेली स्त्रीवादाची तिसरी लाट अद्यापही सुरू आहे. गेल्या ३० वर्षात महिलांनी विविध प्रश्नांना वाचा फोडली. नोकरी, व्यवसाय, समाजकारण, राजकारणात आपला ठसा उमटवला. याची बिजे १८४८ साली ज्योतिबा फुले यांनी बांधलेल्या शाळेतून रोवली गेली होती. त्यामुळे, भारतात फुले दाम्प्त्यामुळे स्त्रीशिक्षणाची कवाडे खुली झाली होती. याचा परिणाम १९९० नंतर प्रकर्षाने जाणवू लागला. महिलांना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं. त्यामुळे गेल्या तीस वर्षांत महिला शिक्षणाचं प्रमाण वाढलं. आजही देशातील अनेक ग्रामीण भागात महिलांना त्यांच्या शिक्षणाचा अधिकार मिळालेला नसला तरीही स्वातंत्र्यानंतर महिलांच्या एकूणच प्रगतीत लक्षणीय वाढ झाली आहे. या सर्व गोष्टी फेमिनिमझमुळे सिद्ध झाल्याचंही वारंवार सिद्ध झालं आहे.
फेमिनिमझम म्हणजे नक्की काय?
पाश्चात्य आणि भारतातील विविध स्त्रीवादी चळवळींचा अभ्यास करताना तुम्हाला निश्चितच प्रश्न पडला असेल की स्त्रावादी भूमिकेमुळे महिलांना माणूस म्हणून वागणूक मिळू लागली आहे, परंतु तरीही स्त्रीवाद्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अद्यापही बदलेला नाही. त्यामुळे स्त्रीवादाची नेमकी व्याख्या काय? महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी सुरू केलेली चळवळ पुरुषांना नाहक त्रास देणारी ठरतेय, असाही काहींचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आगामी काळात फेमिनिझम संकल्पनेला उत आला तर घर-दारे उद्ध्वस्त होतील, संसार मोडतील अशीही भीती व्यक्त केली जाते. परंतु, स्त्रीयांनी पुरुषांचा द्वेष करणे ही स्त्रीवादाची व्याख्या नक्कीच नाही. समाजात स्त्री-पुरुष समानता राखणे, स्त्री पुरुष समानतेवर विश्वास ठेवणे आणि स्त्री-पुरुष समानता आपल्या आचरणात आणणे ही स्त्रीवादाची खरी व्याख्या आहे.
परंतु, काळाच्या ओघात स्त्रीवादी व्याख्या बदलत गेली. पुरुषांचा दुस्वास करणे, पुरुषांना कमी लेखणे, वर्षानुवर्षे पुरुषांनी स्त्रीयांवर केलेल्या अन्याय अत्याचारामुळे समस्त पुरुष वर्गाला दोषारोप देणं अशी स्त्रीवादाची व्याख्या झाली. या संकल्पनेमुळे पुरुषांना कमी लेखण्याचा, त्यांना त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचाही दावा केला जातो. परंतु, फेमिनिस्ट असणे म्हणजे पुरुषद्वेषी असणे नव्हे,असं अनेक स्त्रीवादी सांगतात. त्यामुळेच, फेमिनिझम माणनारा पुरुषवर्गही समाजात मोठ्या प्रमाणात आढळतो.
हेही वाचा >> नातेसंबंध: मूल माझ्याच पोटात का वाढवू?
त्यामुळे, नीना गुप्ता यांना त्यांच्या पूर्वाश्रमात आलेल्या काही अनुभवांवरून त्यांनी फेमिनिझमला फालतू म्हटलं असलं तरीही फेमिनिमझची मूळ व्याख्या फालतू नाही. इंटरनॅशलन वुमेन्स डेव्हलोपमेंट एजन्सीनुसार फेमिनिझम म्हणजे, feminism is about all genders having equal rights and opportunities. म्हणजेच, अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर स्त्रीवाद म्हणजे सर्व लिंगांना समान हक्क आणि संधी मिळणे फेमिनिझम होय.