सिल्कच्या, अर्थात रेशमी साड्यांवर स्त्रियांचं विशेष प्रेम दिसून येतं. साड्यांची आवड असलेल्या प्रत्येकीच्या खजिन्यात सिल्कची एक तरी उंची साडी असतेच. पण हल्ली समाजमाध्यमांवर एक वेगळाच ‘ट्रेंड’ दिसू लागला आहे, तो आहे ‘व्हेगन’ साड्यांचा. समाजमाध्यमांवर ‘व्हेगन इन्फ्ल्युएन्सर्स’ खूप मोठ्या संख्येनं आहेत. व्हेगन (अर्थात मांस, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मध असे प्राण्यांपासून मिळवलेले तमाम पदार्थ वगळून केला जाणारा आहार.) पदार्थ करून दाखवण्यात आणि पाळीव प्राणी विकत न घेता भटक्या कुत्र्यामांजरांना सांभाळा, असं सांगण्यात ही मंडळी आघाडीवर असतात. आता यात भर पडली आहे व्हेगन कपड्यांच्या प्रचाराची- त्यातही ‘सिल्क न वापरता व्हेगन सिल्क वापरा’ याची!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हेगन पदार्थांपर्यंत ठीक आहे, पण ‘व्हेगन सिल्क’ हा काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल! त्यापूर्वी साधं सिल्क म्हणजे रेशीम कसं तयार होतं, ते थोडक्यात पाहू या. रेशमाचा धागा हा सुरूवातीला रेशमाच्या किड्यांनी आपल्याभोवती तयार केलेल्या कोशांच्या रूपात असतो. कोशांपासून सलग असा रेशीमधागा काढण्यासाठी आधी ते कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात. अर्थातच रेशमाच्या किड्यांसकट! कारण रेशमाच्या किड्याला कोश फोडून बाहेर येऊ दिल्यास रेशीमधागा तुटतो. ‘पीटा’ संस्थेच्या म्हणण्यानुसार सिल्कची एक साडी तयार करायला साधारणपणे ५० हजार रेशमाचे किडे मारले जातात. एक किलो सिल्क तयार करायला सुमारे ६६०० रेशमाचे किडे मारून त्यांचे कोष वापरावे लागतात. या कारणास्तव व्हेगन लोक सिल्क वापरत नाहीत. रेशमांच्या किड्यांना न मारताही पारंपरिक सिल्क तयार करण्याचा दावा काही उत्पादक करतात. परंतु या प्रक्रियेतही काही प्रमाणात रेशीमकिडे मारले जातातच, असा काही व्हेगन मंडळींचा आक्षेप आहे. सिल्क-कॉटन हे ‘ब्लेंडेड’ मटेरिअलसुद्धा ही मंडळी वापरत नाहीत. या सगळ्यावर ‘व्हेगन सिल्क’चा पर्याय बाजारात आणला गेला असून सध्या अनेक इन्फ्ल्युएन्सर्सच्या फोटोंमध्ये व्हेगन सिल्क साड्या दिसत आहेत.

आणखी वाचा- ए बाई तू मध्ये बोलू नको… नवऱ्याचे ‘हे’ शब्द प्रत्येक बायकोने ऐकायलाच हवेत कारण…

व्हेगन सिल्क-

व्हेगन सिल्क हे सिल्कसारखं भासणारं पर्यायी मटेरिअल आहे. ते विविध झाडांपासून मिळणाऱ्या ‘सेल्युलोज फायबर’पासून बनवतात. केळीच्या खोडापासून सिल्क बनवलं जातं, त्याला ‘बनाना फायबर सिल्क’ म्हणतात. भारतात मिळणाऱ्या पुष्कळ ब्रँडच्या व्हेगन साड्या केळीच्या खोडापासून बनणाऱ्या सिल्कच्या आहेत. बनाना फायबरच्या या धाग्यापासून कौशल्यानं साडी विणतात. या साड्यांच्या किंमती साधारणत: नेहमीच्या सिल्क साड्यांइतक्याच दिसून येतात. अर्थात किमतीचा हा खेळ ‘ब्रँडनेम’वरही अवलंबून आहे. नेहमीच्या सिल्क साड्यांप्रमाणेच यातही गडद आणि फिक्या रंगांच्या विविध छटा उपलब्ध असतात. उत्पादकांकडून या व्हेगन सिल्क साड्यांची जाहिरात वजनाला हलक्या आणि नेसायला सोप्या अशी केली जाते.

आणखी वाचा- ‘गंगा भागीरथी’ म्हणत २१ व्या शतकातील महिलांना पुन्हा पुरातन काळात नेण्याचा प्रयत्न का?

याशिवाय निलगिरी (eucalyptus) आणि पाईन या झाडांपासूनसुद्धा सिल्कसारखा पर्यायी धागा बनतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हेगन सिल्कचे कपडे विकणारे काही ब्रँडस् ही कापडं वापरतात. आंतरराष्ट्रीय आणि काही भारतीय डिझायनर ब्रँडस् नीही आपण ‘व्हेगन’ किंवा ‘क्रुएल्टी फ्री’ असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय इतर अनेक प्रकारचे कापडांचे प्रकार व्हेगन आहेतच (उदा. कॉटन).

व्यक्ती व्हेगन असो, वा नसो, समाजमाध्यमांवरच्या ‘पोस्ट’मध्ये दृष्टीस पडणाऱ्या व्हेगन सिल्क साड्या साडीप्रेमी मैत्रिणींचं कुतूहल नक्कीच चाळवताहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is vegan silk saree know the details and interesting fact mrj
Show comments