डॉ.अश्विन सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधुनिक समजल्या जाणार्‍या पाश्चात्त्यांच्या जीवनशैली व आहाराचे अंधानुकरण करण्याच्या नादात, त्या अवस्थ जीवनशैली व आहाराच्या बदल्यात जे अनेक आजार भारतीयांनी भेट म्हणून स्वीकारले, ज्यांच्या निदान व उपचारामध्येच देशवासीयांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा वाया जात आहे, त्या आजारामध्ये आता सामील झाला आहे, प्रामुख्याने तरुण मुलींना त्रस्त करणारा पीसीओडी किंवा पीसीओएस्‌ हा आजार. २१व्या शतकामध्ये मानवी समाजासमोरचा एक गंभीर प्रश्न म्हणून उभा राहणार्‍या (किंबहुना राहिलेल्या) पीसीओडी/ पीसीओएस्‌ या विकृतीचा सामना करणे हे सहजसोपे नाही आणि त्याचे कारण म्हणजे या रोगाला कारणीभूत ठरणारी विविध कारणे. ही कारणे लक्षात आली तर त्यांचा प्रतिबंध करणे सोपे जाईल.

प्लास्टिकचे सेवन

प्लास्टिकच्या डब्यांमध्ये जेवण ठेवण्याचाही पीसीओएस् शी संबंध असावा अशी शंका संशोधकांना आहे. त्यातही तेल, तूप, लोणी, आंबट पदार्थ, मीठ, मांस-मासे असे पदार्थ आणि गरम जेवण, गरम पाणी जेव्हा प्लास्टिकच्या डब्यांत भरले जाते, तेव्हा प्लास्टिकमधील रसायने (केमिकल्स) त्या अन्नामध्ये मिश्रित होऊन घातक मिश्रणे तयार करून विविध विकारांना कारणीभूत होतात. प्लास्टिकची उपकरणे तयार करण्यासाठी सर्रास वापरले जाणारे ‘बिस्फेनॉल ए म्हणजेच बीपीए’याचे मुलींच्या शरीरामधील वाढलेले प्रमाण अन्तःस्त्रावी ग्रंथींचे कार्य बिघडवून संप्रेरकांचा समतोल विकृत करण्यास कारणीभूत होते. लहान वयातल्या मुलींना प्लास्टिकच्या बाटलीमधून दूध देणे किंवा प्लास्टिकच्या डब्यात अन्न देणे हे ती मुलगी वयात येईल तेव्हा तिला पीसीओएस् चा धोका निर्माण करू शकेल असेही संशोधक सांगतात. प्लास्टिक व अन्नपदार्थ यांच्या संयोगाने इस्ट्रोजेन सदृश पदार्थ तयार होतात आणि स्त्री- शरीरामधील संप्रेरकांचा (हार्मोन्सचा) समतोल बिघडवण्यास कारणीभूत होतात, अशीही शंका आहे. तसेही प्लास्टिक आणि अन्नपदार्थ यांचा संयोग कर्करोगाला (कॅन्सरला) कारणीभूत होतो, हे तर सिद्ध आहेच, तेव्हा जेवण नेण्या-ठेवण्यासाठी प्लास्टिकचा उपयोग थांबवणेच हितकर.

आणखी वाचा – ‘डिझायनर व्हजायना’ म्हणजे काय?

मद्यपान व पीसीओएस्

मद्यपान न करणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेमध्ये मद्यपान करणाऱ्या मुलींना पीसीओएस् होण्याचा धोका तब्बल ३० पटीने अधिक असतो असे निरीक्षण चिनी संशोधकांनी नोंदवले आहे. मद्यामुळे इस्ट्रोजेनचे प्रमाण आवास्तवरित्या वाढते, तर प्रोजेस्टेरॉनचे कमी होते. हा संप्रेरकांचा असमतोल मुळातच पीसीओएस् मध्ये असतो, जो मद्यामुळे बळावतो. कोणत्याही प्रकारचे मद्य हे शरीरामध्ये साखर अचानक वाढवते, जे इन्सुलिनच्या अत्यधिक स्त्रवणास कारणीभूत ठरते, जे वारंवार झाल्यास इन्सुलिन प्रतिरोधास कारणीभूत होते, पुढे जाऊन पीसीओएस् च्या दिशेने जाते. मद्यपान मानसिक ताण व निराशेस कारणीभूत होते, ज्याचा सामना पीसीओएस् ने ग्रस्त स्त्रिया आधीच करत असतात. इथे सुद्धा शंका असेल की मुली कुठे मद्यपान करतात, तर आजकालच्या पार्ट्यांमध्ये डोकावून पाहा. बीअर पिणे म्हणजे तर चहा पिण्यासारखे होऊ लागले आहे… मुलांबरोबरच मुलींमध्ये सुद्धा. मद्यपानाशी संबंधित अनेक आजार स्त्रियांमध्येही वाढत आहेत!

आणखी वाचा – भाग २ : लहान वयात येणारी मासिक पाळी पीसीओएएसला ठरु शकते कारणीभूत!

धूम्रपान व तंबाखू

धूम्रपान आरोग्याला घातक आहे हे आपण जाणतो, मात्र त्याचा धोका केवळ कॅन्सरशी संबंधित आहे असे लोक समजतात. तसे नसून प्रत्यक्षात उच्च रक्तदाबापासून हार्ट अटॅकपर्यंत आणि पुरुषांमध्ये लिंगाला ताठरता न येण्यापासुन ते शुक्राणू मृत होण्यास व स्त्रियांमध्ये निकस बीजांड तयार होण्यास सुद्धा तंबाखू कारणीभूत आहे. दुर्दैवाने तंबाखूचे हे भयानक परिणाम स्टाईल म्हणून हातात सिगरेट धरून धूर गिळणाऱ्या मुलींना माहीत नसतात आणि जेव्हा समजतात तेव्हा उशीर झालेला असतो. हल्ली शाळा-कॉलेजच्या परिसरात फेरफटका मारला तर सिगरेट पिणाऱ्या मुली सहज दृष्टीस पडतात. दुसरे म्हणजे मुलींच्या ग्रुपमधील मित्र किंवा घरातले पुरुष धूम्रपान करत असतील तर त्यानेही तंबाखूचा धूर शरीरात जाण्याचा धोका असतोच, किंबहुना अधिक. बरे, तंबाखूच नाही तर हुक्का, गुटखा, मशेरी, चुना-तंबाखुची गोळी, पान-तंबाखू अशा कोणत्याही स्वरुपात तंबाखुचे सेवन करणाऱ्या स्त्रियांना तंबाखुमधील अगणित केमिकल्समुळे मेटाबोलिक सिन्ड्रोमचा आणि पुरुषी संप्रेरक वाढण्याचा अर्थात पीसीओएस् चा धोका संभवतो. यापुढे लग्नासाठी मुलगी निवडताना ती मद्यपान किंवा धुम्रपान करत नाही ना याची खातरजमा करणे सुद्धा आवश्यक होईल असे दिसते!

पीसीओएसला कारणीभूत जीवनशैली व आहारातल्या चुकांविषयी विस्ताराने समजून घेऊ उद्या. (क्रमशः)

drashwin15@yahoo.com