तुम्ही रोज कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहता. पण, क्वचितच एखादा व्हिडीओ असा असतो; जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ व्हायरल होतो आणि एका रात्रीमध्ये कोणीतरी प्रसिद्ध होऊन जातो. त्यामुळे कित्येकांचं आयुष्य बदलून जातं. अशाच एक दिवस सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या शांताबाई पवार! कितीही संकटं आली तरी कधीही हार मानू नये हे या आजींकडून शिकावं. शांताबाईंकडून तुम्हाला शिकण्यासारखं खूप काही आहे.
लुगडं नेसणारी, अशिक्षित व सर्वसामान्य वृद्ध महिला. करोना काळात त्या रस्त्यावर लाठी-काठीचा खेळ सादर करीत होत्या. लोकांना आपलं कौशल्य दाखवून कष्टाचे पैसे कमावण्याचा प्रयत्न करीत होत्या. कशासाठी तर पोटासाठी, दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी. स्वत:साठी सर्वच जण कष्ट करतात; पण दुसऱ्यांसाठी कष्ट करण्यासाठी जिद्द लागते, चिकाटी लागते आणि महत्त्वाचं मोठं मनं लागतं. एवढे कष्ट त्या फक्त स्वत:चं पोट भरण्यासाठी नव्हे, तर त्या सांभाळत असलेल्या अनाथ मुलींना दोन वेळचं जेवण आणि शिक्षण मिळावं यासाठी करीत होत्या. सात सदस्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्या या वयातही पार पाडत आहेत. शांताबाई आजही आपली संस्कृती जपत लाठी-काठीसारखा धाडसी खेळ सादर करीत आहेत. एवढंच नव्हे, तर परिसरातील मुलींना त्या स्वसरंक्षणाचे धडेही देत आहेत. त्यासाठी एका अकादमीचीही स्थापना करण्यात आली आहे.
जेव्हा करोना काळात व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी त्यांना मदत केली. त्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला. अगदी बॉलीवूड अभिनेता सोनू सूदपासून रितेश देशमुखपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. संकटाच्या काळात या मदतीमुळे त्यांना मोठा आधार मिळाला; पण त्यांना अजून कायमचा आधार मात्र कोणीच देऊ शकलेलं नाही. मिळालेल्या मदतीतून त्यांचं कर्ज फिटलं. सरकारनं त्यांना घर बांधून देण्याचं आश्वासनही दिलं; पण ते सत्यात कधी उतरलंच नाही. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही मदत केली; ज्याची आठवण शांताबाईंना अजूनही आहे. या पैशांमधून आजीबाईंचं आधीचं कर्ज फिटलं, घराचं अर्ध कामही झालं; पण कुटुंबातील सदस्यांचं पोट मात्र भरेना. मदतीच्या जीवावर किती दिवस जगणार? जगण्यासाठी कष्ट हे करावेच लागतील हे शांताबाईंना माहीत होतं. त्यामुळे नाइलाजानं त्यांना पुन्हा रस्त्यावर उतरून लाठी-काठीच्या खेळासाठी काठी हाती घ्यावी लागली आहे. परिस्थितीसमोर त्यांनी कधीही हार मानली नाही… ना करोना काळात ना आता.
काही दिवसांपूर्वी त्यांचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल झाला; ज्यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. तरीही त्यांनी आपलं लाठी-काठीचं कौशल्य दाखवणं सोडलं नव्हतं. आज त्या ८७ वर्षांच्या असूनही त्या पुन्हा जिद्दीने कष्ट करीत आहेत. गरज आहे ती त्यांना आधार देण्याची. अशा कित्येक शांताबाई समाजात असतील; ज्या जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. पण, सरकारकडून त्यांना आवश्यक मदत मिळत नाही. हे सरकारचं अपयश आहे. शांताबाईंसारख्या गरजू व्यक्तींना सरकारच्या मदतीची गरज आहे. नुसती तात्पुरती मदत न देता, त्यांचे प्रश्न कायमचे सोडवण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा – पाय फ्रॅक्चर असूनही लाठी-काठी खेळ सादर करतायेत ‘या’ वॉरिअर आजी, व्हिडीओ होतोय व्हायरल
शांताबाईंकडून आपण काय शिकावे?
आयुष्यात कितीही संकटं आली तरी जिद्द अन् चिकाटीनं त्यांचा सामना करा. काहीही झालं तरी कधीही हार मानू नका. नेहमी स्वत:वर विश्वास ठेवा. दुसऱ्यांच्या मदतीच्या आशेवर जगू नका. नेहमी कष्ट करण्याची तयारी ठेवा. आपली संस्कृती, परंपरा नेहमी जपावी. इतरांसाठी कसं जगता येईल ते पाहा. कारण- दुसऱ्यांसाठी जगण्यातच खरा आनंद आहे. आपल्या कामातून इतरांना प्रेरणा मिळेल असं काहीतरी करा.
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात; त्यापैकी काहीच असे असतात, जे आपल्याला खूप काही शिकवून जातात.