डॉ. उल्का नातू-गडम
चौथा यम म्हणजे ब्रह्मचर्य. असे मानतात की योगाची सगळी तत्वे, अंगे नीट पाळली पण बह्मचर्य नीट पाळले नाही तर सर्व साधना फुकट आहे.
ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म -आचर्य. ब्रह्म तत्त्वाच्या जवळ जाता येईल किंवा मी स्वत: ब्रह्म आहे. (अहं ब्रह्मास्मि) ही अनुभूती येण्यासारखे आपले वागणे असेल. असा प्रयत्न करणे. याचा संबंध फक्त इंद्रियभोगाशी लावला जातो. परंतु ते तितकेसे बरोबर नाही. मनाचे संयमन, हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.
संस्कारीत व्यक्तीच्या मनात फक्त कामवासना निर्माण न होता या वासनांना नीट दिशा मिळून केवळ भोगापुरता हा विषय मर्यादित राहणे महत्त्वाचे आहे. ‘प्रजनन’ ही नैसर्गिक प्रेरणा आहे. पण त्यात प्र-जनन म्हणजे प्रकर्षाने केलेली निर्मिती आहे. प्रयत्नपूर्वक चांगली संतती जन्माला येण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. हे झाले नाही तर नुसत्याच कामवासनांनी समाजात घडणारे गुन्हे मन उद्ध्वस्त करतात. आज आपण वृक्षासनांचा सराव करणार आहेत.
आणखी वाचा : उत्थित एकपादासन
असे करा आसन
हे दंडस्थितीतील आसन आहे. त्यासाठी प्रथम दंडस्थितीतील विश्रांती अवस्था – दोन्ही पायांमध्ये अंतर, हात पाठीवर घ्या. आता दोन्ही पाय एकमेकांस जोडा. हात शरीराच्या बाजूला घ्या. आता उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजवी टाच डाव्या मांडीच्या आतील बाजूस गुडघ्याच्या वर जमेल तितकी शिवणीच्या जवळ लावून ठेवा. दोन्ही हात नमस्काराप्रमाणे एकमेकांना जोडून डोक्याच्या वर न्या. हातांना वर खेच द्या. दोन्ही हातांचे दंड दोन्ही कानांना स्पर्श करतील. नजर समोर स्थिर ठेवा. डोळे मिटल्यास कदाचित तोल सांभाळणे कठीण जाईल. सरावाने डोळे मिटूनही ही साधना करता येईल.
चार ते पाच श्वास या स्थितीत थांबल्यावर विरुद्ध बाजूने हीच कृती पुन्हा करा.
आणखी वाचा : योगमार्ग : अर्धपद्मासन
आसनाचे फायदे
तोलात्मक गटातील हे आसन आहे. व्हर्टिगो, उच्च रक्तदाब असल्यास हे आसन सांभाळून करणे. परंतु शरीराबरोबर मनाचा तोल सांभाळण्यासाठी या आसनाचा सराव उपयुक्त आहे.
ulka.natu@gmail.com