वनिता पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजकाल ऐकावं ते आक्रीतच असं होऊ लागलं आहे. मुलीच्या किंवा मुलाच्या प्रेमविवाहाला विरोध करणारे, त्यासाठी त्यांना घरात डांबणारे किंवा मारहाण करणारे, प्रसंगी जीव घेणारे आईबाप जगात आहेत, हे आपल्याला अनेक बातम्यांमधून समजलं आहे. आईवडिलांनीच काय, कुणीच कुणाच्याही प्रेमाच्या आड येऊ नये, ही कुठल्याही शहाण्यासुरत्या माणसाची भूमिका असते, असायला हवी. पण आपल्या प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांनाच गुंडाकडून बेदम मारहाण करवणारी लेक कुणी बघितली आहे का? आता असंही उदाहरण पुढे आलं आहे.

ही घटना घडली आहे, सोलापूर जिल्ह्यामधल्या माढा इथं. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार माढ्यामधले एक व्यापारी त्यांच्या लेकीला घेऊन घरी निघाले होते. वडिलांच्याच काही कामासाठी पुण्याला गेलेली ही मुलगी बसने परत आली. वडील आपली गाडी घेऊन तिला घ्यायला गेले आणि गाडीतून ते दोघेही त्यांच्या गावाला परतत असताना स्वच्छतागृहात जाण्यासाठी एका ठिकाणी थांबले. तेवढ्यात दोन जण मोटारसायकलवरून तिथे आले. त्यांनी वडिलांना जबर मारहाण केली आणि पसार झाले.

आणखी वाचा-कोण आहे मिन्नू मणी? शेतमजुराची मुलगी ते ‘टीम इंडिया विमेन’मधलं स्थान…

मुलीने स्वत:च जाऊन पोलिसांत ही खबर नोंदवली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. पण प्रत्यक्ष परिस्थिती, तिने केलेलं वर्णन यात पोलिसांना खूपच विसंगती जाणवायला लागली. त्यामुळे मग त्यांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर तिने आपणच हा सगळा बनाव रचल्याचे मान्य केले. त्यातल्याच एकाशी तिचे प्रेमसंबंध होते आणि वडिलांचा या प्रेमविवाहाला विरोध होता. त्यामुळे त्यांना जायबंदी करण्यासाठी तिने हा कट रचला होता म्हणे. आता पोलिसांनी तिच्यासह पाचजणांना अटक केली आहे आणि तिच्या वडिलांवर उपचार सुरू आहेत.

किती चक्रावून टाकणारी घटना आहे ना ही ?

प्रेमाला आईवडिलांचा, नातेवाईकांचा विरोध, त्या जोडप्याने पळून जाऊन लग्न करणं, हळूहळू विरोध मावळत जाणं हे नेहमीच घडतं. त्यात नवं काहीच नाही. अपवाद म्हणून ‘सैराट’सारखी प्रकरणं घडतात, तेव्हा त्यातलं क्रौर्य सगळ्यांना हादरवून टाकणारं असतं. प्रेमासारख्या सुकोमल भावनेचा असा रक्तरंजित शेवट कुणाला मान्य होईल? जात, धर्म या पैलूंच्या पलीकडे जाऊन नातेसंबंधांकडे, भावभावनांकडे बघणं अजून तरी आपल्या समाजाला जमलेलं नाहीये, जमत नाहीये, हे वास्तव आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. हळूहळू ही परिस्थिती बदलत जाईल, त्या जोडप्याचं प्रेम त्याच्यावरच सोडून द्यायला हवं हे समाजाला समजेल, अशी आशा आहे.

आणखी वाचा-तुम्हा नवरा-बायकोंत अजूनही ‘आंतरपाट’ आहे का?

पण वडिलांचा विरोध आहे म्हणून एखादी मुलगी वडिलांनाच मारहाण करायला लावते हे कसं स्वीकारायचं? हे काही नेहमी घडणारं नाही, ते अपवादात्मक आहे, हे मान्य केलं तरी आपल्या बापाला कुणीतरी मारहाण करावी, असा विचार कुणी एखादी लेक मनातल्या मनात तरी कसा करू शकते?

बाप लेक या नात्यालाच काळिमा नाही का हा?

नुकत्याच जन्माला आलेल्या लेकीला हातात घेतलं आणि जगात सुकोमल म्हणजे काय असतं, ते मी एवढ्या तीव्रतेनं कधीच अनुभवलं नव्हतं, असं माझ्या लक्षात आलं, असं एका बापाने कधीकाळी आपल्या लेकीच्या जन्माचं वर्णन केलं आहे. माझी मुलगी, लेक म्हणून जन्माला आली तेव्हा बाप म्हणून मीही जन्माला आलो, असंही एका बापानं लेकीच्या जन्माचं वर्णन केलं आहे.

लेक सहसा बापासारखी, म्हणजे बापाची डीएनए कॉपीच असते एका प्रकारे! या नात्यात असलेली ओढ, त्यातला जिवंतपणा, त्यातलं प्रेम, जिव्हाळा या सगळ्याचं वर्णन कोणत्याही शब्दांमध्ये करता येत नाही. लेक बापासाठी काळजाचा तुकडा असते आणि बाप तिच्यासाठी काळीज असतो. जगात कुठेही जा, कुठल्याही संस्कृतीत जा, कुठेही या नात्याची तीव्रता, त्यातली खोली बदलत नाही.

आणखी वाचा-आदितीने घेतला आव्हानांचा सुवर्णवेध

आजवर या नात्याला काळिमा लावणाऱ्या घटना घडल्याच नाहीत, असं नाही. आपल्याला मान्य नसलेल्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीशी कठोरपणे वागणाऱ्या बापाची उदाहरणं कमी नाहीत. या वागण्याचं कुठेही, कधीही, कसंही समर्थन होऊ शकत नाही.

पण लेकीनेही असं वागावं ? का ?

लहानपणी वडिलांनी हातात घेऊन जोजवलेलं तिला एकदाही आठवलं नसेल का? चिऊकाऊचा घास भरवलेला आठवला नसेल का? बोट धरून शाळेत नेलेलं आठवलं नसेल का? तिच्या आजारपणात काळजीने कपाळावरच्या थंड पाण्याच्या पट्टया बदलत जागवलेली रात्र आठवली नसेल का? आई ओरडल्यावर कुशीत घेऊन समजूत घातलेली आठवली नसेल का?

क्षुल्लक कारणासाठी आपल्याच वडिलांवर मारेकरी घालणारी अशी कशी ही लेक?

थोडं थांबायला, वडिलांचं मतपरिवर्तन होण्याची वाट बघायला काय हरकत होती? नसतं झालं मतपरिवर्तन तर काय करायचं, हा प्रश्न होता. पण तो पुढचा. बाकीची जोडपी करतात, तसं विरोध पत्करून लग्न करता आलं असतं, पुढे कदाचित वडिलांचं मत बदललंही असतं. पण आपली लेकच आपल्यावर मारेकरी घालते, या वडिलांच्या मनावरच्या कधीच भरून न येणाऱ्या जखमेचं काय?

आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजे या मुलीने आपल्याला काय करायचं याचं उदाहरण घालून दिलं आहे, असा आणखी लेकींचा समज होऊन बसला तर त्याचं काय करायचं ?

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What kind of daughter is who kills the father for opposes the love marriage mrj
Show comments